रायरेश्वर पठार आणि श्रीगणेशा

महाराष्ट्रातील पश्चिम घाट म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार. सह्याद्रीचे वेढलेलं हे विश्व फिरत फिरत आनंद घेत पालथ घालावं हा विचार अनेक दिवस चर्चेत होता. एक ग्रुप देखील उत्सुक होता कारण निसर्ग, गडकिल्ले, धबधबे आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक खुणा अनेकांना आकर्षित करतात. मग काय, या वर्षीच्या भटकंतीचा श्रीगणेशा थेट तिथूनच करायचा ठरला जिथून महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. होय, किल्ले रायरेश्वर. एक अशी जागा जिथून आपण आपले सगळे संकल्प सुरु करावेत म्हणजे ते तडीस नेताना महाराज सतत प्रेरणा देत राहतील.

दिवस ठरला आणि सवंगडी देखील. रायरेश्वर जाण्यासाठी कोणता मार्ग किंवा कधी निघायचं? तिथं पाऊस आहे का हे सगळं माहित करूनच निघालो. तेथील वस्तीवर राहणारे जंगम कुटुंबीयांना संपर्क करून सगळं खातरजमा करून घेतलं आणि निघालो. सकाळी साडेसहाच्या आसपास निघालो. ठरल्याप्रमाणे शिवनामाचा जयघोष, किल्ला आणि त्याच्याशी निगडीत माहिती चर्चा करत करत मार्गक्रमण सुरु झाले. सगळेच (प्रशांतभाई, अतुलभाई, हितेंद्रभाई आणि विक्रमभाई )सह्याद्रीत फिरणारे असल्याने आनंद आणि आत्मविश्वास वेगळाच होता. खेडशिवापूरच्या अलोकडे मस्त खानपान करून चहापाणी घेऊन टाक्या फुल्ल केल्या आणि भोर कडे रवाना झालो.

जसे भोर सोडले तसे सगळेच खिडकीतून बाहेर पाहत भावविभोर होऊ लागले. ते डोंगर, त्या झाडी, अचानक येणारे ढग आणि सुखद अशी हवा...अहाहा....अनेकदा गाडी थांबवून काही ठिकाणी फोटो घेण्याचा मोह झाला. आजकाल सेल्फी प्रकरणामुळे होणारे अपघात पाहता आम्ही जास्त काळजीने सुरक्षित फोटोसेशन केले. उत्साह आणि अतिउत्साह यात एकदम हलकी आणि पुसटशी किनार असेल.  ती पाळली गेली की सगळं ठीकठाक होतं पण आजची प्रजा जरा अधिक आगाऊपणा करायला जाते आणि नको तो प्रकार घडतात. असो.

गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथं पार्किंगला मुबलक जागा आहे. गडावर जाण्यासाठी काही कातळावर कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि बाकी लोखंडी जीने बनवले आहेत. यामुळे गडावर जाणे सुकर झाले आहे. थोड्या दोन टप्प्यात पायऱ्या आहे आणि थेट पठार पहायला  मिळते. वरती पिण्याचे पाणी हे गोमुख कुंडाचेच आहे. अगदी थंड आणि आपल्यासाठी मिनरल्सने परिपूर्ण असलेले आहे. बाराही महिने गडावरील वस्ती आणि येणाऱ्या गडप्रेमीची तहान हेच भागवते. वरती असणाऱ्या कोणत्याही कुटुंबाला आपण जेवणाची ऑर्डर देऊन पुढे जाऊ शकतो आणि पठार फिरून जेवायला येऊ शकतो.

पुढे गेलो आणि सर्वात महत्त्त्वाचे ठिकाण म्हणजे ते मंदिर जिथं महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या सवंगड्यासोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तिथं एक वेगळीच उर्जा अनुभवली. सगळे तिथं शांत बसून संकल्प करत असावेत. सोळाव्या शतकात जुलमी मुगल सत्तेला हद्दपार करण्याचा आणि रयतेसाठी स्वराज्य संकल्प झाला ती पावन जागा सदैव प्रेरणास्थान असेल प्रत्येक शिवप्रेमीसाठी. तिथं काही डागडुजीचं काम सुरु आहे पण समाधान याचं वाटलं की दगडाची फरशी सारखी ठेवण बसवायला देखील शिवकालीन पद्धती वापरली जात आहे. मिश्रण सिमेंटचे नसून चुना, गुळ आणि तत्सम गोष्टीच वापरून जुना घाट तसाच जपला जातोय.

पुढे निसर्गाने दिलेला सात रंगाच्या मातीचा अविष्कार पाहीला. आपण देखील ती माती पहायला नक्की जा. परंतु तिथं दिलेल्या सूचनेप्रमाणे काळजी घेऊ की अधिक उत्खनन न करता हा अनुभव घेऊ. सर्वात महत्त्वाचं की माती घरी नेण्याचा मोह टाळू कारण दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक जर मूठमूठ माती घरी घेऊन जाऊ लागले तर पठार आणि हा निसर्गाचा अविष्कार पुढच्या पिढीला पहायला देखील मिळणार नाही. असो.

दुपार झाली होती तरी वातावरण थंड आणि सुखद होतं. मध्येच एखादी सर येऊन पावसाच्या आगमनाची चाहूल देत होती. आम्ही वेळेप्रमाणे एक वाजता जंगम कुटुंबात जेवायला गेलो. मस्त नाचणीची भाकरी, चपाती, पिठलं, ठेचा असा जोरदार मेनू खाऊन तृप्त झालो. जरी व्यावसायिक असले तरी आग्रह करून वाढणारे हे असे गावकरी गडाची शोभा आहेत, गडाची आपुलकी आहे. जेवण झालं आणि वामकुक्षीच्या विचारात असणाऱ्यांना पावसाने संधी दिली. अर्धा तास मस्त जोरदार सरीवर सर बरसली. पाऊस थांबला म्हणून एक कडक चहा घेतला आणि थेट निघालो पांडवकालीन लेणीकडे. मंदिराकडून जवळपास पंधरा ते वीस मिनिटे चाललो की पांडवकालीन लेणी आहेत. पावसामुळे आत पाणी साचल्याने लेणी आत जाऊन पाहता आली नाही. बराच वेळ झाल्याने आता परत निघावं असा समूह आदेश निघाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

पठारावरून केंजळगड, नवरा नवरीचा डोंगर आणि कमळगड स्पष्ट दिसत होते.  अर्थात लवकरच मोहीम आखून हे देखील टप्प्यात आणायचे आहेत ही चर्चा झाली. उतरतांना आम्ही सर्व एक अजब समाधान आणि सुख अनुभवत होतो. चर्चा हीच होती की गडकिल्ले, सह्याद्रीत आल्यावर केवळ आणि केवळ सकारात्मक उर्जा मिळते आणि तीच घ्यायला यायचं. स्वत:ला शारीरिक आणि मानसिक थकवा आला तरी तो क्षणात पसार होतो या सह्याद्रीमध्ये. गडावरून खाली आलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला. येणाऱ्या सुट्टीला किंवा शनिवारी कुठं जायचं हे ठरवून घरी पोहचलो. प्रसन्न, शांत आणि उत्साह हेच देणं आहे निसर्गाचं आणि हे अनुभवत राहू.  भेटू पुन्हा नव्या ठिकाणच्या भेटीनंतर...

(स्पंदने माझी ब्लॉग २० जून, २०२४ )

-- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर

 

Comments