K2S कात्रज ते सिंहगड ट्रेक (११ मे २०२५)
.jpeg)
K2S कात्रज ते सिंहगड
ट्रेक हा सगळ्याच ट्रेकर मंडळीसाठी एक पर्वणीच असते. या ट्रेकला बरेच जण ड्रीम ट्रेक
किंवा आजकालच्या भाषेत बकेट लिस्ट ट्रेक म्हणतात. आमचा गडकरी ट्रेक समूह तसा एक वर्षाचा
होईल या जूनमध्ये. गेल्या वर्षभरात कामातून वेळ काढून वेळ मिळेल तसे दुर्गभ्रमण आणि
सहयाद्रीभ्रमण जोरात सुरु झाले. रायरेश्वर ट्रेक ने सुरु झालेले हे गडकरी अनेक गड सर
करून आले. कळसुबाई माथा हा आतापर्यंतहा उच्चांक होता. आता त्यात नवे नाव जोडले गेले
ते म्हणजे K2S कात्रज ते सिंहगड ट्रेक.
प्रशांतभाईनी ग्रुपवर इच्छा व्यक्त केली
आणि पाच सहा जणांचे लगेचच सकारात्मक उत्तर आले. दिवस ठरला आणि बाकीची तयारी.
सगळ्यांनी या ट्रेकबद्दल खूप काही ऐकले होते आणि युट्यूबवर होणारे वर्णन तर जरा जास्तच
अतिरंजित वाटत होते. तरीही अक्कलखाती मी गुरुवारी
भल्या पहाटे ट्रेक करत सिंहगड जाऊन आलो. किमान प्रक्टिस हवी यासाठी तो प्रयत्न होता
आणि त्याचे फळ ट्रेकदरम्यान मिळाले देखील. असो.

सोमवारी पौर्णिमा असल्याने आम्ही
अगोदरचा एक दिवस निवडला. रविवारी रात्री ट्रेक करायचे ठरले. रात्रीच्या ट्रेकला जास्त
गरज असते ती चंद्रप्रकाशाची. लख्ख प्रकाशाने वाट सोपी होते. सगळे मनसुबे बांधून आम्ही
वेळेत निघालो. यावेळेस सगळं काही वेगळं होतं. थेट पी एम पी एम एल पकडून मनपा,
तिथून कात्रज, तिथून एक वडाप करून जुन्या बोगद्याजवळ असलेल्या ठिकाणी पोहोचलो.
ठरल्याप्रमाणे सात जण म्हणजेच प्रशांत भाई,
सौरवजी, मनोज जी, निलेश भाई अतुल साहेब, माझा विद्यार्थी अश्वथ आणि मी असे सगळे पोहोचले
होते. भरपूर पाणी आणि काही कोरडे खाद्यपदार्थ सोबत ठेवले होतेच. कात्रजला थोडी पेटपूजा
करून निघालो होतो.

