पुरंदर ट्रेक अनुभव:

 

पुरंदर ट्रेक अनुभव:


निसर्गवेध या अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रमात किल्ले पुरंदर येथे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचा योग आला. डॉक्टर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमातील विद्यार्थी समूह सोबत होता. गिरीप्रेमी संस्था आणि एम आय टी च्या सामंजस्य करारातून आजच्या तरूण पिढीला सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गडकिल्ले  आणि ट्रेकिंग  याची आवड लागावी हा प्रमुख उद्देश्यापैकी एक. याच उपक्रमातून पुरंदर दर्शन घडले.

सकाळी सातच्या आसपास ठरलेल्या ठिकाणी पोहचून सर्व सोपस्कार करून निघालो. सकाळी सकाळी उठून तयार होऊन आलेल्या आजच्या पिढीचे कौतुकच केले पाहिजे. उत्साह तर ओसंडून वाहत होता. रोज किमान चार ते पाच तास लेक्चर आणि बाकी सगळी प्रक्रिया निभावताना असे काही समोर आले की सगळी पार्टी खुश होते. मग काय, गाणी, गप्पा, दंगा, डान्स सगळं काही सुरु होतं. गड जवळ आलाय हे कळल्यावर जरा पेटपूजा केली. आणि तयार झाले गडभ्रमंतीसाठी.

पुरंदर पायथा येताच जाणीव होते ती तिथं असलेल्या मिलिटरी बेसची. काही वर्षापासून तिथं जवळजवळ गडाच्या पायथ्यापासून ते अगदी वरती सगळीकडे निर्बध आहेत आणि ते राष्ट्रीय सुरक्षा आणि नियम यासाठीच आहे. गेटवर कडक चेकिंग होते. त्यामुळे काळजी घ्यावी. काही आक्षेपार्ह गोष्टी म्हणजे काडेपेटी, चाकू अश्या गोष्टी  गेटवरच जमा कराव्या लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असणारे मोबाईल फोन आणि पुढे वीर मुरारबाजी यांच्या स्मारकापर्यंतच जवळ राहतो. नंतर ते जमा करावे लागतात. DSLR किंवा GO PRO सारखे इलेक्ट्रोनिक वस्तू गेटवरच जमा होतात.

आता पुढे वीर मुरारबाजींना वंदन करून ट्रेकला सुरुवात केली. मुरारबाजीच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यानंतर पद्मावती तळे लागते. आजही चांगल्या अवस्थेत ते आहे. पहिल्यांदाच असं घडलं असावं की तरुण पिढी किमान चार तास विना फोन राहणार होती. नियमानुसार सगळे विनातक्रार निघाले. मनात समाधान हे होतं की मोबाईल नसल्याने ट्रेक वेळेवर आणी सुरक्षित पूर्ण होईल. दरी, बुरुज आणि धोकादायक जागी जाऊन सेल्फी आणि फोटोग्राफी करण्यात अनेकदा अपघात घडतात. असो. झरझर वरती जात गडभ्रमंती सुरु झाली.


सकाळचे
दहा वाजले तरी ऊन कडक भासत होतेत्या दिवशी सूर्यनारायण जरा जास्तच चिडलेले असावेत. टोपी, स्कार्फ आणि रुमाल असं सगळं साहित्य दिमतीला होतंच. तिथं गडावर कमीत कमी कचरा जाणवत होताबिनी दरवाजातून अगोदर प्रवेश होता परन्तु आता तो मार्ग बंद केला असल्याने मुख्य द्वारानेच यावं लागतं. पुढे गेलो तर समोर उभा ठाकला आहे दिल्ली दरवाजा. हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. पुरंदर किल्ल्याचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचे प्रवेशद्वार. तीन दरवाजे वेगळ्या वक्राकार रचनेत आहेत. सुरक्षा आणि मजबुती त्याची कारणं असावीतत्यातील दोन दरवाजावर गुंतागुंतीचे कोरीवकाम केलेले पहायला मिळते. अर्थातच फोन जवळ नसल्याने हे सगळे फक्त नजरेत साठवत होतो. मोठ्मोठ्या दगडांनी उभे केलेले बुरुज आणि भिंती जे त्या काळातील कलात्मक क्षमतेबद्दल आपल्याला जागं करतात.

जवळजवळ ट्रेक संपत येतो ती केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने 15 20 मिनिटे चालून गेल्यावर. तिथं काही पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या सरळ केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. मंदिराच्या समोरच दीपमाळ आहे. केदारेश्वर मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वांत उंच भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड इत्यादी किल्ले दिसतात. परंतु आम्ही गेली त्या दिवशी ढग असल्याने काहीच पाहता आले नाही. सर्व विद्यार्थी मंदिराच्या आवारात बसून पुरंदरचा ऐकत होते. सोबत असलेल्या सहकार्यांनी इतिहासाचा उल्लेख करत सर्वांमध्ये तो विश्वास आणी भाव उभा करण्याचा प्रयत्न केला.

पुरंदर हा गड छत्रपती संभाजी महाराज यांचे  जन्मस्थळ असल्याने या वास्तूला विशेष महत्त्व आहे. इथेच वीर मुरारबाजी यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं . इथल्याच तहाने आपला इतिहास ढवळून निघाला. एकेक पायरी चढतांना डोक्यात हे सगळं फिरत होतं. खाली आल्यावर शेजारीच असलेले संग्रहालय चुकवू नये. प्रेरणा आणी बलिदान याचा संगम म्हणजे पुरंदर. गडावर वंदन करून खाली आलो.एका कल्पवृक्षात निवांत बसून भरपेट  भोजन केले आणि परतीचा प्रवास सुरु झाला.

--- प्रा. सचिन शंकर गाडेकर



 

 

 

 

Comments