देवा श्री गणेशा २३/९/१८
देवा श्री गणेशा २३/९/१८
आपला देश उत्सव आणि सणवार यांनी सजलेला आणि नटलेला आहे. भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत हे नक्की. त्यात रंग भरते आपली विविधता आणि त्यातच दडलेली सभ्यता. या सभ्यतेपुढे एक पाउल चालत उभी राहते ती संस्कृती. जीवन जगत असतांना जीवनात येणारी तीच तीच पध्दती किंवा तोच तोचपणा हे उत्सव नकळत दूर करतात.
रोजच्या धडपडीत काही वेगळे अर्थगणित उभे करत उत्सव साजरे होतात. कुणालाही हे उत्सव दडपण किंवा अडचण वाटत नाहीत. अनेक उत्सव घरात, कुटुंबात साजरे होतात आणि काही थेट सामाजिक रूपात. घरात न सांगता गोडधोड बनते. घर एकत्र येत तयारी करते हे विशेष. आजच्या सजावटीच्या वस्तू बाजारात मिळतात म्हणून काम सोपे झाले एवढे नक्की.
गणपती उत्सव हा तसा कौटुंबिक आणि सामाजिक अश्या दोन्ही स्वरुपात साजरा होतो. वेळ नसलेल्या किंवा वेळेत अडकलेल्या जनमानसाला हा उत्सव एकत्र आणतो. शहरात तर एकाच इमारतीत राहून देखील एकमेकांच्या सुख-दु:खात सामील न होऊ शकणारे सहजच एकत्र येतात काय आणि सजावट करत गप्पाष्टके रंगवता काय... सगळं काही अगदी तसंच जसं हवं आहे. बऱ्याचदा एकमकांना समजावून घेत अडचणी येतातही. व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच. या सगळ्यामुळे काही दिवस का होईना एक जीव दिसतात सारे.
पर्यावरण आणि त्याचे संवर्धन हा देखील एक मोठा प्रश्न जुडतो या आणि अश्या अनेक उत्सवात. नकळत व्यक्तीने संवेदनशील होत अनेक बाबींचे पालन केले पाहिजे. मग ते कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो अथवा गर्दी असो. उत्सव आणि त्यामागचा सौहार्द आजकाल थोडा हरवला आहे हे नक्की. गणेशोत्सवात गेली अनेक वर्ष आता शाडू वापरला जातो याचे कारण तेच.
या संपूर्ण उत्सवात गणपती बाप्पाचे काही गुण समजून घेता यावेत असे अपेक्षित आहे. बाप्पाची स्थापना आणि विसर्जन यातील दीड, तीन, पाच, सात किंवा दहा दिवसांचा प्रवास जास्त भावनिक आहे. आपण मंडप, रस्ता, ध्वनीप्रदूषण आणि डीजे यातच अडकल्यामुळे तो भावनिक टप्पा हरवलेला दिसतो. प्रत्येक गोष्टीत वाद ओढवून घेत आपण त्यातली साजुकता, मार्दव आणि प्रसन्नता हरवून बसलो आहोत. एखादाही उत्सव मांगल्याने उजळावा असे होताना दिसत नाही. डोक्यात घुसवली जाते ती नकारात्मक बाजू. चला तर समजूयात विधायक आणि सकारात्मक बाजू.
खरे पाहीले तर बाप्पाचे घरात आगमन हा एक सोहळा आणि उत्सव आहे. त्याचे परत जाणे एक भावनिक प्रसंग आहे. घर, सोसायटी आणि नगरे यांना सजवून टाकत नवी उर्जा भरणारा उत्सव कश्याने लक्षात रहावा हे आपण ठरवावे. बाप्पाला निरोप देतांना डोळे पाणावतील आणि आस लागेल पुन्हा त्याच्या येण्याची.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment