थंडी आणि अलार्म २८/११/२०२०
थंडी आणि अलार्म २८/११/२०२०
हिवाळ्याची थंडी तीच काम चोख बजावत होती. मी सुद्धा पूर्ण तयारीतच होतो. झोपतानाच आवडते पांघरून म्हणजे माझं आकाशी रंगाचे कांबळे पांघरूनच झोपलो होतो. आठ तासांची झोप कधीच पूर्ण झाली होती परंतु थंडीची ढाल घेत मी पहुडलो होतो. अर्थात हिवाळा आणि मस्त निवांत झोप हे समीकरण एकदम झक्कास आहे.
ही सुखनिद्रा अशीच चालू राहिली असती पण मध्येच काल झोपताना सेट केलेला रिपीट अलार्म त्याच काम करू लागला. मीच स्वत: सेट केलेलं श्रवणीय संगीत कानावर हळुवार पडत होतं. किमान झोप मोडली आणि निद्रासुख हरवले तरी स्वत:वरच संताप व्हायला नको यासाठी केलेला हा सगळा प्रप्रंच. किमान आवडतं संगीत ऐकत उठावं आणि मस्त एक स्मितहास्य करत, डोळे चोळत थेट फ्रेश व्हाव हा सगळा मानस असतो रोज.
या सगळ्यात आपला मालक मस्त निद्रासुख घेतो आहे हे त्या अलार्मला का कळत नाही,काय माहित? बऱ , तो एकदा बंद केला तरी रिपीट मोड आपणच सेट केल्या असल्याने तो पुन्हा त्याचे काम करू लागतो. अगदी वैतागून आजूबाजूला हात मारत शेजारच्या टेबलावर ठेवलेला फोन हातात घेत त्याला बंद केला. फोन दूर ठेवण्याचे कारण देखील हेच होते क किमान त्यामुळेतरी पांघरून काढून फोन घ्यावा लागेल आणि या सगळ्या प्रपंचात किमान झोप आवरता येईल असा काहीसा प्रयत्न.
एकदा का हा अलार्म वाजला की सगळा व्याप, सगळे कामकाज पाणी पीता पीता डोळ्यासमोर येऊ लागते. दिवसभर काय काय ठरवून ठेवले आहे हे विचार घोंघावू लागले. काल पूर्ण न झालेली कामे अलगद एखाद्या टोचणीसारखी समोर उभी राहत वेदना देऊ लागल्या होत्या. कालची आणि आजची अशी सगळी पोथडी आणि मी यातली ढाल आणि भिंत बनलेली निद्रादेवी केव्हाच पसार झाली होती. ब्रश असो वा स्नान सुद्धा मंत्र म्हणता म्हणता चक्क विचारात घेऊन जातात. आणि आज ही तेच झाले हो.
एक छोटासा अलार्म आपणास नीरव शांतीच्या गुहेतून क्रूरतेने बाहेर खेचत वास्तवात आणतो. हा अलार्म नसता तर किती मस्त जीवन असते असा सुमार विचार सुद्धा मनात येऊन गेला. एवढंच नाही तर ज्याने या अलार्मला snooze ही सुविधा दिली असेल तो मात्र धन्यवादास आयुष्यभर पात्र राहील हे नक्की.
आता आज झोपतांना अलार्म लावला आहे की नाही हे पुन्हा नक्की पाहीन आणि बहुदा असाच काहींसा अनुभव उद्याही येईल की नाही काय माहित?
असो, बघा, तुमचा अलार्म असंच काही घडवतो का?
--- डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment