आला पावसाळा....
आला पावसाळा.... ७/६/१७
अखेर मान्सून बरसला. त्याने त्याची डेडलाईन पाळली, वचन पाळले आणि आपल्या सगळ्यांना खुशखबर दिलील. हा पावसाळा म्हणजे जीवन. पावसाळा म्हणजे नवसर्जन. पावसाळा म्हणजे नवी उमेद. पावसाळा म्हणजे नवा संकेत. पावसाळा म्हणजे नवा उत्साह. पावसाळा म्हणजे नवा जन्म. होय, हे आणि अजून फार काही देऊन जातो हा पावसाळा. त्या काळ्या मेघांकडे आस लावून पाहत असलेला आमचा बळीराजा जाम सुखावतो. व्यापारी खुश होतात. सरकारे आश्वस्त होतात. वर्षभर लागणारे पिण्याचे आणि शेतीचे पाणी मिळण्याचा एकमात्र स्रोत म्हणजे पावसाळा. त्यात मनमोहक अनुभव मिळतो जर त्याकडे फक्त त्याच भावनेने पाहावं ज्या भावनेने ही धरती पाहत असावी.
सहजच बाहेर डोकावलो तर मन प्रसन्न झाले. दमवून टाकणारा उन्हाळा आणि त्याच्या मारक, दाहक झळाया संपवत गार, हलकी झुळूक आत येत होती. गरम गरम हवा घेऊन चालणारा वरुणदेव नाचत बागडत मस्त हलक्या सरी आणि मधुर हवा देत होता. घरासमोरची झाडे तर आनंदाने जणू जल्लोष करत होती. तब्बल एका वर्षाने अशी नखशिगांत शाहीस्नान त्या सगळ्यांनी केले असावे. अंगावर आलेली ग्लानी, धूळ, कचरा त्या पावसाच्या धारांनी कधीच धुवून टाकल्या आणि जणू नव्या नवरीसारखे सारे वृक्ष वेली मकडत होते. मस्त डोलत होतेआणि सांगू इच्छित असावे की प्रदूषणाने दबलेले आमचे नाक आज परत मोकळे झाले.
आसपास पाहिले तर धरती जणू बेभान होऊन त्या नभाचे प्रेम आत सामावून घेत होती. पडणारा प्रत्येक थेंब जणू ती प्रेमाचा हुंकार समजून स्वीकारत होती. येणारा पाण्याचा छोटा मोठा प्रवाह काळजात साठवून घेत होती. तिला हेच प्रेम साठवून परत तिच्या लेकराला, त्या टुकार मानवाला परत द्यायचे आहे ना म्हणून. ती वेड्यासारखी हा प्रेमप्रवाह तिच्या गर्भात सामावते आहे. एक वर्ष नशिबात असलेला दुरावा आज नष्ट होतोय. वर्षभर पाहिलेली वाट आज सफल होत ते मिलनाच्या विश्वात दंग झाले आहेत असे वाटले. ना तो नभ प्रेम ओततांना मागे हटतोय, ना ती धरती त्याचे प्रेम पुरे असे सांगत आहे. अप्रतिम असा हा मिलाफ सर्व जणांना सुखावून जावो हिच एक मर्त्य अपेक्षा.
असो,चला त्यांना हा आनंद घेऊ द्या कारण नीट कान दिला तर ती धरती चक्क हे गाणं गात होती असा भास झाला. ....”लग जा गले के फिर ये .....” मनोहर दृश्य, अजोड मिलन आणि न संपणारा अलोट प्रेमभाव. .
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment