“बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग 3- नर्मदा, यमुना आणि गंगा)

 बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग 3- नर्मदा, यमुना आणि गंगा)

पुण्यातून आमचा प्रवास पहाटेच सुरू झाला. घरच्यांना निरोप देताना डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड उत्साह — दोन्ही भावना एकत्र होत्या. आमच्यापैकी अनेक जण पहिल्यांदाच इतक्या लांब आणि तेही अनेक दिवसांसाठी प्रवास करत होते. त्यात केदारनाथसारख्या पवित्र ठिकाणी जाण्याचा आनंद काही वेगळाच होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता, थोडी भीती आणि खूप साऱ्या आठवणींची सुरुवात दिसत होती. आमची फ्लाइट नवी मुंबई विमानतळावरून होती, त्यामुळे तिथपर्यंतचा प्रवासही खास वाटत होता. नवीन विमानतळ अजून विकसित होत असला तरी त्याची भव्यता आणि आधुनिकता लक्ष वेधून घेत होती.

या प्रवासातील सर्वात रोमांचक भाग म्हणजे आम्ही पाहिलेला “मिसिंग लिंक” प्रोजेक्ट! डोंगर, बोगदे आणि अप्रतिम अभियांत्रिकी कलाकारी पाहताना सगळेच थक्क झालो. विमानतळावर पोहोचल्यावर चेक-इन, गप्पा, भरपूर फोटो आणि सततचा उत्साह  असेच वातावरण होते. सगळे चला, अखेर प्रवास सुरु झाला, गेले दोन ते तीन महिने वाट पाहत असलेला दिवस अखेर उजाडला आणि आता फक्त स्वप्नपूर्ती. नेहमीप्रमाणे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करत आम्ही शेवटी विमानात बसलो आणि टेकऑफचा तो क्षण आला… मनात फक्त एकच भावना होती — “आता खरंच केदारनाथच्या प्रवासाला सुरुवात झाली!”

पहाटेची आमची फ्लाइट अगदी वेळेवर होती. विमान आकाशात झेपावताच अनेकांच्या मनात एकच उत्सुकता होती कारण विमानातून दिसणारे भूगोल, नद्या, पर्वतरांगा आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता असते. नवी मुंबई मागे पडत असताना खिडकीतून दिसणारे दृश्य सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करत होते. काही वेळातच वरून दिसलेली विशाल नर्मदा नदी पाहून संपूर्ण ग्रुपमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली. “नर्मदा परिक्रमा” हा विषय नेहमीच आमच्या गप्पांमध्ये असतो, त्यामुळे प्रत्यक्ष वरून त्या पवित्र नदीचे दर्शन घेणे हा एक खास अनुभव होता. पुढे जाताना पर्वतरांगा दिसू लागल्या आणि अरवली पर्वतरांगांचे दर्शन झाले. भूगोलात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवताना सगळेच भारावून गेले होते. नेहमी प्रवास करणारे निवांत होते आणि तर काही खिडकीतून खाली पाहून भौगोलिक दृष्ट्या वेगळाच अनुभव घेत होते.

थोड्याच वेळात खाली दिसणारी दिल्लीच्या सीमेवर यमुना नदी पाहून “आपण दिल्लीजवळ पोहोचलो आहोत” याची चाहूल लागली. संपूर्ण समूह त्या दृश्यांमध्ये इतका रमला होता की वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आमच्यापैकी बरेच जण प्रवासाचा अनुभव असलेले होते, पण मोठ्या ग्रुपमध्ये प्रवास करण्याची ऊर्जा काही वेगळीच असते. प्रत्येक क्षणी गप्पा, हास्यफवारे, निरीक्षणे, फोटो आणि नवीन चर्चांचा उत्साह सुरू होता.

शेवटी आम्ही सुखरूप पोहोचलो. विमान प्रवास संपला आणि तिथून हरिद्वारच्या दिशेने आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दोन tempo traveller अगोदरच ठरवून ठेवल्या होत्या. ते वाटच पाहत होते. गटातील एकवीस जण आम्ही सुविधेसाठी दोन गटात विभागून घेतले. नियोजन, संपर्क आणि गतिमानता टिकावी यासाठी हे गरजेचं होतं. दोन वेगवेगळे कर्णधार आणि गटप्रमुख ठरले होतेच. दिल्ली ते हरिद्वार निघालो. गतिस्त्वं ...गतिस्त्वं ...म्हणत हिमालयाच्या कुशीत जाणाऱ्या एका अविस्मरणीय यात्रेची खरी सुरुवात झाली होती. दिल्लीची हवा ज्या प्रमाणात गरम होती त्यावरून तिथल्या सतत चर्चेत असणारे प्रदूषण, हवेची शुद्धता पातळी आणि गर्मी हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. असो.

