सुगरणीचे घरटे..
सुगरणीचे घरटे.... १०/७/१७
दुपारी सहजच खिडकीतून खाली डोकावलं तर पाहतच राहिलो. खाली दिसली ती पाण्याची विहीर. विहीर जुनी असली तरी सर्वांची तहान ती अजूनही भागवत आहे. तिचा नित्यक्रम तिने मोडलेला नाही. मागील महिन्यात झालेला पर्जन्यभार ती स्वत:मध्ये सामावून घेत आहे. तिथे काही अद्भुत असे चित्र पहावयास मिळाले. खाली वीस फुटांवर एक मस्त पिंपळाच झाड आपली माया पसरवत, असलेल्या फांद्या लोंबकळत आपली पाळेमुळे घट्ट करतांना दिसला. थोडासा विटेचा कोपरा थोडा मातीमय झाला असेल आणि तेवढ्यातून मुंडके वर काढत आपले अस्तित्व सिध्द करणारा हा पिंपळ अप्रतिम. त्या पिंपळाचे बीज तेथे कसे पोहोचले हे ते त्या विधात्यालाच माहित. आता तो मागे वळून पाहणार नाही हे नक्की.
त्या पिंपळावरून थोडसे ध्यान बाजूला गेले तर अहाहा....नजर स्थिर झाली. स्थिर काय विस्मयीत झाली. एक दहा फुट अंतर असेल कठड्यापासून एका लिंबाच्या झाडाचे. आपला लीम्बोळीचा कडूनिंब आपले साम्राज्य उभे करू पाहतोय असे दिसले. त्याच्या ७ ते ८ छोट्या आणि कवळ्या फांद्या खालच्या बाजूला लोंबत होत्या. कोवळी कोवळी पाने मस्त चकाकत होती. या सगळ्यात तिथे काही सुगरणी घोंघावत होत्या. किमान ८ सुगरणी घरटे बांधत होत्या. ३ घरटी पूर्ण होऊन त्यात संसार मांडला गेला होता. अगदी अप्रतिम अशी बांधणी. आमच्या स्थापत्य पंडितांना विचार करावयास लावेल असे ते चित्र.
एक अतिशय दुर्मिळ रंगाच्या सुगरणी खूप जास्त घाईघाईने घरटे विणत होत्या. पावसाने घेतलेली उसंत आणि वातावरण यांचा फायदा घेत असाव्यात. एक एक पाखरू उडत जात एक एक काडी घेऊन येऊन उलटे लटकत, तोल सांभाळत विणकाम करत होते. एक एक धागा अतिशय कौशल्याने वीणत ते आपली जबाबदारी पार पाडत असावे. एक एक काडी गोळा करत न थकता हा प्रपंच चालू होता. कधी कधी तर आणलेले गवत आणि काडी तशीच विहिरीत पडून जात होती. विणकाम करताना होणारा हा अपयशी आणि दुर्दैवी प्रकार कोणत्याही सुगरणीला यत्न करण्यापासून परावृत्त करू शकला नाही.
कशाचा ध्यास आहे हा? किती कष्ट करण्याची ही वृत्ती. लटकत्या झाडावर, खोल विहिरीच्या छातीवर घरटे बांधणे किती अभिनव आह्रे. किती दुर्दम्य विश्वास असेल स्वत:च्या कलाकुसरीवर... किती विश्वास त्या विणण्यावर... किती बांधिलकी आहे आपल्या येणाऱ्या जीवाशी. किती काळजी आहे त्या येणाऱ्या चिमुकल्यांची. स्वत:चा जीव टांगणीला ठेवत, धोक्यात घालत आणि अथकपणे यत्न करणारी सुगरण आमची आदर्श का नसावी? तिची काळजी आमच्या आपल्यासाठी नसावी का? संकटे, अडथळे, त्रास, ध्यास सगळं काही माफ या अशा कर्मयोगात.
या सगळ्यात लहानपणी शाळेत शिकलेल्या दोन कवितेच्या ओळी आठवल्या. “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला.” या कवितेतले मर्म त्या वयात कळले नसावे म्हणून की काय त्या परमेश्वराने आज हा खोप्याचा एपिसोड दाखवला असावा. खूप वेळा वाटलं की जवळून हे सगळं पाहावं पण त्यांच्या कामात भंग करावासा वाटला नाही. दुरूनच हे सगळे अनुभवले आणि मनोमन त्या निर्मात्याला नमन केले.
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment