“बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची केदारनाथ यात्रा (भाग १- संकल्प)
“बाबा बोलावतात तेव्हाच…” — आमची
केदारनाथ यात्रा (भाग १- संकल्प)
आपल्यापैकी अनेकांसाठी केदारनाथ हे फक्त एक तीर्थक्षेत्र नसून आयुष्यात एकदा तरी अनुभवायचं स्वप्न असतं. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे स्थान मनाला आधीपासूनच ओढ लावत असतं. आमच्याही म्हणजेच गडकरी समूहाच्या मनात हे स्वप्न अनेक वर्षं होतंच; पण त्या स्वप्नाला खरं रूप मिळालं ते फेब्रुवारी महिन्यातील Kamalgad Fort ट्रेकदरम्यान. कमळगडच्या माथ्यावर बसून गप्पा रंगल्या आणि अचानक विषय निघाला “यंदा केदारनाथ करूया का?”
सगळ्यांच्या
डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. कल्पना स्वप्नातून नियोजनात आली आणि त्याच दिवशी एक
WhatsApp ग्रुप तयार झाला. निलेश भाई म्हणजे एक घाव दोन तुकडे. कसलाही विलंब
न करता त्यांनी शंखनाद केला. सुरुवातीला काही जण मजेत बोलत होते; पण बघता बघता तब्बल २८ जण या यात्रेसाठी तयार झाले ते सुद्धा एका
दिवसात. वैशाखात वणवा पेटावा असा माहौल तयार झाला.
अखेर
एका marathon मिटिंग नंतर तारखा ठरल्या,
प्रत्येकाने आपापल्या सुट्ट्यांचं नियोजन
केलं आणि मग सुरू झाला खरा अभ्यास. केदारनाथचा रूट,
हवामान,
ट्रेकची तयारी, राहण्याची व्यवस्था,
आवश्यक साहित्य, उंचीमुळे होणारे बदल,
मंदिराचे वेळापत्रक — प्रत्येक गोष्टीवर
संशोधन सुरू झालं. YouTube व्हिडिओपासून ब्लॉग्सपर्यंत शक्य तेवढ्या लोकांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून सगळ्यांकडून
माहिती घेतली गेली. दरम्यान अनेक अनौपचारिक मिटिंग्स झाल्या.. प्रवास किती
दिवसांचा असावा, कोणकोणती ठिकाणं न चुकता करायची,
Haridwar आणि Rishikesh
मध्ये काय अनुभवायचं, ट्रेक कसा करायचा,
कोणत्या दिवशी दर्शन घ्यायचं — सगळं ठरत
होतं.
हा
प्रवास “raw” ठेवायचा की व्यवस्थित planned? यावरही बरीच चर्चा झाली. काहींना spontaneous adventure हवं होतं,
तर काहींना perfect planning. शेवटी दोन्हींचा सुंदर समतोल साधला गेला. अखेर दिवस निश्चित
झाले. रूट सील झाला. आणि उत्तराखंडमध्ये जेवण व स्थानिक प्रवासाची जबाबदारी
घेण्यासाठी एक agency ठरवण्यात आली. जाण्यासाठी जवळजवळ सगळ्यांनी flight चा पर्याय निवडला;
पण परतीसाठी काहींनी flight तर काहींनी train
चा पर्याय ठेवला — कारण प्रत्येकाला
प्रवास आपल्या पद्धतीने अनुभवायचा होता.
केदारनाथची
यात्रा ही फक्त एका मंदिरापर्यंत पोहोचण्याची गोष्ट नसते. ती सुरू होते एका
विचारातून, वाढते मित्रांच्या उत्साहातून आणि पूर्ण होते श्रद्धा, मैत्री आणि हिमालयाच्या साक्षीने. आमच्यासाठीही ही यात्रा तशीच होती — स्वप्नातून वास्तवात
उतरलेली. “बाबा बोलावतात तेव्हाच केदारनाथ घडतं,” हे वाक्य त्या क्षणापासून अधिक खरं वाटू लागलं.
क्रमश:
प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी समूह)



Comments
Post a Comment