दिल्लीहून हरिद्वारकडे निघाल्यानंतर वाटेत एका पारंपरिक ढाब्यावर आम्ही जेवणासाठी थांबलो. गरमागरम जेवण आणि प्रवासातली भूक अश्या सगळ्यामुळे त्या ढाब्याची चव अजूनच खास वाटत होती. तसं पाहिलं तर दिल्ली ते मेरठ हा मार्ग अतिशय उत्कृष्ट आहे. महामार्ग थेट उड्डाणपूलांनी जोडून सोपा केला आहे. सस्ता चांगला रुंद आहे जेणेकरून वेगवान महामार्गावर वाहनांचा वेग टीकावा आणि प्रवासातला वेळ वाचवा. प्रवास लांबचा असल्याने मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबलो. साधारण सहा तासांचा प्रवास करून अखेर आम्ही हरिद्वारला पोहोचलो. आमच्या आध्यात्मिक यात्रेची खरी सुरुवात गंगा आरती आणि गंगास्नानाने करायची अशी सगळ्यांची मनापासून इच्छा होती.

हरिद्वार पोहोचायला आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे पोहोचेपर्यंत गंगा आरती सुरू झाली होती, लगबगीने आम्ही घाटाकडे निघालो. घाट आणि आरती हे सगळं पाहून त्या दिव्य वातावरणाची अप्रतिम झलक अनुभवता आली. हर की पौडी घाट नेहमीप्रमाणे भक्तांनी गजबजलेला होता. मंत्रोच्चार, घंटानाद, आरतीचे वलय आणि गंगेच्या प्रवाहातून येणारी ऊर्जा  पाहून सगळेच भारावून गेले होते. आरती संपल्यानंतर गर्दी थोडी कमी झाली आणि आम्ही पवित्र गंगेत स्नानासाठी उतरलो. वेगाने वाहणारा प्रवाह, बर्फासारखे थंड पाणी आणि मनातली श्रद्धा — “हर हर गंगे!” म्हणताना जणू सगळा थकवा, प्रवासाचा ताण आणि मनातील गोंधळ वाहून गेला.

ती संध्याकाळ काहीतरी वेगळीच होती. शरीर दमलेले होते, पण मन मात्र पूर्ण शांत आणि प्रसन्न झाले होते. अवखळ खळखळ वाहणारी हीच गंगा किती साधू, संत, ऋषी, मुनी, आचार्य यांना प्रेरणा देऊन गेली. याच नदीतीरी कितीतरी सभ्यता आल्या, वसल्या आणि काळाच्या आड देखील गेल्या. मां गंगा मात्र तशीच आहे. तीच प्रेरणा, तीच आशा आणि तोच आध्यात्मिक आभास घेऊन.भगीरथ यांनी अथक प्रयत्न आणि साधना करत ज्या प्रवाहाला धरतीवर आणलं ती ही गंगा. तुमच्या आमच्यासाठी आणि सकल समृद्धीसाठी केलेला भगीरथ प्रयत्न आठवत होता. एवढ्या गर्दीत देखील मनात भगीरथ, संकल्प, पाप, पुण्य, साधना, वैभव असे विचार डोक्यात घोंगावत होते.

त्यानंतर आम्ही हॉटेलकडे निघालो कारण पुढे जेवण, थोडी विश्रांती आणि पुढच्या दिवसाची तयारी करण्यासाठी आराम गरजेचा होता.  कारण पुढच्या दिवशी आम्हाला सीतापूर/सोनप्रयाग या बेस गावाकडे रवाना व्हायचे होते. तिथं पोहचून सकाळी लवकर उठून शक्य तेवढं लवकर केदारनाथ मार्ग जो आयुष्यातील one of the most awaited अनुभवांपैकी एक होणार होता. लवकर भोजन करून एक छोटी मिटिंग घेऊन दुसऱ्या दिवसाची आखणी केली. जातांना कुठले कुठले दर्शन, कोणत्या ठिकाणी किती वेळ द्यायचा हे ठरले आणि सगळे निद्रासीन झाले.


क्रमश:

प्रा. सचिन शंकर गाडेकर

(गडकरी समूह)

Comments