लेखाजोखा २०२४ (Part 1 )

 


लेखाजोखा २०२४  (Part 1 )

दरवर्षी सरते वर्षं कसे गेले आणि काय काय करू शकलो आणि काय काय महत्वाचे राहून गेले हे मागे वळून पाहता येते. एवढंच नाही तर असा आढावा घेणं म्हणजे सरत्या वर्षाची परत एकदा धावती भेट घेणं देखील आहे.

या २०२४ वर्षाचा उल्लेख निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्रीच्या अवतीभवती झाला असाच करावा लागेल. वयाची चाळीशी पार केल्यानंतर जणू खडबडून जागा झालेला मी किती गड राहिले आणि किती झाले याचा हिशोब करू लागलो. अधीमधी जाणं होतच असतं पण वयाची चाळीशी ओलांडली आणि जणू अलार्म ट्रिगर झाला. तसाही आपल्या आसपास इतका सुंदर निसर्ग आहे आणि तो पुढच्या पाच वर्षात शक्य तेवढा जवळून पहावा अन अनुभवावा हा संकल्प केला.

या प्रवासात सर्वप्रथम फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. सकाळचा व्यायाम नित्य नियम झाला आणि दोनच महिन्यात बदल जाणवू लागला. सुरुवातीला हरिश्चंद्रगड केला तेंव्हा झालेली दमछाक आठवत राहते. नंतर मात्र गडकिल्ले असो वा लंबे लंबे ट्रेक कधीही थकवा किंवा त्रास जाणवला नाही. वासोटा एकाच महिन्यात दोनदा जाण्याचा योग आला. मस्त कॅम्पिंग, बोटिंग आणि कडक ट्रेक असा वासोटा आनंद देऊन गेला. काही खास विद्यार्थ्यांसमवेत घालवलेला वेळ खास होता. अगदी पालक जेव्हा म्हणतात की केवळ तुम्ही सोबत आहात म्हणून मुलांना ट्रेकला बाहेर पाठवत आहे असे ऐकल्यावर जबाबदारी आणि दडपण येतेच पण मुलांनी शिस्त आणि नियम पाळत खूप मज्जा केली. आठवणीत राहिल असा तो ट्रेक झाला.

जवळच्या मित्रांना माहित आहे कि थोडंफार सोशल मीडियात रमते आमचे कुटुंब. वेळ मिळेल तसा रील किंवा डान्स करत असतो. Instagram च्या दुनियेत रमताना आशिष सरांनी शूट केलेला तृप्ती आणि माझा एक सहज डान्स केलेला विडीयो चक्क  1 million plus व्युज्स देऊन गेला.  म्हणजे या आभासी जगात कुणाला काय आवडेल आणि कसे आवडेल हे कळणे अवघड आहे. अर्थात त्यातला आनंद घेता आला तरच ठीक नाहीतर केवळ वेळ वाया जाण्याची दाट शक्यता आहे.

डान्स तसाही आमच्या आयुष्यातला जोडणारा धागा आहे. संपूर्ण कुटुंबच नृत्यात रमतं आणि हे असंच रहावं जेणेकरून आनंद मिळत राहिल. एखादं गाणं घरात  वाजलं आणि आमचे पाय थिरकले नाही तरच नवल. वैभव सरांनी याच वर्षात स्वरूपा सोबत एक मस्त विडीयो करून घेतला आणि लेकरासोबत डान्स करायला खूप मजा आली. एक एक स्टेप लक्षात ठेवून रिदम सांभाळत डान्स केला होता. बाबा आणी कन्या हा हळवा संबंध आम्हाला या एका रूपाने अजून घट्ट करता आला. स्वरूपाला पाठीमागून उचलून पुढे टाकणे हा अवघड प्रकार  करू शकलो कारण स्वरूपा माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून डान्स करत होती. असो. 

VJ डान्स स्टुडियोच्या वार्षिक शो मुळे बरंच काही करायला मिळाले. पालक आणी निवेदक अश्या दोन भूमिका करायला मिळतात हे समीकरण मस्त जुळलं आहे. दोन्ही कन्या देखील त्या डान्स रुटीन मध्ये रमल्या आहेत. गेल्या वर्षात आजारपण आसपास भरकटले देखील नाहीत याचे कारण डान्स आणि व्यायाम यातली नियमितता आहे हे नक्कीच अधोरेखित करावे लागेल.  शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम | आपण हवा तो व्यायाम किवा जमेल तो उपाय करत स्वत:चे शरीर कसे सुदृढ आणि फिट राहिल याचे जास्तीत जास्त चिंतन आणि अवलंबन झाले या सरत्या वर्षात. योग, डान्स, सूर्यनमस्कार, रनिंग, वॉकिंग असे आणि याहून अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जमेल ते सातत्यानं करत राहिल्याने गड किल्ले आणि सह्याद्रीची सैर अगदी सहज सुलभ झाली.  हाच उत्साह आणि जोश फिटनेस साठी येत्या वर्षात अजून टिकू दे रे महाराजा.....

 

क्रमश:

प्रा. सचिन शंकर गाडेकर

 


Comments

Popular Posts