लेखाजोखा २०२४ (भाग 2 )
सरत्या वर्षात सर्वात जास्त पहायला मिळाले ते सूर्यास्त आणि सूर्योदय. जेवढे ट्रेक झाले त्यात एकतर सूर्योदय किंवा सूर्यास्त अनुभवायला मिळाले. निवांतपणे सह्याद्रीच्या कुशीत बसून त्या डोंगररांगाना न्याहाळत बसायला मिळणे म्हणजे भाग्यच. पावसाळा सुरु झाला आणि सर्वात पहिले आम्ही पोहोचलो रायरेश्वरच्या पठारावर. स्वराज्य स्थापनेच्या शपथेचा साक्षी रायरेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन गडकरी नावाचा नवा समूह सुरु झाला जो वर्षभर ट्रेकसाठी कटिबद्ध झाला होता. मग काय अंधारबन किमान चार वेळा जाण्याचा योग आला.त्यात कधी विद्यार्थीमित्र, कधी कुटुंबगण तर कधी मित्रगण सोबत होते. मग लोहगड झाला, सिंहगड झाला, घनगड झाला, मल्हारगड झाला, कुसूर पठार झाले, ताम्हिणी घाटातील अनेक ट्रेल झाले, कल्याण गड झाला, किकलीचे मंदिर झाले,विसापूर गड झाला, राजमाची झाली, रोहिडा झाला, सावळ्या घाट झाला, कर्नाळा किल्ला झाला, आडराई जंगल ट्रेक झाला, तेलनी धबधबा, दिसू धबधबा आणि बऱ्याच ठिकाणी जाणे झाले.
यंदाचे सह्याद्रीदर्शन खास बनले कारण सोबत होता Canon Powershot. सगळं सौंदर्य निवांतपणे कॅमेऱ्यात कैद करून आनंद अनुभवलं. काही फोटो तर इतके खास आहेत की ते पक्की आठवण बनले आहेत. पक्षी प्रेम आणि सह्याद्रीचं सौंदर्य इतकं भरभरून पहायला मिळालं की काय सांगाव. यंदा भर पडली ती आषाढी वारीच्या फोटोग्राफीने. पुण्यात आलेली वारी काही किलोमीटर चालत वारकरी बांधवांच्या निरागस भाव आणि मुद्रा टिपायला मिळाल्या. वारी आणि वारकरी यांना भेटत आणि वंदन करत काही फोटो घेतले. थोडी सेवा आणि थोडा फोटोग्राफीचा आनंद घेतला.
असाच काहीसा आनंद यंदाचा गणपती सोहळा देऊन गेला. मानाचे गणपती आणि पुण्याची परंपरा शांतपणे फोटोग्राफी केली. खासकरून मध्यरात्री जाऊन पहाटेपर्यंत बाप्पाची सेवा करायला मिळाली. गर्दी तर असतेच पण निवांत वेळ काढून बाप्पांचे दर्शन घेतले आणि मनमुराद फोटो घेतले. पुण्याचा गणपती सोहळा अनेक नातेवाईक आणि मित्र यांना या माध्यमातून पहायला मिळाला. खूप जणांनी फोन करून याचे कौतुक केले.
या वर्षीचा आवडता आठवडा होतं BRCC चा कालखंड. गिरीप्रेमी आणि निसर्गवेधच्या संयुक्त विद्यमाने Basic Rock Climbing Certificate कोर्स करण्याची संधी मिळाली. सिंहगडावर तीन दिवस तिथं टिळक वाड्यात मुक्काम करायला मिळाला. गिरीप्रेमीचे अनुभवी आणि प्रशिक्षित ट्रेनर यांनी Basic Rock Climbing आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या. स्वत:ला एका वेगळ्या रुपात पाहता आले. सह्याद्रीमध्ये वावरताना, ट्रेक करतांना येणाऱ्या समस्या, अडचणी यांचा कसा सामना करावा हे सगळे शिकायला मिळाले. ट्रेकिंग आणि भविष्यात गिर्यारोहण करू इच्छिणाऱ्या सर्वानीच हा कोर्स केला पाहिजे.
वर्षाच्या शेवटी योग विभागाच्या विद्यार्थी आणि शिक्षक गणांसोबत बेंगलोर ट्रीप करता आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहयोग मिळावा, काहीसे नवीन शिकायला मिळाले यासाठी तीन दिवस SVYASA विद्यापीठ तर तीन दिवस श्री श्री आश्रमात अनुभवपर शिक्षण घ्यायला मिळाले. तो झालेला प्रवास, मनमोकळ्या गप्पा, एकमेकांना सांभाळत, काही नवे विषय ऐकायला मिळाले. अनेक अभ्यासू लोकांना भेटता आले. योगाभ्यास आणखी पक्का झाला. दोन्ही वर्षाचे विद्यार्थी जणू एक झाले. सगळे कसे रमून गेले. शिक्षणासोबत सहजीवन हेच या ट्रिपचे यश होते. अभ्यास तर झालाच पण जास्त महत्त्वाचं होते ते ऋणानुबंध आणि ते अधिक घट्ट झाले आणि नाती पक्की झाली. आकाश सरांनी दिलेल्या या संधीने मी त्यांचा आभारी राहिल.
वर्षं सरते आहे आणि मागोवा घेतांना किती तरी बाबी राहून गेल्या हे कळते. लक्षात येते की आपण कितीही ठरवलं तरी सर्व काही योजिले तरी सगळं काही मनासारखं होत नाही पण किमान ९०% गोष्टी करता येतात. त्या पूर्ण केल्याचं समाधान तर आहेच पण आपण हे करू शकतो याचा विश्वास उभा राहतो आणि अजून या पुढे जाऊ शकतो याची खात्री होते. स्वत:ला उगाच अडकवू नका. उलट नवनवी आव्हाने द्या आणि ती पूर्ण करा. आता येत्या वर्षात शरीरसंपदा सांभाळून, कुटुंब आणि व्यावसायिक आयुष्य यांचा मेळ घालत, आवडत्या गोष्ठी पूर्ण करत २०२५ ला सामोरे जाऊ.
येत्या इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा...
प्रा. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment