एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’


‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ हा भारतीय संस्कृतीचा संदेश देणारे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर प्रार्थना सभागृह व श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवन.

पुरातन आणि प्राचीन असा वारसा लाभलेल्या या भारतभूमीत अध्यात्म आणि विचारधारा यांचा अत्युच्च संगम म्हणजे वैदिक वाङ्मय. यासमग्र  विचारमालेतील सुवर्णकमळ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. स्वयं ईश्वराच्या मुखारविन्दातून पाझरलेले ज्ञान १३ व्या शतकात ज्ञानेश्वरमाउलींनी बोलीभाषेत मांडले. ‘आता विश्वात्मके देवे’ची भावना घेऊन विश्वाची चिंता करणारी माउली भगवद्गीतेचा परिपाकच आहे.
या वैश्विक ज्ञानाचा आधारभूत पाया म्हणजे भारतीयांची मुक्त विचारपद्धती. ‘जे ज्यासी भावे ते तें भजावे’ म्हणत हा मार्ग राजमार्ग झाला. या अशा बहुविध आणि बहुआयामी संस्कृतीचे मूळ सापडते ते ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या वेदोक्तीमध्ये. अंततोगत्वा ‘सत्’ हे एकच आहे. विश्वशांती, सौख्य, सुबत्ता, जीवनमूल्ये या त्या ‘सत्’च्या शोधातील ठळक प्रयत्न आहेत. अनेकांनी हे ‘सत्’ ते आपापल्या जाणीवेनुसार अनुभवले आणि व्यक्तही केले, जे पुढे पाऊलवाट-मार्ग-पथ होत होत महामार्ग झाले. पण सर्वांचा प्रयत्न मात्र एकच – विश्वबंधुता, एकात्मता आणि विश्वशांती. म्हणूनच तर वेद म्हटतात - ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ ऋग्वेद जे विचारधारेत मानते ते आज प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरले आहे. ऋग्वेदाचा हा विचार हे अधोरेखित करतो की त्या ‘सत्’ चे  - ईश्वराचे ‘बहुविध असणे’ हे ‘रूप’ आहे परंतु त्याचे एक असणे, एकरूप असणे हे खरे ‘स्वरूप’ आहे. ज्ञान ज्या कोणत्याही योग्य मार्गाने ग्रहण केले जाईल तो मार्ग स्वीकारार्ह आहे हे याचे उत्तम उदाहरण. म्हणूनच या सर्व मार्गांचा-विचारांचा-तत्त्वज्ञांचा आणि विज्ञाननिष्ठ मानवी प्रयत्नांचा देणारा जगभरातील ५४ महामानवांचा आदर्श मूर्तस्वरूपात साकारला आहे तो या विश्वशांतीच्या ‘घुमटा’मध्ये. आणि आता त्या वास्तूच्याच प्रांगणात साकारले आहे मानवतेचा महामंत्र देणारे ‘श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवन’
१८ अध्याय आणि ७०० श्लोक यांनी संवादित झालेली भगवद्गीता याच विचारला दुजोरा देते. गीतेचा दहावा अध्याय म्हणजेच ‘विभूतियोग’. अर्जुनास आणि त्यास निमित्त बनवत संपूर्ण जगास उलगडून सांगितलेला सौहार्द्र भाव म्हणजे विभूतियोग. मी आणि माझे अस्तित्व सर्वत्र आहे आणि त्यात ईश्वराची विभूती आहे हे भगवंत स्वत: मांडतात. यातून ‘एकं सत्’ याची पुष्टी होतेच परंतु विभूतीयोगातून ‘विप्रा: बहुधा वदन्ति’ याचे प्रकटन दिसते. मूर्ती ते अमूर्त रूप हा आध्यात्मिक प्रवास यातून उलगडेल असे भासते.
या अशा वैश्विक विचारधारा आणि मूल्यांवर आधारित मायर्स - एमआयटी समूह गेली अनेक दशके शिक्षण क्षेत्रात योगदान देत आला आहे. आजच्या पिढीमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना रुजवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वैचारिक अधिष्ठान आणि तसे पूरक पोषक वातावरण उभे करण्याचा प्रयत्न एमआयटी करत आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुगम संगमच विश्वशांती आणू शकतो ही स्वामी विवेकानंद यांची उक्ती आज एमआयटी चे ब्रीद वाक्य आहे. गीतेतील परा आणि अपरा विद्या याचेच अधोरेखित रूप आहे.
ऑक्टोबर२०१८ मध्ये जगातील सर्वात मोठा घुमट याच विचारधारेतून विश्वशांती साठी समर्पित केला गेला. भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात हे लोकार्पण करण्यात आले.डॉ. विश्वनाथ कराड यांचे अनेक दशकांचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि वैश्विक दर्जाची ग्रंथसंपदा प्रेरणा देते, मार्ग दाखवते. शिक्षणच नाही तर अनेक क्षेत्रातील बहुविध व्यक्ती विश्वशांतीसाठी एका उद्देशाने एकत्र आले आणि जागतिक ‘धर्म’ आणि ‘विज्ञान परिषद’ साकार झाली.
‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर प्रार्थना सभागृह’ व ‘श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवन’ देखील याच भव्य परंपरेचा दैवीकळस आहे. विचारपुजक भारतीय संस्कृतीचा संदेश देणारा विचारस्तंभ येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. याच दिव्य परंपरेत भर पडत आहे ती गीताभवन या वैचारिक वास्तूची.एप्रिल ६ म्हणजेच चैत्र पाडवा या शुभ मुहूर्तावर ही वास्तू खुली होईल आणि विज्ञानाचे, अध्यात्माचे आणि ज्ञान कर्म भक्तीचे अजून एक सुवर्णपत्र कोरले जाईल इतिहासात.
ह्या वास्तू एक चिरंतन ध्येयवाद आहेत, ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’ या भारतीय संस्कृतीच्या सर्वोच्च संदेशाला जगभरात घेऊन जाण्याचा. ह्या वास्तू एक प्रयत्नवाद आहे, आजची विविधता आणि त्यातली साकार एक वाक्यता पुन्हा रुजवण्याचा.
चला तर मग या सोहळ्याचा भाग होऊयात आणि डॉ. विश्वनाथ कराड यांच्या सतत मंथनातून साकारलेल्याया महान संदेशाचे साक्षी होऊ .

लेखक:
--- प्रा. अमृता कुलकर्णी  (प्राध्यापिका पीस स्टडीज, एम आय टी, विश्वशांती विद्यापीठ, पुणे)
---- प्रा. सचिन शंकर गाडेकर (प्राध्यापक पीस स्टडीज, एम आय टी, विश्वशांती विद्यापीठ, पुणे

Comments