“बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग २- पूर्वतयारी)
“बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची
केदारनाथ यात्रा (भाग २- पूर्वतयारी)
केदारनाथ जायचं नक्की झालं आणि मग कागदावर आखलेली ही मोहीम प्रत्यक्ष आयोजनात उतरवायची वेळ आली. फक्त booking, planning आणि meetings पुरेसं नव्हतं; आता खरी तयारी सुरू झाली होती. केदारनाथ म्हणजे केवळ प्रवास नाही, तर स्वतःची परीक्षा असते हे सगळ्यांना माहीत होतं. उंच हिमालय, बदलणारं हवामान, लांबचा ट्रेक आणि कमी ऑक्सिजन या सगळ्यांसाठी शरीर तयार असणं तितकंच महत्त्वाचं होतं जितकं मन मजबूत असणं. मग सुरू झाली तयारी मग ते रोज किमान ४५ मिनिटे चालणे असेल, पायऱ्या चढत जाणे असेल, महिन्यातून एखादे दोन छोटे ट्रेक आणू जमेल तर fitness sessions. हे सगळं अगदी सहज करायचं होतं आणि म्हणून तर ज्याला जसं शक्य होईल ते सगळे करू लागले. पण खरी तयारी फक्त शरीराची नव्हती… मनालाही तयार करावं लागत होतं. Comfort zone सोडून अनिश्चिततेला सामोरं जाण्याची तयारी गर्दी, चढतांना लागणारा दम, जाणवणारा थकवा, हवामान अश्या सगळ्या बाबी मनात होत्या. फक्त एकच ठरलं होतं कि “हर हर महादेव” म्हणत पुढे चालत राहायचं आणि केदारनाथ चढाई पूर्ण करायची.
दररोज
चालणं, नियमित व्यायाम असेल, प्राणायाम असतील यावर भर दिला गेला. आणि महत्त्वाचं म्हणजे कुणीही आळस केला नाही! दररोजचा walk, किती steps झाले, किती किलोमीटर पूर्ण झाले, कोणाचा workout झाला… हे सगळं ग्रुपवर टाकलं जायचं.
त्यामुळे एकमेकांना उत्साह मिळत राहिल.
काहीजण छोटे छोटे विडीयो बनवत एकमेकांना प्रेरणा देत होते. आता केदारनाथ जाऊन आल्यावर
नक्की कळाले कि हि केलेली तयारी देखील तिथल्या भौगोलिक परिस्थितीत कामी आली पण
मान्य करावं लागेल कि तयारी अजून थोडी कमी पडली. जितके जास्त आपण तयार असू तितका
कार्यभार सोपा होतो. पन्हाळा ते पावनखिंड साठी केलेली तयारी तशीच होती. एरवी १६
किलोमीटर असा म्हंटला जाणारा हा नवीन रस्ता कमीतकमी २४ ते २६ किलोमीटर झाला आहे.
सीतापुर ते सोनप्रयाग आणि सोनप्रयाग ते गौरीकुंड हा अधिकचा भाग कोणीही मोजत नाही.
चालावं तर लागतं ना!
आता
तयारीचा भाग म्हणून अनेक छोटे ट्रेकही केले गेले. ताम्हिणी घाटातील मधल्या एका
सुंदर “Milkybar” धबधब्यापर्यंतचा
खतरनाक ट्रेक झाला. भर उन्हात दगड धोंडे असणारी दुर्गम वाटा पार करत केलेला तो
ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि आपला फिटनेस
यांचा जबरदस्त संगम होता. त्यानंतर तब्बल दोन वेळा सिंहगड पायथा ते पुणे दरवाजा हा
दमछाक करणारा ट्रेक पूर्ण केला. प्रत्येक
वेळी stamina वाढताना जाणवत होता. इतकंच नाही तर तीन
वेळा घोरावडेश्वर ट्रेकसुद्धा केला आणि तोही नेहमीच्या पायऱ्यांऐवजी
डोंगरमार्गाने! त्या चढ-उतार आणि तीव्र
चढण असल्याने जास्त कस लागत होता आणि आत्मविश्वास वाढत गेला.
अर्थात ही सगळी तयारी फक्त शारीरक कणखर होण्यासाठी साठी नव्हती… ती मानसिक तयारी देखील होती. आपण जेवढी तयारी करू तितका तिथला प्रवास सोपा राहिल हे माहित होतं. कारण केदारनाथच्या वाटेवर शरीर आधी थकतं, पण शेवटी मनच माणसाला पुढे चालवत राहतं. त्यासाठी विधायक चर्चा आणि उत्साहवर्धक गोष्टी एकमेकांना सांगत राहिलो. एक से भले दो असं म्हणतात ते अनुभवत होतो. सगळे सुसाट सुटले होते.
तरी एक राजगड मुक्कामी ट्रेक करायचा होता तो एकदम आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे करू नाही शकलो. तसंही सगळंच एका मुठीत सामावता येत नाही… काही गोष्टी सोडाव्या लागतात, तर काही घट्ट धरून ठेवाव्या लागतात. प्रवासही असाच असतो थोडा त्याग, थोडी तडजोड आणि भरपूर आठवणी. केदारनाथच्या तयारीतही हेच जाणवलं. काहींनी वेळ काढला, काहींनी comfort zone सोडला, तर काहींनी स्वतःच्या भीतीवर मात केली. पण एक गोष्ट सगळ्यांनी घट्ट धरून ठेवली. ठरलेल्या गोष्टी, एकमेकांची साथ, ग्रुपचे नियोजन आणि महादेवांवरची श्रद्धा याच्या भरवश्यावर आता आम्ही प्रवास सुरु करणार होतो.
क्रमश:
प्रा. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी समूह)






Comments
Post a Comment