तिळगूळ घ्या गोड गोड बोला!* १३/१/१९

*तिळगूळ घ्या गोड गोड बोला!*
१३/१/१९

भारतीय अनेक सणांपैकी इंग्रजी तारखेस धरून चालणारा बहुदा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत. इंग्रजी नव्या वर्षातला उत्सव आहे हा. आजच्या धावपळीत आणि गडबडीत काही गोष्टी गरजेच्या आहेत हे नक्की. संक्रांतीला उत्तरायण सुरु होणे, सूर्याचा अमुक राशीत प्रवेश होणे हे सगळे शास्त्र आपसूकच सांगते. यात अनेक गोष्टी आहेत. हा उत्सव काही राज्यात अगदी सार्वजनिक बनला आहे. महराष्ट्रात गणेशोत्सव तसा गुजरातेत पतंगोत्सव. घराघरावर उडणारे मनमोहक पतंग आणि संगीतसाथ एक अनोखे चित्र असते. 

या सगळ्यात दसऱ्याची आपट्याची पाने आणि संक्रांतीचे तिळगूळ नेहमी गोंधळ उडवतात. मला तर अनेकदा प्रश्न पडायचा की सोने कोणी कोणास द्यावे आणि तिळगूळ कोणी कोणास द्यावे? या कोणी कोणास द्यावे या वादापेक्षा किमान द्या तरी असा एक सूर ऐकावयास मिळतो. एकदा एका आजीने समजावले होते की सोने लहानांनी मोठ्यांना द्यावे कारण ते मौल्यवान आहे. ते सांभाळायला किंवा जतन करायला द्या. संक्रांतीला दिले जाणारे तिळगूळ हे मोठ्यांनी लहानांना द्या कारण तो खाऊ आहे. त्यांना ते आवडते. अगदी ढोबळमनाने सांगितलेले हे स्पष्टीकरण पटले देखील. अर्थात हेच पूर्णसत्य असे नाही. ज्येष्ठांनी अजून प्रकाश टाकला तर बरे होईल.

तिळगूळ हा प्रकार आणि त्याशी जोडलेली गोड प्रथा फार महत्त्वाची आहे. झरझर पसार झालेल्या काळात कळत-नकळत झालेला दुराभाव काही अंशी कमी करत तो संबंध पुढे नेण्याची संधी आहे ती. अनेकदा आपला “ग” म्हणजेच आपला अहं कुरघोडी करतो आणि मन बुध्दीला झाकून टाकतो. त्यांना न जुमानता स्वत:ची रुक्ष, अहंभावी आणि स्वार्थी भिंत उभी करतो. एकवेळ दोन जर्मनीतली भिंत किंवा ग्रेट वॉल चायना लवकर तुटेल पण स्वत:च स्वत:भोवती विणलेले अहंजाल सर्व काही उध्वस्त करू शकते. नकळत मने दुरावतात आणि अगदी कोमल पुष्पे कधी कोमेजून जातात हे कळत देखील नाही. आजचा दिवस बहुदा यासाठी जस्त गरजेचा वाटतो. एक चिमुटभर तीळ आणि एखादा अर्धा ग्राम गूळ बिघडलेले संबंध ठीक करण्याची एक सुवर्णसंधी देऊन जाते हे फक्त आपलीच भव्य दिव्य संस्कृती करू शकते. जर मनाची इच्छा असेल तर अश्या छोटेखानी आदानप्रदानाने देखील जटील गुंते सुटलीत असा विश्वास हे उत्सव देतात. काही प्रांतात असेच काहीसे होळीला होत असावे.

काळ वायू वेगाने पसार होतोय हे जसे सत्य आहे तसेच त्या काळाला सावरत, संबंध सुरळीत करत एका प्रकारे आपण त्याला मुठीत घेत आहोत. काळ मोठ्या मोठ्या आठवणींना स्वत:च्या पोटात गडप करून टाकतो. ‘काल: पिबति तद रसम ’ काळाचा महिमा सर्वश्रुत आहेच. वर्षानुवर्षे जुडलेल्या गाठी काळ अश्या काही सैल करतो की कालचा सखा आजचा काहीच उरत नाही. या रोगाला एक नाही तर अनेक औषधी लागतील. त्यातली एक जडीबुटी म्हणजे तिळगूळ. जेवढे कमी उसवले असेल तेवढे कमी श्रम पडतील टाका टाकायला. वेळीच दोन टाके घातले तर फुल्ल रफू करावं लागणार नाही हो!

चला तर या वर्षीचे तिळगूळ अश्या काही हरवलेल्या, उसवलेल्या, भरकटलेल्या नात्यांना अजून एक आशा, दिशा आणी तुष्टी, पुष्टी देऊ.

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

--- सचिन गाडेकर

Comments