निबंध लिहून द्याल का कोणी?

निबंध लिहून द्याल का कोणी?

एक दोन दिवसापूर्वी एका अपघाताने निवडणुकांच्या गांज्याने धुंद असलेली प्रजा एकदम भानावर आली. एका मोठ्या बिल्डरच्या सुपुत्राने म्हणे एक इम्पोर्टेड पण अजून नोंदणी देखील न झालेली गाडी अनिर्बंध पद्धतीनं चालवली आणि दोन बळी गेले. आता एवढ्यावर थांबेल ती लोकशाही कसली? गेली दोन महिने ही गाडी विना परवाना आणि नंबरप्लेट फिरते आहे आणि त्याला कोणीही हटकवले नाही. आपण फक्त सिग्नलवर थोडे पुढे मागे झालो तर पावतीचा प्रसाद मिळतोच मिळतो. न्याय आणि व्यवस्था इथे देखील फरक करते . त्या अल्पवयीन मुलाला अनधिकृत पब मध्ये प्रवेश मिळतो. इतकेच काय तर तेथे तब्बल चाळीस हजार बिल होईल एवढे मद्यप्राशन करू दिले जाते. 

बरं, हे ज्याला त्याला जे करायचे ते करू द्या पण चिंता आणि भीती सुरु होते यानंतरच. पैसा आणि ताकत असणारे हा अधिकार बंद खोलीत न ठेवता थेट रस्त्यार आणत तुमच्या आमच्या जीवावर उठतात  आणि जे व्हायला नको हवे ते होते.  त्या दोषी अल्पवयीन मुलाला मदत करायला यंत्रणा आणि आमदार देखील दाखल होतात म्हणे. पोलीस यंत्रणा म्हणे भूक लागली म्हणून पिझ्झा पुरवत माणुसकी पाळतात. किती ही संवेदनशीलता. सलाम आहे हो!

आता इथपर्यंत बाब थांबत नाही तर अश्या प्रकरणी मेडिकल रिपोर्ट गेमचेंजर असतो तर तो देखील निगेटिव आला आहे म्हणे. (ही अशी महागडी दारू सर्वत्र मिळावी बुवा. म्हणजे चाळीस हजाराची पिऊन सुद्धा रिपोर्ट निगेटिव.) आता  जुवेनाईल जस्टीस बोर्ड आणि ज्या आधारे आरोपीला चोवीस तासाच्या आत जामीन मिळाला याला कायद्याच्या तरतुदी असतील पण अश्या केस मध्ये समाजात काय संदेश गेला हे पाहणं कुणाचं काम असेल बरं ?  म्हणजे निबंध लिहिणे, पोलीस वाहतूक कर्मचारी यांना मदत करणे, वेळप्रसंगी मदतीला धावून जाणे वगैरे समज देऊन असे आरोपी सुधारणार असतील तर मग एखादा निबंध नेहमीचा खिश्यात का ठेवू नये? 

अर्थात हा सगळा झगडा आणि राग केवळ श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून नाहीये. ही एक जी दरी निर्माण झाली आहे समाजात त्याचा हा झगडा आहे. फक्त विचार करा की तुमचा आमचा पोरगा किंवा पोरगी छोटी गाडी घेऊन अश्या प्रकरणी सापडला तर आयुष्यभर कोर्ट आणि जेलच्या वाऱ्या आणि आर्थिक हानी पाचवीलाच पुजली जाते. पण इथे सगळी व्यवस्था एकजुटीने कशी काय उभी राहते? शेवटी लोकमानस समजून स्वत: गृहमंत्री पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेतात यातच सगळं आलबेल नाही हे स्पष्ट होते. 

असो, तशीही आपली स्मरणशक्ती अतिशय कमजोर आहे.  लवकरच आपण हे सगळं विसरून जाऊ आणि जे जिथं आहे ते तसंच राहील. पालकांनी मुलांचे हट्ट पुरवावेत पण ते कोणाच्या जीवाशी खेळणारे असतील तर अजिबात मान्य नाही. योग्य गोष्टी योग्य वेळेत होतीलच. एवढी घाई कशाची? अमुक एक वयानंतर गाडीचे लायसन्स मिळते याला काहीतरी अर्थ असेल ना? मग हा आततायीपणा का? ज्यांनी घरातली दोन तरुण गमावले त्यांचा दोष काय आणि आता त्यांनी कुणावर राग व्यक्त करायचा? ते निष्काळजी पालक? बेफिकीर मुलं? बरबटलेली पोलीस यंत्रणा ? अधू आणि अपुरी न्यायव्यवस्था की अजून कुणाला?

असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. शहर वाढलं तसे प्रश्न आणि समस्या वाढल्यात पण या अश्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत. सुजाण पालकहो, सांभाळा रे. वेळ अजूनही गेलेली नाही. आज ते आहेत श्रीमंत म्हणून होईल सोपस्कार...तुमचं आमचं कार्ट चुकून अडकलं तर फक्त पश्चाताप करावा लागेल.  ना निबंध , ना समाजसेवा, ना आमदार मदतीला येतील. 

  प्रा. सचिन शंकर गाडेकर

Comments

Popular Posts