बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ८
रामबाडा ते घोडा बाजार : पावलोपावली परीक्षा, प्रेरणा आणि दमछाक
रामबाडा मागे पडले आणि आम्ही
लिनचोलीच्या दिशेने पुढे निघालो. आता आमचा मोठा ग्रुप अक्षरशः मायक्रो गटांमध्ये
विभागला गेला होता. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार, आपल्या गतीने
चालत होता. कोणी पुढे गेले होते, कोणी मधोमध होते तर काही जण निवांतपणे
मागून येत होते. पण एक गोष्ट समान होती – प्रत्येकाच्या मनात केदारनाथाचे दर्शन
आणि शिखर गाठण्याची तीव्र इच्छा. या टप्प्यावर कोणाशी स्पर्धा नव्हती; प्रत्येकाची
स्पर्धा स्वतःच्या थकव्याशी आणि मर्यादांशी होती. चढाई जसजशी वाढत होती तसतशी शरीराची
परीक्षा सुरू होती. त्यामुळे घाई करण्याऐवजी आम्ही अधूनमधून थांबत होतो. कुणी
पाण्याचा घोट घेत होता, कुणी फळे खात होता, तर कुणी ऊर्जा देणारे ड्रायफ्रूट्स खात
होता. छोट्या छोट्या विश्रांती घेतल्यामुळे शरीराला पुनश्च ऊर्जा मिळत होती आणि
पुढील चढाईसाठी बळही मिळत होते. पर्वतांमध्ये चालताना सतत चालत राहण्यापेक्षा
योग्य वेळी घेतलेला छोटासा ब्रेक किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव या
मार्गावर वारंवार होत होती.
या संपूर्ण प्रवासात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – केदारनाथची
चढाई केवळ पायांनी होत नाही, ती मनानेही करावी लागते. शरीर थकते,
श्वास
वेगाने चालतो, पाय जड होतात; पण मन खंबीर असेल तर पुढचे पाऊल आपोआप
पडत राहते. समोर दिसणारे हिमाच्छादित डोंगर, खाली खळाळत
वाहणारी मंदाकिनी आणि आजूबाजूला चालणारे हजारो भाविक हे सारे दृश्य थकवा विसरायला
लावत होते. रामबाडा ते लिनचोली हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
जाण्याचा नव्हता; तो संयम, सहनशक्ती, समूहभावना आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा घेणारा टप्पा होता.

दुपार चांगलीच झोंबत होती. सूर्यनारायण पूर्ण क्षमतेने कामाला लागले असावेत.
हिमालयात असलो तरी सूर्याची तीव्रता जाणवत होती. डोक्यावर तळपणारा सूर्य आणि सततची
चढाई यामुळे शरीराचा कस लागत होता. मात्र अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या
झुळका जणू निसर्गाने दिलेला आशीर्वादच वाटत होत्या. त्या काही क्षणांसाठी सारा
थकवा दूर करून पुन्हा पुढे चालण्याची ताकद देत होत्या. आम्ही सुरुवातीपासूनच एक
गोष्ट ठरवली होती—शरीर जितके साथ देईल तितके चालायचे. कुठलाही अवाजवी हट्ट करायचा
नाही. कारण या मार्गावर एका टप्प्यानंतर प्रत्येक यात्रेकरूला वास्तवाची जाणीव होते.
नकाशावर किंवा व्हिडिओमध्ये दिसणारा प्रवास आणि प्रत्यक्षात पायांनी चढलेला प्रवास
यात खूप फरक असतो. अनेकांना एका क्षणी वाटते की आता पुढे चालणे अशक्य आहे;
मग
घोडा,
पिट्ठू किंवा इतर पर्यायांचा विचार सुरू होतो. 
ठरल्याप्रमाणे आमच्या गटातील काहींनी सामानासाठी पिट्ठूची मदत घेतली.
खांद्यावरील ओझे कमी झाले आणि त्यामुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण पाय मात्र
स्वतःलाच उचलायचे होते. दरम्यान, आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सतत संदेश
येत होते. "अमुक ठिकाणी पोहोचलो", "इतके किलोमीटर
बाकी", "इथे विश्रांती घेतोय" अशा अपडेट्समुळे पुढे गेलेल्या आणि मागे
राहिलेल्या सगळ्यांमध्ये एक अदृश्य धागा कायम जोडलेला होता. प्रत्यक्षात आम्ही
वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी प्रवास एकत्रच करत होतो.
दुपारचे साधारण तीन वाजले असतील. तेव्हा मनात पहिल्यांदा एक विचार
आला—आजचा उर्वरित प्रवास अनेकांसाठी कठीण जाणार आहे. शरीरातील ऊर्जा कमी होत चालली
होती आणि अजून अंतर बाकी होते. पण त्याच वेळी घोडा बाजार (Horse Stand )जवळ येत
असल्याच्या खुणा दिसू लागल्या. मी,
सागरभाऊ आणि गुलाबभाई एकमेकांकडे पाहत होतो. चेहऱ्यावरचा थकवा अजून
होता,
पण मनात आशेचा किरण दिसू लागला होता. "मंजिल बहोत पास
है..." ही भावना प्रथमच स्पष्टपणे जाणवू लागली. एकदम थकलेल्या पायांना
नवसंजीवनी मिळाली. शरीर जरी दमलेले असले तरी मन पुन्हा उत्साहाने भरून गेले. अनेक
तासांच्या चढाईनंतर प्रथमच लक्ष्य हाताच्या अंतरावर असल्याची जाणीव झाली. त्या
क्षणी समजले की यात्रेत सर्वात मोठी शक्ती शरीरात नसते,
ती मनात असते.
मनाला जेव्हा मंजिल दिसते,
तेव्हा थकलेले पायही पुन्हा चालू
लागतात. आम्ही एकमेकांना धीर देत पुढे निघालो. एव्हाना काही जण अजूनही बरेच मागे आहे
आणि हळूहळू का होईना निर्धाराने वर येत आहेत हे माहित होते. आम्ही पुढे निघालो कारण
आता ओढ लागली होतो कळस दर्शनाची.
क्रमश:
प्रा.
डॉ. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी
समूह)
Comments
Post a Comment