ट्रेक सुरु झाला आणि अपेक्षेप्रमाणे दर्शन
झाले ते काही सस्यांचे. टून्णूक टून्णूक उड्या मारत आणि साहजिकच मनुष्य आवाजाला घाबरत
ते पळत होते. आम्ही त्यांना जाऊ दिलं आणि पुढं निघालो. सर्वप्रथम वाघजाई देवीचे दर्शन
घेतले आणि ट्रेक सफल आणि सुरक्षित होऊ दे असं जणू साकडचं घातलं देवीला. मनोमन आशीर्वाद
घेऊन खरा प्रवास सुरु झाला. गम्मत म्हणजे त्या रात्री आमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही
ट्रेकला नव्हतं. आदल्या दिवशी म्हणे किमान ५० जण ट्रेकला आले होते असं गाडीवाल्याने
सांगतीलं. हळूहळू ट्रेककडे निघालो आम्ही.
.jpeg)
या ट्रेकची सर्वात महत्वाची बाब म्हणजे
सोबत हवी असते तो हेडटोर्च. पोर्णिमा असूनही चांदोमामा सतत काळ्या ढगाआड लपत असल्याने
एकदम अंधार होत होता. अश्या वेळी टोर्च फार गरजेची असते. क्रिकेटमध्ये पहिला चेंडू
यॉर्कर पडला तर काय वाटेल? होय, हत्ती डोंगर म्हणजे या ट्रेकचा पहिला धक्का. कडक असा
डोंगर चढून गेल्यावर पुढं काय मांडून ठेवलंय हे कळायला लागतं. एकामागून एक असे पाच
सहा डोंगर पार केले आणि सोबत आलेलो आम्ही सगळे दमायला लागलो होतो. अंधार असल्याने समोरच्या
टेकड्यांची उंची किंवा खाली असलेली दरी कळत नव्हती आणि त्यामुळे चालत राहणं सहज होतं.
मजल दर मजल करत सगळे चालत होते आणि फक्त चालत होते.
.jpeg)
किमान दहा सव्वा दहाला सुरु केलेला ट्रेक
आता दीड पर्यत आला होता. उंच टेकड्यांवरून पुणे शहर लखलख चमकत होते. याच चमचम आणि लखलखी
पासून दूर आम्ही सह्यादीकडे आलो होतो आणि म्हणून त्या दृश्याचं फारस अप्रूप वाटत नव्हत.
मध्ये मध्ये थांबत एकमेकांना हसवत ट्रेक सुरूच होता. एकमेकांत जास्त अंतर न ठेवता आम्ही
चालत होतो. एकामागून एक टेकड्या चढत आणि उतरत होतो. काहीना दम लागत होता आणि म्हणून
नियमित ब्रेक घेत एकमेकांना सांभाळत होतो. या अश्या ट्रेकमध्ये केवळ शारीरिक नाही तर
मानसिक क्षमतेची कसोटी लागते. सगळे समविचारी असल्याने खळखळून हसवत आणि हसत चालत होते.
एक एक किस्से बाहेर येत होते आणि नकळत किती चालतोय हे विसरून जात होतो..jpeg)
एव्हाना पहाटेचे चार वाजले तरी समोर सिंहगडचा
काही पत्ता नव्हता. दुरून दिसणारे ते गडावरील लाईट्स किंवा टावर हे काहीच दिसत नव्हते.
खालच्या एका बाजूला भयंकर असं वणवा पेटलेला होता.भीषण असा वणवा किती हानी करत असेल
ते निसर्गालाच ठावूक. मनुष्याला चारा हवा, गवत हवे यासाठी केलेला अट्टहास किती घरटी,
किती खोपे, किती बीळ आणि किती पक्ष्यांची अंडी फस्त करत असेल देव जाणे. असो. आम्ही
तिथं जास्त वेळ न दवडता पुढे जात होतो.
गडकरी ट्रेक दरम्यान आकर्षण काही असेल तर
ते म्हणजे चहा, maggi किंवा भुनलेले बटाटे-कांदे. या ट्रेकने केलेली दमछाक पाहता सगळे
चहाची वाट पाहत होते. मग काय, एक सपाट भागावर gas लावून मस्त चहा बनवला. थोडाफार कोरडा
नाश्ता केला आणि पुन्हा नवा जोश घेऊन सगळे पुढं निघाले. प्रभातकाळी अरुणोदय झाला आणि
समोर सिंहगड दिसू लागला. इथपर्यत सगळं ठीक होतं. अंधार असल्याने किती चढलो आणि उतरलो
हे कळत नव्हत पण मंद सूर्यप्रकाशाने उंच टेकड्या आणि खोल दऱ्या पाहून आम्ही सगळे खरच
हबकलो. सगळे अचंबित होऊन हे एवढं आपण पार करत आलोय हे विस्मयचकित होऊन पाहत होते.

सकाळचे सात ते साडेसातला खाली घाटात पोहोचलो.
सगळे चांगले दमले असल्याने घाट ट्रेक न करता सरळ गाडीने गडावर गेलो. पुणे दरवाजाला
नमन करून ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान वाटले आणि आणि सुरक्षित ट्रेक झाल्याचे सार्थक
वाटले. वरती जाऊन मग भजी, दही आणि चहावर ताव मारून परत निघालो. पुन्हा एकदा वडाप,
मग पी एम पी एम एल बस पकडून शनिवारवाडा, तिथून मनपा ते पिंपळे गुरव बस पकडून घरी निघालो.
शरीर जाम दमलेलं होतं पण हा ट्रेक पूर्ण केल्याचे भाव चेहऱ्यावर होते. आता पुन्हा हाच
ट्रेक होईल कि नाही माहित नाही पण योग्य वेळी योग्य धाडस करत, योग्य नियोजन करत सुरक्षित
ट्रेक केल्याचा आनंद नक्की होता. कुणालाही फारसा त्रास झाला नाही आणि आता यानंतर काय
हीच उत्सुकता गडकरी समूहाला आहे.
- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment