तृषार्त पथिक भाग १ ( २०/३/२१ )


गेल्या आठवड्यात  तृषार्त पथिक हाती पडले. गिरीश तळवलकर भाऊ यांनी बरेच काही प्रसंग असे वर्णन केले होते की हे पुस्तक कधी एकदाच हातात घेतो असे झाले होते. खरं तर केवळ नाव वाचले तरी पुस्तकाचा आत्मा ओळखू येतो. एक पथिक जो आर्त आहे, तृष्णीत आहे आणि त्याला आलेली साद ही माझ्या देशातून आली आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे. अध्यात्म आणि प्रेम यांचा सुगम प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे. श्री राधानाथ स्वामी यांचा अनोखा प्रवास इतक्या सहजतेने आणि उत्कटतेने व्यक्त झाला आहे की एक एक पान उलटताना वाचक अचंभित होऊ लागतो. एक आतली आर्त हाक ऐकू  आलेला  एक विदेशी व्यक्ती. अर्थात अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर कोण कुठला देश आणि कुठली वेगळी ओळख. असो.
हे पुस्तक म्हणजे एक अशी प्रामाणिक दृष्टी देऊन जातं. हा वाटसरू अनेक  संत महंत सिद्ध साधू  यांना भेटून, त्यांची मर्जी मिळवून, किंबहुना हा प्रवासी कृपेस पात्र आहे असे समजून सगळे त्याला कृपाप्रसाद देऊ इच्छितात. परंतु जो पर्यंत माझी पूर्ण तयारी होत नाही तोवर मी असा कोणताही अनुग्रह घेणार नाही हे विनम्रतेने सागंत पुढे चालत राहतो.  हा प्रवास सुद्धा इतका विलोभनीय आणि थक्क करणारा आहे की विश्वास बसत नाही की इतक्या वेदना , यातना कोणी का सहन कराव्यात? सुखमय निवांत जगणे सोडून अश्या एका मार्गांवर हा पथिक  चालू लागतो आणि आपण वाचक म्हणून पदोपदी थक्क होत जातो. 
एक ज्यू व्यक्ती ज्याने हिप्पी संस्कृती अगदी आत्मसात केली आहे असे रिचर्ड. आपल्या बालपणीच्या मित्रासोबत १९व्या वर्षी बाहेर पडून स्वत: जगायला शिकले. जवळ पैसा नाही आणि तरीही विश्वभरात शोध घ्यायची ओढ इतकी तीव्र की रोजचे भोगमय जीवन, व्यसन आणि विलासी जीवन याचा कधीच विसर पडला होता.  घरी अगदी श्रीमंती आणि विलास असतानाही ध्येय त्यांना शांत बसू देत नाही आणि प्रवास सुरु होतो. सगळी ओढ असते ती माझ्या देशातील एक आर्त हाकेकडे. 
युरोप, इंग्लंड रोम, ग्रीस, इस्ताम्बुल इराण,अफगाणिस्तान ते भारत सीमा असासहा महिने खडतर प्रवास करत येणे हीच अशक्यप्राय बाब वाटते. केवळ आणि केवळ अध्यात्मिक ताकत आणि एक सच्चा तृषार्त चातकच हे सगळं दिव्य पार करू शकतो. कारण प्रत्येक सीमेवर होणारी पैश्यांची लूट, अधिकारी वर्ग आणि त्यांची मनमानी हे सगळं पृथ्वी गोल  आहे हे सांगून जातं. प्रत्येक ठिकाणी असे काही दिव्य समोर असणारच. कुठे भीती तर कुठे अमाप प्रलोभन असा विळखा पडू लागताच रिचर्ड कसाबसा धीराने तो टप्पा पार करतात.  असे काही प्रसंग पुस्तकातच वाचले पाहिजे म्हणून नमूद करावेसे वाटत नाहीत. 
हा सगळा प्रवास १९७० च्या आसपास आहे आणि त्याची समकालीन स्थित्यंतरे तशीच मांडली असल्याने या लिखाणाला एक वलय प्राप्त झाले आहे. सहा महिने चालत, कष्ट करत इथे पोहोचून भारतभ्रमण  सुरु होते. एवढ्या जगाला फेर मारून इथल्या आध्यात्मिक परंपरेला शोधत रिचर्ड फिरतात. एक एक शहर, एक एक धर्मपीठ, एक एक सिद्ध आश्रम आणि एक एक गुहा ते फिरले. केवळ आणि केवळ साधूप्रमाणे.   
या सगळ्या प्रवासात वेळ मिळाला की  रिचर्ड आपल्या आई वडील आणि  भाऊ यांना पत्र लिहितात. जिथे जिथे आहे तिथून काही ओळीचे पत्र पाठवतात. ती पत्रे देखील आवर्जून वाचावी अशीच आहे. एक साधक कसा कालांतराने परिपक्व होत जातो यांचे मूर्तिमंत उदाहरण यात दिसते.  एक संवेदनशील आणि प्रामाणिक मन किती घालमेल सहन करत असेल याची जाणीव होते शब्दाशब्दात. 
क्रमश: 
--- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर



Comments