ऐन उन्हाळी ट्रेक (मिल्कीबार धबधबा आणि Plus Valley ट्रेक ) १५ मार्च २०२६
ऐन उन्हाळी ट्रेक (मिल्कीबार धबधबा आणि Plus Valley ट्रेक ) १५ मार्च २०२६
उन्हाळा सुरु झाला कि खरी रंगत येते ट्रेकिंग करायला. कारण की पावसाळा आणि हिवाळा असला की सर्वत्र प्रचंड गर्दी असते. सगळेच सह्याद्रीचं सौंदर्य पहायला येतात. इतिहास आणि पर्यटन यात इतिहास मागे पडतो आणि सुमार पर्यटन डोक्यावर बसतं. असो, यात पावसाळ्यात तर सह्याद्री जणू हिरवी शाल आणि पूर्ण बहर असतो. हिवाळ्यात तर फुलांनी जी काय रौनक येते ती वेगळीच असते. राजगड, रतनगड, कोरीगड काळू धबधबा किंवा राजमाची अशी प्रत्येक जागा आपल्याला मोहित करते. आपल्याला तिच्याकडे आकर्षितच करते.गेली अनेक वर्षे खास करून ताम्हिणी घाटाजवळील काही धबधबे विशेष आकर्षण बनले आहेत. तिकडे जेवढी गर्दी होते त्यामुळे स्थनिक लोकांना मिळणारा रोजगार एक जमेची बाजू आहे. पण तिकडे होणारा कचरा आणि अव्यवस्था देखील चिंता करण्यासारखी आहे. अर्थात एखादी अप्रिय घटना किंवा मृत्यू झाला की सरकारी बडगा येतो आणि सगळे स्पॉट बंद केले जातात. तिकडे किमान दोन ते तीन महिने जाता येत नाही. कुम्भे धबधबा यामुळे अजून पाहता देखील आला नाही. साहस आणि धाडस कधी आणि कुठे करायचे हे माहित असणे गरजेचे. असो.
यंदा सुद्धा कातळधर, नानेमाची , मिल्कीबार बंद झाल्याने हिरमोड झालाच पण तिकडे जायचं असल्याने गेल्या रविवारी बेत आखला. मार्च महिना असल्याने चक्क रविवार असून देखील तिकडे कोणीच फिरकणार नाही हे माहित होते. सकाळी सहाच्या आसपास गडकरी चमू एकत्र येऊन एक ११ + ४ चिमुकले असा गोतावळा रवाना झाला. एकीकडे अवघं जग युद्ध आणि त्यासंबंधित बातम्या पाहून चिंतीत आहे पण आपला देश होळी खेळतोय, ईद इफ्तार करतोय आणि निवडणुका होतायेत. अर्थात झळ तर नक्कीच पोहोचत आहे. कुठे सिलेंडर नाहीयेत तर कुठे पेट्रोल संपेल अशी भीती. आम्ही देखील कसे यातून सुटणार होतो? ताम्हिणीत न्याहारी करायला थांबलो तर चक्क चुलीवर बनवलेले पोहे खावे लागले. नाईलाज झाला.
युद्धस्य वार्ता रम्या अश्या आशयाच्या गप्पा मारत पार्किग ला पोहोचलो. फोरेस्ट विभाग बऱ्यापैकी तिकडे उपाययोजना करण्यात दंग आहे. अलीकडे होणारे अपघात टाळण्यासाठी रेलिंग आणि चेकपोस्त बनवणे सुरु आहे. आतापर्यत विना तिकीट होणारा ट्रेक पुढच्या वर्षी नक्कीच तिकीट काढून आणि शुल्क देऊन जावं लागेल असं दिसतंय. इथं सरकारी यंत्रणा आणण्यापेक्षा गावकरी आणि स्थनिक लोकांना रोजगार आणि याचा लाभ मिळावा असं अनेकदा वाटून गेलं. आम्ही मळलेल्या वाटेने निघालो. सकाळचे आठ नऊ वाजले असतील. सह्याद्रीमधील गारवा आणि शांतता पहिल्या टप्प्यातच अनुभवायला मिळाली. पक्षी गलबला करत आहेत. काही खाली पडलेल्या पानांचा त्यावर पाय पडल्यावर होणारा आवाज आणि समोर अजस्त्र असा कातळ पाहून मन वेगळ्याच दुनियेत जात होतं.
झरझर टप्पे ओलांडलायला सुरु केलं. आमच्या पेक्षा मुलं जास्त उत्साहाने आणि जोशाने पुढे चालत होते. मिल्कीबार आणि प्लस दरी चा रस्ता एकदम खोलगट आहे. किमान ४० डिग्री उतार उतरून जावं लागतं. कातळचा आधार तर कधी स्थानिक लोकांनी बांधलेला दोर धरून चक्क Rappelling करत खाली जावं लागतं. एकएक करत एकमेकांना सांभाळत खाली निघालो. काहीजण तर प्रथमच गडकरी सोबत आले होते आणि पुढे काय मांडून ठेवलंय हे ते अंदाज बांधत होते. तीनही टप्पे ओलांडून आम्ही पोहोचलो अश्या टिकाणी जिथून रस्ता एकीकडे धबधबा तर दुसरीकडे Plus Valley चा मार्ग. आम्ही अगोदर मिल्कीबार कडे निघालो. पावसाळ्यात तिथं काय चित्र असेल याची कल्पनाच करवत नव्हती. मोठाले दगड, कपारी, निमुळत्या वाटा आणि खोलगट पाणवठे. अहाहा...
सगळेच लगबग करत फोटोग्राफी करत पुढे निघाले. आम्ही एक दोघांनी पुढे जाऊन सगळं सुरक्षित आहे याची खातरजमा केली. पाण्यामुळे वन्यजीव तर नाही ना अशी शंका मनात आली आणि ती काढून पण टाकली. आसपास सर्प किवा विंचू नाहीत याची पाहणी केली आणि सर्वांना पाण्यात बोलावलं. आता मात्र एकही क्षण कोणालाच थांबायचं नव्हतं. रणरणत्या उन्हात केवळ valley च्या सावलीने बचावलो होतो आम्ही. नाहीतर पूर्ण भाजून निघालो असतो. सगळे पाण्यात उतरले. पाणी किती थंड होतं हे सांगायलाच नको. लहान मुलं तर चक्क वेडीच झाली असं म्हणावं लागेल. डर के आगे काय काय असतं हे प्रत्यक्ष अनुभवयाला मिळालं. एक एक करून सगळे डुंबत होते आणि आम्हा दोघा तिघांना आधी चूल मांडून पातेले बुड लावून द्यायचे होते म्हणून सगळे ओलेचिंब होत असतांना आम्ही लाकडं गोळा करून दगडी रचून मस्त चूल तयार केली. आणि .....
क्रमश:
प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
.jpeg)
Comments
Post a Comment