लेखाजोखा २०२० (भाग ३)

गेल्या वर्षाचा लेखाजोखा मांडताना नकळत नकारात्मक सूर येतो आणि तसे होणे साहजिकच आहे. परंतु जशी काळ्या नभाला देखील एक सोनेरी किनार असते तसे बरेच काही घडले या टाळेबंदीच्या काळात. घराघरात पुन्हा रुजलेली पाककला हेच सांगत होती की विनाकारण छोट्या छोट्या पदार्थांसाठी एवढे परावलंबी असतो. खास करून माता भगिनी यांनी जे संयम दाखवला  आणि कष्ट घेतले त्याला फक्त नमस्कारच करू शकतो.  ज्याला जे आवडते ते जर करावयास वाव मिळाला तर अजून काय हवे?

टाळेबंदी सुरु झाली आणि सगळे एकमेकांना फोन करू लागले. आमच्या कॉलेजचा ग्रुप (जो whatsapp वर सुद्धा थंडच असतो) अचानक विडीयो कॉल वर बोलू लागला. यात सगळे एकमेकांची विचारपूस करत ‘काळजी घ्या रे’ असे सांगत होते. तब्बल १० वर्षांनी अशी भेट खास होती. कार्यालयीन वेळेत रोज रोज भेटणारे सुद्धा वेळ काढून, ऑनलाईन काम सांभाळून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा झूम भेटून गप्पा मारत कोटा पूर्ण करू लागले. जुने जीवश्च कंठश्च असणारे मित्रगण न चुकता सतत संवाद करू लागले. एक नक्की लक्षात येत होते की भेटणे, बोलणे हेच खरे जगणे आहे. बाकी फक्त सोपस्कार उरतात. 

मी तर दुसऱ्याच दिवशी अश्याच काही लिहिलेल्या कवितांची वही बाहेर काढली आणि त्यातली एक एक कविता वाचन करत ते फेसबुक किंवा तत्सम माध्यमांवर शेयर करणे सुरु केले. म्हणता म्हणता रंग भरला आणि कधीही वाटले नव्हते की मी या कविता सादर करेन ते ही अश्या काळात. गेली कित्येक वर्षे स्वानंदासाठी लिहिलेले सार्वत्रिक करू शकलो याचा आनंदच आहे. 

काही निवडक कविता सादर केल्यावर एक संवाद मालिका सुरु केली. अगदी तीन ते पाच मिनिटे एक प्रश्न आणि त्यावर जे जे ऐकतील ते उत्तर पाठवतील. अगदी साधा ढोबळ असा हा संवाद शेकडो जणांशी जोडून गेला. फेसबुक असो, whatsapp असो वा युट्युब, सगळीकडे अतिशय सुदंर आणी भावविभोर करणारे प्रतिसाद आले. रोजच्या जीवनातले प्रश्न सुद्धा अप्रतिम उत्तरीत होत होते आणि ते ही अगदी सहजपणे. 

सर्वात ज्यात आनंद देऊन गेली तो सुभाषित सरिता. दिवसाआड एक संस्कृत श्लोक घेत फक्त तीन मिनिटात तो संथा पद्धतीने म्हणत त्याचा भावार्थ सांगायचा. या पद्धतीने २५ श्लोक झाले. या उपक्रमाला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. केवळ तीन मिनिटात असल्याने तो पाहिला गेला असावा. किशोरवयात कंठस्थ केलेल्यापैकीच काही श्लोक घेता आले. या सगळ्यात वेळ लागतो पण त्यात जो आनंद मिळाला तो अद्भुत आणि अवर्णनीय होता. यातील श्लोकांना नियमित ऐकणारे काहीजणांनी फोन करत, इ-मेल करत सिरीज परत सुरु करा असेही म्हटले. बघू, वेळ काढावा लागेल यासाठी. 

याच काळात आमचे मित्र निलेश भाई यांनी भन्नाट कल्पना सुचवली. संध्याकाळी म्हणजे अगदी सगळे जेवण करून निवांत साडे नऊला स्काईपवर भेटायचे ठरले. यात काही गावी तर काही इथेच पुण्यात होते.  पहिल्याच भेटीत आदेश आला की आपण काहीतरी देवाणघेवाण करूयात. बस्स, और क्या चाहिये? एकामागून एक विषय येत गेला आणि म्हणता म्हणता जे काही झाले ते असे. हे असे कधीही शक्य झाले नसते. या कठीण काळात एवढे विषय समोर आले आणि सहज प्रकट झाले. पुन्हा एकदा या सगळ्या पुस्तकांना बाहेर काढता आले आणि डायरी भरून नोट्स काढत्या आल्या. झालेल्या सेशनचे हे असे वर्गीकरण करता येईल.

 एक तासाचे एक सेशन झाले. कधीकधी वेळेची मर्यादा विसरून सगळे रमून जात असत. 
संस्कृत साहित्य – रघुवंश  ५ वा सर्ग (४ सेशन)
संस्कृत साहित्य – अभिज्ञानशाकुंतलम ४ था अंक – ४ श्लोक (१ सेशन)
संस्कृत साहित्य – शुकरंभा संवाद  (२ सेशन)
संस्कृत साहित्य – शीक्षावल्ली अनुवाक १ (८ सेशन)
संस्कृत साहित्य – सुभाषितमाला (५ सेशन)
छत्रपती शिवाजी महाराज – शिवचरित्र  - निवडक मोहिमा (८ सेशन)
इंग्रजी साहित्य  - कविता निवडक कविता (३ सेशन)
इंग्रजी साहित्य  - शेक्सपियर  शोकांतिका (Hamlet, Othello, King Lear, Macbeth)( ४ सेशन)
Western Philosophy- Socrates, Karl Marx, Aristotle, Plato( ४ सेशन)
Religions Vedic Dharma, Buddhism, Jainism, Islam, Christianity, Judaism, Sikhism (९ सेशन)

यात खास नमूद करावे ते पातंजल योगसूत्र यावर डॉ. प्रमोद ठोंबरे यांनी ६ सेशन घेतले. योगाचार्य हरीश जी आणि हितेंद्र जी यांनी योग आणि त्याचे महत्त्व यावर दोन सेशन घेतले.  यातून जी उर्जा मिळाली ती अभूतपूर्व होती. हा प्रवास थांबूच नये असे वाटत होते. एक एक विषय समोर येत गेला आणि जो संकटे देतो तोच त्यातून उभं राहण्याची उर्जा देतो तो अशी.  आता मागे वळून पाहताना विश्वास बसत नाही की हे कसे सहज शक्य झाले? एवढे तास आणि त्यासाठी तेवढे वाचन हे एक प्रकारचे वरदान होते. 

हळूहळू अनलॉक सुरु झाले आणि पुन्हा वेळेची मर्यादा येऊ लागली. हळूहळू माणसे बाहेर पडू शकत होती. भेटू न शकणारे काळजी घेत, मास्क वापरत रोजचा गाडा ओढू लागले. सगळं काही पहिल्यासारखं होईल की नाही माहित नाही पण जे काही शक्य होतं ते करू शकलो याचे समाधान नक्की आहे. 

असो, हे नवे वर्ष नवी उमेद आणि नवे आयाम घेऊन येवोत.  सर्वांनी काळजी घेत हा टप्पा पार करावा हीच कामना. 

नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !

--डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments