जागतिक महिला दिन अन शुभेच्छा । 8 मार्च, 2019

जागतिक महिला दिन अन शुभेच्छा ।
8 मार्च, 2019

आज महिला दिन साजरा करण्यात येतोय अन सगळीकडे शुभेच्छा अन महिला कोडकौतुक चालू आहे. या एक दिवस चालणाऱ्या वर्षावात थोडासा छिडकावा करावा असे खूप आहे.

आपल्या पुरुषप्रधान समाजात महिला दिन साजरा होतोय हा सुद्धा एक चांगला संकेत आहे. संकेत आहे किमान ''पायातली वहाण पायात ठेव'' अशी शिकवण मागे पडतेय. सर्वात चांगले म्हणजे ती स्त्री स्वतः जागरूक होतेय की तिचे काय अधिकार अन काय अवस्था आहे.

सुरवात करूया त्या अर्भक स्वरूपातील गोळ्यापासून. घरातील दबाव तो सुद्धा ''होऊन जाऊ द्या, काही आहे का आता?'' असे दिवसरात्र टोमणे अन खोचक तिरकस बाण झेलणाऱ्या त्या जिवापासून. जन्माला घाला तर तो सुद्धा मुलगा हवा म्हणत जन्मापूर्वी काय तर घडण्या पूर्वी हत्या होणाऱ्या त्या सगळ्या मुलींना happy women's day. जन्माला आलीच तर तोंड वाकड करत तिच्या जन्माला अपशकुन मानणारी एक स्त्रीच असते बरेचदा. तिच्या पदराखाली लपून हे दुष्कृत्य करणाऱ्या त्या नराधमाना सुद्धा happy women's day .

पुढे आलीय जन्माला म्हणून वाढवणारी तिची आई कशी बशी तिला सांभाळू लागते अन दिवसातून 100 वेळा घरातील इतर मुलांसोबत त्या मुलीची तुलना करत तिला हिनावणाऱ्या सन्माननीय सदस्यांना सुद्धा happy women's day. तू मुलगी आहेस ना? तू पराया धन आहेस ना? लोक काय म्हणतील? डाव्या  हाताने असे कसे खातेस? अशी कशी बसतेस? असे कसे कपडे घातले? वाह रे नियमावली.... असे मूलभूत अन फालतू सदर मुलीच्या डोक्यात घालत तिचे खच्चीकरण करणारे महाभाग अन तिच्या खऱ्या शत्रूंना happy women's day.

पुढे ती शिकायला जाते तर तिथे तिला परत लढावं लागतं ते अस्तित्वासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी. यात आमच्या पुरुषप्रधान  व्यवस्थेंने बनवलेले मोजमाप तिच्या कपड्यांचं गणित मांडू लागतं. कोण आहेत हे राक्षस ? हेच आई वडील जितक्या वेळा मुलीला सांगतात   की कपडे कसे घालावे अन असे हसू नये इत्यादी इत्यादी... तेवढेच मुलाला पण सांगावे कि नजर कशी ठेवावी? मुलींशी कसे वागावे? मुली बापाचा माल नाही. त्या फक्त वासनेचा भोग नसून मायाळू आई, प्रेमळ बहीण अन जीव ओवाळून टाकणारी मुलगी आहे कोणाची तरी. हे आपल्या मुलाला न सांगणाऱ्या आंधळ्या अन पापी आई वडीलांना Happy women's day.

काळाच्या ओघात ती शिकते, पायावर उभी राहते, स्वतः स्वावलंबी बनते अन नोकरी, व्यवसाय करू लागते. तिथे गरज नसताना महिला आरक्षण बद्दल बोलत तिच्या कष्टाला मलिन करणारे असतातच की.तिच्या कर्तृत्वाला आपल्या बोथट अन संकुचित फूट पट्टीने मोजून स्वतःचीच किंमत काही ठरवतात. तिच्या या कर्तृत्वाला न ओळखू शकणाऱ्या सर्व शंकासुर जणांना Happy women's day.
ती बाहेर पडली तर तिने परत कधी यावे यासाठी अनेक तर्क वितर्क लावले जातात. सातच्या आत घरात चा नियम म्हणजे इतर सर्व पुरुष समाजाकडे अपराधी अन अविश्वासू नजरेने पाहणे अधिकृत केल्या सारखेच आहे. कोणत्याही वेळी माझी आई, बहीण, मुलगी बाहेर पडू शकत नाही ही अशी कमजोर अन वासनांध समाज व्यवस्था आपण उभी केलिय. मुजोरी त्यावर अशी की एखादा प्रकार झाला तर ती मुलगी एवढी रात्री तिथे का गेली? कपडे अशे का घातले, लडको से गलतीयां हो जाती हैं  असे म्हणत बौद्धीक दिवाळखोरी दाखवणाऱ्या सैतानांना happy women's day.

बरे तीच्या लग्नाला वय वाढत आहे मग द्या हात पिवळे करून म्हणत तिला या बाजारात उभे केले जाते. आता तरी हुंडा वगैरे कमी ऐकू येतंय. तिने सर्वस्व सोडावे अन सासरी जावे. तिच्या अपेक्षांचं ओझं तसंच राहतं अन ती नव्या विश्वात रमून जाते. तिच्या मुक्या अन अव्यक्त भावना अन इच्छा न समजून घेत फक्त तिची फरफट होते अनेकदा, आयुष्यभर... तिच्या डोळ्यात अश्रू उभे करणाऱ्या त्या क्रूर अन हतबल पती परमेश्वर गटाला Happy women's day.

तीच्या पंखांना काही जण बळही देत असतील ,तिला उभारी देखील मिळत असेल पण तिचा एक दिवस तरी काही काळ विचार करत सन्मान व्हावा अन तो क्षणिक नसावा. एक जन्मदात्री , एक शिक्षिका, एक आजी, एक मैत्रीण, एक पत्नी असे अनेक नाते महिला निभावते अन त्यात तिचा सन्मान व्हावा हेच आद्य कर्तव्य.
पुन्हा एकदा सर्व जणांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।

--- सचिन गाडेकर

Comments