ऐन उन्हाळी ट्रेक (मिल्कीबार धबधबा आणि Plus Valley ट्रेक ) १५ मार्च २०२६- भाग 2
ऐन उन्हाळी ट्रेक (मिल्कीबार धबधबा आणि Plus Valley ट्रेक ) १५ मार्च २०२६- भाग 2
उन्हाळा तो ही मार्च महिन्यातला. रणरणत्या उन्हात केलेली पायपीट आणि समोर थंडगार पाण्याचा भांडार पाहून गडकरी सुखावले. काहीजण तर म्हणजे निलेश भाई आणि प्रशांत भाई तर थेट पाण्यात पोहोचले. एकीकडे ४० च्या टेम्परेचर , त्यात आसपास उष्ण हवा आणि दमट वातावरण असावं आणि समोर एकदम थंड कुंड दिसला तर कोणा कोणाला आवर घालणार आणि तो हि कशाला? लहान मुलांना विशेष काळजीने आत खोली तपासूनच आत येऊ दिले. साहस आणि निष्काळजी यात फार पुसटशी रेषा असते आणी ती ओळखता आली पाहिजे. असो. अर्ध्याच्या वर मंडळी पाण्यात डुंबत होती आणि जन्नत बिन्न्त काय ते अनुभवत होती.
यानंतर किशोरजी, निलेशजी, गिरीशजी यांनी पुढचा ताबा घेतला आणी आम्ही मोर्चा वळवला तो पाण्याकडे. एखादं काम निवडक लोकांनी केले कि योग्य होते याचा प्रत्यय लवकरच येणार होता. आज मुलांना maggi न देता भातच खायचा होता म्हणून जास्त तिखट न करण्याची सूचना अगोदरच दिली होती. पुढं किमान अर्धा तास त्या पाण्याचा आनंद घेत सगळे खुश होत होते. काही स्पॉट हे असे असावेत जिथं आपल्याशिवाय कोणीच नसावे. आमचा हा प्लान तसा झाला होता. कोणी गोल गोल चकरा मारतंय तर कोणी एकमेकांना खाली किती वेळ श्वास रोखता येईल याची स्पर्धा सुरु करत होतं. एकूण सगळं काही निवांत सुरु होतं.
काही वेळाने सगळ्यांच्या पोटातून आवाज येऊ लागले असावेत आणि जो तो मसालेभात झाला, शिजला का असा प्रश्न जो तो विचारू लागला. काहीवेळाने शेफ मंडळीनी सगळं काही खातरजमा करत आदेश काढला. मग काय, पत्रावळीत सगळ्यांना भात वाढला गेला आणि बेत सुरु झाला. चौदा जणांना पुरेल इतकं भोजन बनलं होतं. किमान दीड ते दोन तासांची पायपीट , उन्हाचा मारा, पाण्यात केलेले कष्ट हे सगळं एकत्र आलं आणि खवळलेली भूक. गप्पा मारत मारत मसालेभाताचा सगळे आनंद घेत होते. निवांत ताव मारून आता परत निघायचं ठरलं.
निसर्गात गेल्यावर काहीही कृती केली तर कचरा होतोच. तो सगळा परत घेऊन येणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजकाल होणाऱ्या सुमार पर्यटनामुळे जिकडे तिकडे कचरा आणि प्लास्टिकचे साम्राज्य दिसते. आम्ही सर्वप्रथम चूल विझवली. सगळा कचरा गोळा केला. वेगवेगळ्या पिशव्यात तो भरला आणि परत निघालो. Leave No Traces हे तत्व तंतोतंत पाळले गेले पाहिजे. आनंद घ्यावा, मजा करावी, ट्रेकचा आनंद लुटावा फक्त नियमांत राहून. फक्त तिथलं पावित्र्य राखून. फक्त तिथलं सौंदर्य सांभाळून. निसर्ग देतो ते घ्यावं फक्त त्याला न ओरबाडता.
सगळं आवरून जागेचा निरोप घेत परत निघालो आणि पुन्हा त्या वळणावर पोहोचलो जिथून plus valley चा रस्ता पुढे जातो. तिथं जरा वेळ बसलो आणि पुढच्या काही क्षणातच परत अर्धे जण त्या कुंडातल्या गार पाण्यात झेपावले. काही मिनिटापूर्वी ओले कपडे बदलून सोबत आणलेले कपडे चढवले होते आणि उत्साहात परत उड्या आणि परत भिजणे. बालपण देगा देवा... असं निरागस जगणं रोजरोज येत नाही नशिबात. आणि म्हणूनच कोणीही कोणाला घाई करत नव्हतं किंवा चिडचिड वा तगमग नाही. किमान पाऊन तास डुंबून झाल्यावर परत ओले सुकं करून परत निघालो. येतांना पार केलेला टप्पा अख्खा चढत्या भागाने जायचं आहे हे माहित होतं. एकएक करत मुलांना सांभाळत सगळे टप्पे पार केले. अनेक वेळा थांबून, विश्राम करत, मध्ये मध्ये पाणी पीत आणि स्वत:ला आणि इतरांना प्रोत्साहित करत ट्रेक पूर्ण केला.
गडकरी आणि खास करून हिमालयन ट्रेक साठी पूर्वतयारी साठी केलेला हा ट्रेक दमवून गेला. शारीरक क्षमता आणि मानसिक कणखरता देखील तपासली गेली. एकमेकांना कसं सांभाळत जायचं आणि परत यायचं हे कळालं. सोबत काय काय असलं पाहिजे याची चर्चा झाली. ट्रेक व्यतिरिक्त अजून दैनंदिन जीवनात काय काय अधिक तयारी लागेल अश्या सगळ्या चर्चा निवांत झाल्या कारण वेळ होता, सोबती होते आणि आसपास धीरगंभीर सह्याद्री. ट्रेक लोकेशन सोडलं, पुढे एका ठिकाणी थंड ताक घेऊन घरी निघालो. पुढच्या ट्रेक संदर्भात चर्चा देखील झाली आणि लवरकरच याच्या पुढचा टप्पा आखून गडकरी सह्याद्रीच्या कुशीत परत येतील असा विश्वास आहे.
भेटू पुन्हा एखादा कडक ट्रेक अनुभव घेऊन. धन्यवाद.
---- प्रा. सचिन शंकर गाडेकर (एक गडकरी )
.jpeg)
Comments
Post a Comment