होय ,मी ऑनलाईन काम करतोय


होय ,मी  ऑनलाईन काम करतोय १७/७/२०२०

झाले शाळा कॉलेज बंद आणि शिक्षण ऑनलाईन होतंय |
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर  मात्र हे  गडांतर येतंय |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

आता ठरल्या वेळेप्रमाणे मी देखील ऑनलाईन जातोय |
आले का रे सगळे असं अनेकदा जिव्हाळ्याने विचारतोय |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

वेळ तशी झाली आहे पण नेटवर्कमुळे इतरांना उशीर होतोय  |
अजून थोडं थांबू की करू सुरुवात रोज एकच  प्रश्न पडतोय  |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

चला, सुरु करूया म्हणत श्रीगणेशा मी जोशात करतोय  |
आहेत सगळे ऐकत असं मानत स्क्रीन समोर बोलतोय  |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

पडला असेल का  प्रश्न कुणाला असा प्रश्न मला पडतोय   |
chatbox मध्ये तरी बोला  करा अश्या  विनवण्या करतोय   |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

कोणी येतं तर कोणी जातं कारण नेटवर्क येतंय जातंय   |
देव जाणे एवढ्यातून कुणाच्या पदरात किती पडतंय   |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

काही भले बुरे अनुभव सुद्धा यात मी गाठीला बांधतोय   |
फार काही नाही झालं तरी संयम मात्र पक्का होतोय   |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

मुलं सुद्धा यात वेठीस आहे हे मनाला समजावतोय  |
शक्य जेवढं  नक्की देऊ तेवढं नक्की करू पाहतोय  |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

आहे काळ कठीण परी मी फक्त सकारात्मकता पाहतोय |
समजून घेऊ एकमेकांना असे रोज मुलांना समजावतोय |
होय ,मी  ऑनलाईन काम करतोय

-- डॉ. सचिन शंकर गाडेकर




Comments