पुन्हा एकदा बस आणि बस्स....22 /2 / 2020

पुन्हा एकदा बस आणि बस्स....

काल काही निमित्ताने बस ने प्रवास करावा लागला. एरवी देखील राज्य परिवहन हेच उत्तम साधन असते. काल मात्र कामात वेळ गेल्याने नेहमीची बस चुकली आणि मग समोर उभी असलेली दुसऱ्या राज्याची बससेवा घ्यावी लागली. अर्थात हे सांगायला नकोच की त्याचे भाडे तुलनेत कमी होते, कंडक्टरची भाषा स्वागताची होती आणि बस मधील स्वच्छता उत्तमच होती. 
आता नाईलाजाने सुरू झालेला हा प्रवास मस्त रंगला. अगदी हिरवंस विड्याचं पान रंगाव तस्स. 
गाडी महानगर हद्दीतून जातांना एकदम लोकल झाली. 

 हा कंडक्टर जणू ठरवूनच आला होता की सगळी आसने भरली तरच गाडी रवाना करेन. कोणी हात दाखवला की थांबवून गाडीत बसवत होता. अश्या वेळी माझ्या मनात काय विचार आला असेल हे सांगायला नको. का आम्हाला हे परिवहन आमचे वाटत नाही देव जाणे!

नंतर अर्धा तास गेला आणि बऱ्यापैकी सगळी आसने भरली होती. तितक्यात एका औद्योगिक नगरी जवळ गाडी थांबली. त्या ठिकाणी किमान 40 लोक उभे होते. पुण्यात कामाच्या शोधात आलेले लोक दिसले. त्यात वय वर्षे 18 ते 25 च्या गटातील सर्व तरुण आणि प्रत्येकी एक जीवनसाथी आणि कडेवर एक किंवा दोन लेकरं देखील होती.

 परप्रांतीय असे त्यांना मी म्हणणार नाही कारण हा देश सर्वांचा आहे आणि कामाच्या शोधात कोणीही कुठेही जाऊ शकतो. असो, ही सगळी मंडळी गाडीत उभी राहिली कारण जागा अजिबात नव्हती देखील. त्यात स्त्रिया तर बाळांना घेऊन उभ्या होत्या. मग हळूहळू सगळे मधल्या जागेत बसून सेट झाले आणि त्यांच्या स्थानिक भाषेत बोलू लागले. ती हिंदी नक्कीच नव्हती हे लगेच लक्षात आले.

त्या सगळ्याचे कपडे आणि अवतार पाहून खरंच वाईट वाटत होते. आजही त्यांची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज येत होता. एवढ्या  दूर येऊन गरिबी आणि अठरा विश्व दारिद्र्य यांच्याशी ते लढत असावेत असा कयास मी बांधला.  एक चिमुकला झोपेत डुलक्या घेत होता म्हणून त्याला मांडीवर झोपवले आणि तो चक्क गाढ झोपला काही वेळ. गाडीच्या आवाजाने तो उठला आणि थेट वडिलांकडे गेला.

गाडी धावत होती आणि मनात त्याही पेक्षा जोरात विचार थैमान घालत होते. किती ही आर्थिक विषमता..किती मोठी दरी निर्माण झाली आहे समाजात... फक्त जगण्यासाठी आणि ठिकठाक राहण्यासाठी सुद्धा केवढा संघर्ष करावा लागतो प्रत्येक जणाला.

नंतर या सगळ्यात एक मात्र लक्षात राहील ते हे. त्यातील प्रत्येक मुलाच्या तोंडात मावा किंवा गुटखा होता आणि स्त्रीच्या तंबाकू. समोरासमोर हे सेवन सुरू होते आणि खिडकीतून थेटबाहेर  अगदी (spitting Cobra) कोब्रा सापासारखे विष फेकणे सुरू होते.  किती पैसे बरबाद होत असतील या अश्या सवयीमुळे! केवळ खिशातील पैसे नाही तर नकळत शरीराची होणारी हानी किंवा  खराबी याची कुणालाच काही पडलेली नव्हती.

आर्थिक विषमता सर्वांना दोन भागात विभागात आहे, स्वतः च्या स्वास्थ्याचे अज्ञान लोकांना अजून जास्त गरिबीच्या गर्तेत घेऊन जात आहे आणि लोकसंख्येचे मानगुटीवर बसलेले भूत असे काही पछाडत आहे की कळतच नाही याला काय उत्तर असेल.

असो, हा प्रवास इतका रंगला की तो बेरंग झाला. कधी गाडीतून खाली उतरेन असे झाले होते. दैव बलवत्तर म्हणून सहा तास लवकर संपले आणि सुटकेचा निश्वास सोडला. बस सुटली होती पण प्रश्न अजून जटिल झाले होते. झोप सुध्दा हिम्मत करत नव्हती यातून बाहेर पडत मला शांती देण्याची. 
शेवटी हलकेफुलके संगीत लावत मनाला रेटत झोप अंगिकारली आणि निवांत झालो.

-- सचिन गाडेकर

Comments