पाढा अनुत्तरीत प्रश्नांचा (भाग १ ) २४ नोव्हेंबर २०२२


पाढा अनुत्तरीत प्रश्नांचा (भाग १ ) २४ नोव्हेंबर २०२२

प्रश्न अनेकदा आपल्याला उत्त्तर शोधण्याऐवजी त्यात अडकवून ठेवतात.  खास करून हे प्रश्न जेंव्हा आजच्या तरुण पिढीबद्दल असतात. बहुदा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा काळ किंवा प्रसंग नक्की येत असावा. कारण हे प्रश्न सुटावे या साठी फार कमी जण प्रयत्न करत असावेत. प्रश्न आहे पालक आणि अपत्य यांच्यातील विसंवादाचा. अनेकदा चर्चा किंवा गप्पा होत असतांना हे ऐकायला येते. थोड्याफार फरकाने हेच सर्वत्र आहे असे प्रकर्षाने भासते देखील. दोन पिढ्यांमध्ये असलेले हे अंतर सहज कापत नाते दृढ करत त्याला आजून घट्ट आणि भक्कम करणारे फार अभावाने आढळतील. किंबहुना किमान साधा संवाद सुध्दा करतांना ही आमची तरुण पिढी चिडचिड करते किंवा एकदम उसळून अंगावर येते. रूढ असलेली जुनी पिढी तर एक पायरी देखील खाली यावी ही अपेक्षा करणे अव्यवहार्य आहे. जे काही करायचे आहे ते फक्त आणि फक्त तरुण पिढीने ही सुद्धा अतिरंजित कल्पनाच ठरेल.

आ वासून मोठ्ठा प्रश्न उभा असतो तो व्यक्त होण्याचा. अर्थात आजची ही पिढी व्यक्त होत नाही असे नाही आजच्या पिढीचे तरुण तुर्क एकीकडे सोशल मिडीयावर भरपूर व्यक्त होताना दिसतात. एक वेगळीच धडपड सुरु असते क्षण न क्षण जगासमोर मांडण्याचा. एक वेगळाच आनंद असतो या सगळ्यात असे ते मानतात. या सगळ्यात एक वेगळीच मजा असते असे वरकरणी तरी दिसते. दिवसाची सुरुवात आणि अगदी शेवट मोबाईल आणि त्या विश्वानेच होत असावी. स्वत: तिथे कसे दिसतो, कसे भासतो आणि कसे असतो यावर तासनतास खर्च देखील होतात. यात ते स्वत: हे सगळं आनंदानं करत असतील असचं मानूया. व्यक्त होणारी ही सगळी प्रजा एकदम शांत आणि मुकी होते पालकांसमोर. तिथे लाईक किंवा शेयर न होता थेट ब्लॉक किंवा इग्नोरची भाषा येते. अर्थात ही एका हाताने वाजणारी टाळी नाही हे ही सत्यच.

अनेक अनुत्तरीत प्रश्नांपैकी एक म्हणजे पालक आणि पाल्य यातील वाढत चाललेली दरी. आजही शिक्षण आणि तथाकथित करियरसाठी उभा होणारा तणाव यातले महत्त्त्वाचे कारण आहे. आजही पालक विशिष्ट करियर साठी अतिआग्रही दिसतात. प्रेशर कुकर सारखी अवस्था अगदी नववी, दहावी पासून सुरु होते आणि मग ती थांबतच नाही. या सगळ्यात आपल्या पाल्याने केवळ आर्थिक गणितं योग्य जुळवावीत आणि सेटल व्हावं एवढीच भाबडी अपेक्षा असते. या ओझ्याखाली दबला नसेल असा जीव कदाचितच असेल आपल्या अवतीभवती. आपली मुलं आर्थिक समर्थ व्हावीत यात गैर ते काय म्हणा? जगातल्या सगळ्या सुविधा आणि सहजता आपल्या पाल्याला मिळावी यासाठीची धडपड देखील बोलकी असते. गरज असते फक्त ती केवळ जबाबदारी न उरता भावना बनावी असे काही व्हायला हवे. आर्थिक गणितं जुळवतांना भावनिक आणि मानसिक गणितं बिघडणार नाही एवढंच काय ते महत्त्वाच.

क्रमश:

--- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments

Post a Comment