कळसुबाई शिखर ट्रेक अनुभव वर्णन
कळसुबाई शिखर ट्रेक अनुभव वर्णन : (१ फेब्रुवारी २०२५ )
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई शिखर प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते. असेच एक स्वप्न आमच्या गडकरींनी पाहिलं होतं . केवळ काही ठरत नसल्याने ग्रुप मेंबर अजूनही शिखरापासून दूर होते. मागच्या महिन्यात जणू आईनेच आदेश दिला कि दर्शनास ये असं वाटलं आणि थेट तारीख ठरवून घोषणा केली. यात दोन ते तीन ग्रुपवर हे टाकून अंदाज घेतला. यात किमान पाच जण यावेत हा मनोमन आग्रह होता. यात मित्रमंडळी, गडकरी चमू आणि काही विद्यार्थी देखील तयार झाले. किमान आठ जण तयार झाले. या सगळ्यांना पूर्वतयारी काय असावी हे सांगितले. सर्वांनी तसे प्रण करून निर्धारच जणू केला.
तयारी झाल्यावर दिवस उजाडला तो प्रवासाचा. दोन चारचाकी वाहने आणि दहा जण मार्गस्थ झालो. शुक्रवारी संध्याकाळी प्रवास करून रात्री बारी गावात पोहोचायचं ठरले. जातांना नेहमीप्रमाणे सरोज ढाब्यावर आवडते जेवण करायचे ठरले. अगदी दहाच्या आसपास पोहचून मागच्या दाराने प्रवेश मिळवत शेवग्याच्या शेंगा आणि गुळाचा काला पोटभर खाऊन पुढे निघालो. यथेच्छ ताव मारण्यात कसलीही कसर ठेवली नाही कारण लक्ष्य होते कळसुबाई शिखर. एरवी दिवसा ट्रेक केला तर खाण्या पिण्याची सोय होते. पण आम्ही रात्री दोनला निघणार असल्याने हि काळजी घेतली.
रात्री दोन वाजता बारी गावात पोहचून लगेच चढाई सुरु करण्याचे ठरले. किमान तीन ते साडे तीन लागतील असा अंदाज होता. पहिला टप्पा झरझर पार झाला आणि पोहोचलो पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ. आता उत्साह आणि जोश जबरदस्त होता. सगळे एकमेकांना सोबत घेत निघाले. खास करून विद्यार्थी सोबत असल्याने आम्ही जास्त काळजीघेत होते आणि यंग ब्रिगेड सगळ्यात पुढे होती. सोहम आणि यश तर सगळ्यात पुढे होते. धुवमीन आणि अश्वथ देखील योग्य काळजी घेत सोबत चालत होते. हातात torch घेत मार्ग काढत जात होते. गावकरी मंडळीनी सर्वत्र पांढऱ्या रंगाने मार्ग आणि दिशादर्शक रंगवून ठेवले आहेत.आमच्या गडकरीमधील यतीश भाई आणि रिषीभाई तर पहिल्याच ट्रेकला आले आणि तो देखील थेट कळसुबाई . काय अजब हिम्मत आणि आत्मविश्वास. किरण सर देखील ट्रेकसाठी उत्सुक असल्याने ते सोबत आले होते आणि त्यांचा मागच्या काही महिन्यातील अनुभव शेयर करत होते. तेजस भाई म्हणजे उर्जेचा महासागर आणि याची त्या दिवशी परत प्रचीती आली. गडकरीचे अधिष्ठाण म्हणजे प्रशांतभाई नेहमीप्रमाणे संयमित आणि स्थिर चढाई करत होते. असा बहुआयामी ग्रुप असल्याने ट्रेक अजूनच कडक झाला होता. गप्पा टप्पा, छोटे मोठे ब्रेक आणि जय शिवराय आणि जगन्मातेच्या उद्घोषाने उर्जा आणि उत्साह सतत टिकला. कोणीही मागे हटणार नव्हते हे स्पष्ट झाले होते.
दुसरा टप्पा पार करून काहीसे हायसे वाटले. सोब्य कमीत कमी शंभर अजून इतर ट्रेकर वरती जात होते. शनिवार असल्याने गर्दी कमी होती. हीच संख्या रविवारी सकाळी काही हजारात जाते असा लौकिकच आहे तिथला. अंधाऱ्या रात्री तारांगण काही खुलले होते. समोर कृत्रिम झगमगाटाने सजलेली शहरे चिमुकली आणि खुजी भासत होती. कितीही रंगवलं आणि सजवलं तरी कृत्रिमच ते. असो, फार वेळ न दवडता पुढे निघालो आणि आता शिखर समोर आल्याचा भास होऊ लागला होता.
