किल्ले घनगड

 



किल्ले घनगड 

रायरेश्वर पठार , लोहगड, सिंहगड अश्या किल्ल्यांची भ्रमंती करून आमचा आत्मविश्वास बळावला आणि पुढच्या वेळी घनगडावर जायचं पक्क झालं. यावेळी मागचे vlog आणि अनुभव ऐकून सगळे एकदम तयार होते. म्हणता म्हणता पाच चे पंधरा जण झाले. एक ठिकाण, वेळ आणि जबाबदाऱ्या  निश्चित करून सकाळी निघायचं ठरलं. या वेळेस सगळे वेळेवर पोहोचले आणि ताम्हिणी मार्गे पिंपरी गाव आणि पुढे भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव अश्या मार्गे जायचं ठरलं. मग काय, सकाळी वेळेत निघालो. पिरंगुटला मस्त पेटपूजा आणि चहापान घेऊन पुढे निघालो. 

ताम्हिणी घाट मार्गे जसे पिंपरीकडे निघालो तसे सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. अगदी शंभर दोनशे फूट अंतरावरील गाड्या अन रस्ते धूसर झाले होते. मग गाडी सेफ जागी थांबवून निवांत त्या धुक्यात हरवून गेलो. निसर्ग क्षणात काय सुख देऊन जाईल सांगता येत नाही. बराच वेळ थांबलो, काही झकास फोटो घेतले, काही सिनेमा स्टाईल स्वप्न रंगवलं आणि पुढे निघालो. अनेकदा मोह आवरून, मनाला समजावून ठरलेल्याच ठिकाणी जावं लागतं आणि मग लोक म्हणतात की जीवन एक रेडियो आहे जे वाजेल ते गाणे ऐकावे लागेल. जीवन काय spotify ची लिस्ट आहे का रिपीट मोडवर असायला? असो, इकोले गावात पोहोचलो तेव्हा ९ वाजले असतील.

गडाजवळ पोहोचलो तर नेटवर्क पूर्णपणे गायब झाले होते. एका अर्थाने बरंच आहे म्हणा. निसर्गात जाऊनही लोकं तिथला आनंद घेण्याऐवजी रील्स स्क्रोल करत बसतील. सगळे जमा झाले. एकूण आकडा मोजून गावातील एका घरात जेवणाची ऑर्डर दिली. दीड किंवा दोन पर्यंत परत यायचं ठरलं. मग काय, पोटापाण्याची सोय करून गडाकडे निघालो. गडाकडे जाताना घनेश्वर मंदिर आणि गारजाई देवी मंदिर लागलं. दर्शन घेऊन तिथल्या वीरगळ बाबत माहिती घेतली. पुढे झरझर गड चढून valley point पर्यंत गेलो. थोडासा साहसी प्रकार करत ‘डर  के आगे जीत है’ अनुभवलं.

पुढे थोडासा शिडीचा मार्ग आहे. तेवढा भाग सगळे आनंदाने चढून वर गेले. पुढे जाण्यासाठी एक अवघड मार्ग सुरु होतो. ड्रील करून खिळे आणि केबल लावून चांगली सोय काही दुर्गप्रेमींनी केली आहे. तेवढा भाग काळजीपूर्वक चढून पोहोचलो. मुख्य द्वारापाशी एक पाण्याचं टाकं आहे. त्यातलं पाणी देखील शुध्द आणि स्वच्छ होतं. अगदी त्याच्या पुढे दुमजली बुरुज आहे. काहीसा भग्न अवस्थेत असलेला बुरुज अजूनही उभा आहे. फार कमी किल्ल्यांवर असे दुमजली बुरुज दिसतात.

घनगड बराच काळ दाट धुक्याने गुडूप झाला होता. गडाच्या तटावरून एकाबाजूला सुधागड आणि तैलबैला दिसतात. अर्थात धुक्यामुळे त्याचं केवळ दर्शन घेण्यासाठी किमान दीड तास वाट पाहत होतो. या वेळेत भूक लागली म्हणून तिथेच एका बाजूला दगड मांडून चूल बनवली. मित्रगण आजूबाजूला जाऊन सुकी लाकडं घेऊन आली. थोडी पावसानं ओली झालेअसली तरी पटकन पेटली आणि दोन कढई भरून भरपेट maggi खाल्ली. तोवर ढग हटले होते. काही मस्त फोटो घेतले आणि गडावरून खाली निघालो. शुद्ध हवा आणि हिरवा निसर्ग पाहून सगळेच खुश झाले होते. गडाबद्दल उपलब्ध माहिती सर्वांना ऐकवली. शिवकाळाबद्दल थोडं मंथन झालं आणि निघालो.

अगदी वीस ते तीस मिनिटात खाली आलो. एव्हाना दीड वाजून गेला होता. आजीबाईनी मस्त पिठलं आणि भाकरीचा बेत केला होता. ठेचा, पापड आणि लोणचे दिमतीला होतेच. सगळे ताटावर तुटून पडले आणि ढेकर देईपर्यंत जेवले. जेवण करून सगळे परत निघाले. अर्थातच येतांना एक जागा निश्चित करून आलो होतो.  एक ओढा पावसाचं पाणी खळखळून वाहून नेत होता. त्याला एकटे न ठेवता त्यात थेट स्वत:ला झोकून दिलं. थंडगार आणि तेही वाहणारं पाणी म्हणजे स्वर्गसुख. किमान एकतास सगळे हिप्पो बनून तिथेच रेंगाळत बसले. सगळा थकवा किंवा शीण कधीच पसार झाला होता. काही वेळाने पावसाच्या सरी निरोपाला आल्याच होत्या. त्यांना सन्मान देत काहीसा नृत्य अविष्कार सादर झाला आणि मगच परत निघालो.

घनगडावर जातांना काळजी नक्की घ्यायला हवी. तिकडे नेटवर्क अजिबात नाहीये आणि पाऊस जास्त असेल तर फक्त पहिला टप्पा पार करून परत यावं असं सुचवेल. असो. येतांना ताम्हिणी घाटातील चहा आणि त्यासोबत पुढचा ट्रेक कधी आणि कोणता यावर चर्चा करत घरी निघालो. बऱ्याचदा ट्रेक झाल्यानंतर थकवा येतो पण यावेळी तसं झालं नाही. घरी पोहचून झोपण्याआधी कॅमेराने काढलेले  सगळे फोटो drive वर शेयर केले आणि त्या valley point च्या आठवणीतच झोपी गेलो.

-- प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments