चला कार्यकर्ता बनू ...

चला कार्यकर्ता बनू ... 22/11/16

लागली निवडणूक पाच वर्षांनी भोंगे वाजू लागले |
एक चपटी अन मुठभर चकना यात साऱ्यांचे भागले |
आहे तुम्हीच युवा नेता असे बेंबीपासून म्हणू ... चला कार्यकर्ता बनू ...

मीच तो तुमचा माणूस जणू सगळे भासू लागले |
सतत दाराशी आपल्या ते सकाळ सांज प्रकटू लागले |
आहे लक्ष माझे असे लाजत काजत म्हणू .... चला कार्यकर्ता बनू ...

दर्शन नाही कित्येक मास आता उद्घाटन पातले |
विकासकामे बोर्डावर, फलकावर हिशोब ते आतले |
मी पण मग वाजवीत टाळ्या ठीक आहे म्हणू ... चला कार्यकर्ता बनू ...

कालच पडली खडी कुठे तर मुरूम, पेवर ब्लॉक पडले |
का नाही मग गेला काळ कुणाचे हे घोडे कुठे अडले |
हजार पाचशे, जेवण खावन मारा रे ताव म्हणू ... चला कार्यकर्ता बनू ...

झाले विरोधी मित्र मंडळी , नवे सगे सोयरे जुळले |
फसुनही कधी मृगजळ हे कुणा कळूनही न वळले |
रस्ते, कामे, काही आता तरी घडू दे असे म्हणू... चला कार्यकर्ता बनू ...   

आश्वासने तीच, तोच वचननामा अन तेच ते जुमले |
एकच मुद्दा, कुणाचा गुद्दा, कुणाचे पार डोके घुमले |
कुणा साहेब, कुणा मायबाप कुणा विकासपुरुष म्हणू.... चला कार्यकर्ता बनू ...

--सचिन गाडेकर

Comments