आता टप्पा आला होता शिड्यांचा. या शिड्या देखील खास आहेत. पाऊल चुकले तर थेट दरी असा हा प्रवास. अर्थात रेलिंग भक्कम असल्याने सुरक्षित चढाई करता येते. फक्त गर्दी असेल तर वेळ जातो म्हणून आम्ही शिखरावर लवकर जायचे ठरवले. काही ठिकाण पन्नास तर काही ठिकाणी शंभर पेक्षा अधिक सलग पायऱ्या चढाव्या लागतात. इथे मात्र कस लागतो. पहाटेची वेळ असल्याने मंद वारा आणि थंडीने लोखंडी बार एकदम थंड पडले होते आणि त्यांचाच सहारा घेत शेवटचा टप्पा पूर्ण केला. सकाळचे पाच वाजले असतील आणि आम्ही एक एक करून शिखरावर होतो.
एवढा मोठा ट्रेक करून देखील कुठंही दमछाक
झाली नव्हती.
उलट शिखर समोर दिसताच
एक नवी उर्जा अंगात संचार झाली होती. तिथं पोहचण्याची इच्छा आणि इच्छापूर्ती यातला प्रवास खास होता. थेट जाऊन पहिले
आईसमोर डोकं टेकवलं. डोळ्यात नकळत अश्रू
येणं स्वाभाविकच होतं. एक प्रदक्षिणा घातली
तेव्हा लक्षात आले कि तिथं जोराचा म्हणजे सोसाट्याचा वारा सुरु आहे. भगवी पताका फडफड करत
होती. अंगात एका मिनिटात
थंडी भरेल असा थंड वारा वाहत होता. हे अगदी सगळे अनपेक्षित होते. सगळे आजूबाजूला किंवा मंदिराच्या आसपास बसून आडोसा शोधत सगळे आराम करू
लागले. मी तर काही वेळाने
आतमध्येच गेलो.
आईच्या मूर्तीच्या
आसपास किमान वीस जण निवाऱ्याला बसले होते. तसंही संकटतारिणी आईच असते, नाही का?
आता किमान एक तर दीड तास प्रतीक्षा करायची होती ती सूर्यनारायणदर्शनाची. कळसुबाई शिखरावरील सूर्योदय चुकवू नये असाच असतो हे ऐकले होते आणि त्या दिवशी त्या साठीच आम्ही थंडीत वरती प्रतीक्षा करायचं ठरवलं होतं. हळूहळू सूर्यनारायण एक एक छटा वाटत वरती येऊ लागले होते. डोळ्यात न सामावणारी निसर्गाची किमया पाहून दिवस आणि ट्रेक सफल झाला अशीच भावना मनात वारंवार येत होती. काही वेळाने थोडी फोटोग्राफी करत चहाचे झुरके घेत खाली जाण्याचे ठरले. आई पुन्हा असाच आदेश पुन्हा देशील तेव्हा येऊ असं मनोमन ठरवत केवळ दीड तासात सगळे बारी गावात परतले. थोडा आराम करून परतीचा प्रवास सुरु केला. सगळे चेहरे दमलेले दिसत असूनही त्यात समाधान आणि शाब्बास असा भाव झळकत होता. असो,
ट्रेकिंग आणि सह्याद्रीभ्रमण
साठी सुरु केलेल्या गडकरी नावाच्या छोट्या समूहाने
महाराष्ट्राचे
सर्वात उंच शिखर सर करून एक नवा अध्याय लिहिला. एक छोटीशी चिंगारी भी वही ताकत रखती है जो
जंगल की बडी से बडी आग रखती है ...शक्य होईल तसे आणि वेळ मिळेल तसे फिरून इतिहास आणि सह्याद्रीभ्रमण
करत करत अनेक गडदर्शन पूर्ण झाले आहे. आता लवकरच स्वत:साठी, एकमेकांसाठी, शरीर
स्वास्थ्यासाठी आणि सहयाद्रीप्रेमासाठी अजून खूप काही फिरायचं आहे आणि एक एक करत
अवघा सह्याद्री पालथा घालायचा आहे. आई, शक्ती आणि ताकत दे. संकल्प करतोय, पूर्ती तू करून घेशीलच.
-- प्रा. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment