फादर्स डे ....
फादर्स डे ....
आज जून महिन्यातला तिसरा रविवार असल्याने सगळीकडे फादर्स डे साजरा होतोय. गेल्यावर्षी लिहिलेलं हे सदर पुन्हा शेयर करत आहे. एक पिता आपल्या लाडक्या लेकीला काही सांगत आहे. आपल्यातल्या त्या बापाला नक्की आवडेल .
अरे माझ्या लेकरा, माझ्या सोनुल्या, माझ्या बछड्या ...
मीच बोलतोय, होय मीच. तुझा पिता, पिताश्री, बाप आणि अजून बरीच नावं आहेत मला. मुळात माझं काय नाव आहे मीच विसरतो कधी कधी. व्यापच आहे तेवढा. त्यात माझा रोल कुटुंब प्रमुखाचा; नाही का? म्हणजे मी टफ असलं पाहिजे. मी सगळ्या जबाबदारीच्या बाजू सांभाळल्या पाहिजेत. सगळे सोपस्कार पूर्ण केले पाहिजेत. मी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आज सगळं तुला मन मोकळे करून सांगायचं आहे बाळा. ऐक हा कानात प्राण ओतून.
मला माहित आहे तुझ्या खूप साऱ्या तक्रारी आहेत, खूप नाराजी आहे माझ्याबद्दल. मला तुझे सगळे शब्द जसेच्या तसे मान्य आहे सोन्या. तू माझा जीव आहेस आणी माझ्या श्वासाचे कारणही. माझी हरेक धडपड फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी.
आता बघ, तू म्हणतेस की बाबा मला वेळ देत नाहीत. वेळ? मला माझाच कुठे उरतो ग वेळ? कुत्र्यासारखं वणवण फिरत, एखाद्या घाण्याच्या बैलासारखं काम करून थकतो मी रोज. पण तरी ओवरटाईम करतो कारण तुझी, कुटुंबाची एखादी हौस मी पूर्ण करू शकेल. तुमच्या इच्छा, अपेक्षा,स्वप्ने नेहमीच डोळ्यासमोर तरळत राहतात रे. लहानपणी अनेक गोष्टी फक्त पाहायला मिळाल्या. खूप सार मनात असायचं पण कधी व्यक्त करत नसायचो कारण ते कसं मिळणार याचं उत्तर कठीण होतं. आज मी तोच विचार करतो आणि अंगावर काटा येतो कि जर एखादी गोष्ट तू मागितलीस आणि मी देऊ शकलो नाही वा अपुरा पडलो तर मला ते सहन होणार नाही.
तू म्हणतेस कि बाबा खूप कडक आहेत. नुसते शिस्त लावतात. नुसते रागवतात. आता काय करणार? सगळी माया ती माऊली देते. मला देऊन टाकलाय शिक्का शिस्तीचा. मला सुद्धा वाटत की तुझे भरभरून लाड करावेत बाळा. तुला सगळे नियम मोडत मोकळीक द्यावी. मी माझ्या कर्तव्य आणि भावना यातच अडकतो सोन्या. जरी तुझे प्रत्यक्ष लाड करत नसेल पण तुझ्या सगळ्या हौस मौज माहित आहे. तुझे आवडते चोकलेट ते आईसक्रीम सगळं सगळं मला पाठ झालय. तू रात्री झोपतेस ना तेंव्हा मी तुझ्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत बसतो आणि स्वत:ला भाग्यवान समजतो. किती आणि काय काय करू असं होऊन जातं मला.
तू म्हणतेस की बाबा हे विसरले,ते विसरले. बाळा तू पहिला शब्द उच्चारला तो देखील अजून माझ्या कानात गुंजत आहे. तू बोबड्या सुरात गाइलेली बडबडगीते माझ्यासाठी अजरामर झालीय. तू पहिल्यांदा चार पावले चाललीस ना तेंव्हा सर्वात जास्त खुश मी झालो होतो. ते. तुझे दर महिन्याला फोटो काढून ठेवले कारण तू कधी भरकन मोठी होऊन जाशील मला कळणार देखील नव्हते. तू झोपतांना बाबा हेच गाणं म्हणा असा हट्ट करत असत आणी मी तुला खांद्यावर झोपवत स्वर्गसुख अनुभवत होतो. तू एकदा मला हाताने भरवलस आणि मला ढेकर आला होता. असे एक न अनेक आठवणी घेऊन मी जगतोय. खर सांगू, तू माझ्यातल्या माणसाला जन्म दिलास. मला माणूसपण दिलं.
तू अस ही म्हणतेस की बाबा असे कसे हो व्यस्त राहता तुम्ही? कसं सांगणार बाळा तुला? तू आलीस नऊ महिने आईसोबत. मला तुझा सहवास तसा कमीच. आम्ही सर्व पुरुष तसे याबाबतीत कमनशिबी. तु माझ्यासाठी परीस आहेस. होय, तुझ्या येण्याने मी पूर्ण झालो. मी हे जाणतो की तू झरझर मोठी होत आहेस. अशीच मोठी होता होता एक दिवस मला परक करून निघून जाशील. तो प्रसंग नुसता कल्पना केला तरी डोळे पाणावतात बाळा. तुला हे सगळं कसं समजणार हेच कोडे मला नेहमी पडते. तुझे सारे हट्ट, लाड मला भरभरून पुरवायचे आहेत ग. एका बापाच्या नशिबात येणारे हे आविर्भाव समजायला बापच व्हावं लागेल. खूप काही करायचं आहे लेकरा तुझ्यासाठी.
फक्त एक विनंती की
मी वेळ देत नाही अस म्हणू नकोस.
मी प्रेम करत नाहीस अस समजू नकोस.
मी काळजी करत नाही अस मानू नकोस.
मी एक बाप आहे हे मी विसरणार नाही आणि तू देखील विसरू नकोस.
तुझा लाडका, कठोर, बिझी बाप
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment