॥ गणपती बाप्पा मोरया ॥ (बाप्पाची सेवा २०२६ भाग 1)

 

॥ गणपती बाप्पा मोरया ॥

(बाप्पाची सेवा २०२६ भाग 1)


दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा घरी आले… पण खरं सांगायचं तर बाप्पांचे आगमन एका दिवसाचे असले, तरी त्याची चाहूल आणि तयारी मनात मात्र कितीतरी दिवस आधीपासून सुरू झालेली असते. यंदा बाप्पा बारा दिवसांसाठी घरी विराजमान होणार होते. त्यामुळे गणपतीच्या आगमनाची तयारी जवळपास पंधरा दिवस आधीपासूनच डोक्यात सुरू होती. यंदा काय करायचं? सजावट कशी असावी? आरास कशी मांडायची? बाप्पांचे स्वागत थोडे वेगळे कसे करता येईल? घरातला प्रत्येक कोपरा कसा सजवता येईल? कोणत्या गोष्टी स्वतःच्या हाताने करता येतील? असे असंख्य विचार मनात घोळत होते.



विचारांची यादी मोठी होत गेली आणि दिवस मात्र कमी होत गेले! बाप्पांच्या आगमनासाठी प्रत्यक्ष तयारीला सुरुवात केली की वेळ कसा निघून जातो कळतच नाही. एखादी कल्पना सुचते, ती प्रत्यक्षात आणताना दुसरी कल्पना डोक्यात येते. काहीतरी जमते, काहीतरी पुन्हा करावेसे वाटते. कधी सजावटीचा एखादा भाग आवडत नाही, तर कधी अगदी साधी गोष्टच मनाला जास्त भावते. आणि या सगळ्या गडबडीत मनात एकच विचार असतो  की आपल्या बाप्पांचे स्वागत मनापासून, अगदी आपल्याला जमेल तसे सुंदर झाले पाहिजे!


दरवर्षीप्रमाणे यंदाही घरीच शाडूच्या मातीची बाप्पांची तृप्ती आणि चिल्लरपार्टीने  मूर्ती बनवली. ही मूर्ती घरी बनवण्यामागे केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा विचार नाही. त्यापलीकडे एक वेगळाच भाव आहे… एक आपलेपणा आहे… आणि बाप्पांसाठी दिलेला वेळ, प्रेम आणि काळजी आहे. बाजारातून तयार मूर्ती आणणे आणि स्वतःच्या हाताने बाप्पांना आकार देणे यात खूप मोठा फरक आहे. इथे मूर्ती बनवण्याची प्रक्रिया ही केवळ काही तासांची नसते; ती एक हळूहळू घडणारी भावनिक प्रक्रिया असते.

याची सुरुवात होते त्या साध्या मातीपासून… शाडूची माती आणायची, ती मळायची, व्यवस्थित तयार करायची आणि मग तिच्यातून बाप्पांचा आकार शोधायला सुरुवात करायची. सुरुवातीला मातीचा एक गोळा… मग हळूहळू त्याला आकार येऊ लागतो. थोडी माती इथे, थोडी तिथे… कधी आकार सुधारत, कधी पुन्हा थोडी माती जोडत… बाप्पांचे रूप हळूहळू स्पष्ट होत जाते. माती मळताना हात मातीने माखतात, पण मन मात्र बाप्पांच्या विचारांनी भरून जाते. मूर्तीला आकार दिल्यानंतर ती लगेच पूर्ण होत नाही. तिला वेळ द्यावा लागतो. ती हळूहळू सुकते. आपण दररोज तिच्याकडे पाहतो… कुठे काही सुधारता येईल का, एखादा भाग अजून नीट करता येईल का, याचा विचार करतो.


आणि मग येतो रंगकामाचा टप्पा. तिथे कुठेही लुडबुड करता येत नाही. शांतपणे रंगकाम होऊ द्यावे लागते. एकेक रंग सावकाश चढवताना बाप्पांचे रूप आणखी खुलत जाते. चेहरा, डोळे, मुकुट, वस्त्र… प्रत्येक छोट्या तपशीलात आपला वेळ आणि आपले मन गुंतलेले असते. आणि गंमत अशी की, बाप्पा एका दिवसात तयार होत नाहीत. ते हळूहळू तयार होतात… एक दिवस माती…एक दिवस आकार… एक दिवस सुकणे… एक दिवस रंग… आणि प्रत्येक दिवसागणिक बाप्पा मनाच्या आणखी जवळ येत जातात. म्हणूनच घरी बनवलेल्या बाप्पांकडे पाहताना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. ही केवळ मातीची मूर्ती नसते. त्या मूर्तीमध्ये आपला वेळ असतो, आपली मेहनत असते, आपली कल्पना असते, थोड्या चुका असतात, पुन्हा केलेले प्रयत्न असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाप्पांसाठी मनापासून दिलेला वेळ असतो. कदाचित म्हणूनच बाप्पा तयार झाल्यावर त्यांच्याकडे पाहताना एक वेगळे समाधान मिळते.

मंगलमूर्ती मोरया

क्रमश:

प्रा. डॉ सचिन शंकर गाडेकर

Comments