बाप्पा आले… केदारनाथ घेऊन! भक्ती, सर्जनशीलता आणि बारा दिवसांच्या सुंदर आठवणींचा प्रवास
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
बाप्पा आले… केदारनाथ घेऊन! भक्ती, सर्जनशीलता आणि बारा दिवसांच्या सुंदर आठवणींचा प्रवास
बाप्पांसोबत काहीतरी विशेष देखावा करावा, असं मनात होतं. बाप्पांची मूर्ती आपण घरीच बनवतो; मग त्यांच्या स्वागतासाठीचा देखावाही आपल्या हातानेच साकारावा, अशी इच्छा झाली. आणि याच विचारातून यंदाच्या देखाव्याची कल्पना सुचली. यावर्षी केदारनाथची यात्रा करण्याचा योग आला होता. त्या यात्रेच्या आठवणी अजूनही मनात ताज्या होत्या. केदारनाथच्या त्या भव्य मंदिराचं रूप, आजूबाजूचा डोंगराळ परिसर, वातावरणात जाणवणारी शांतता आणि मनाला स्पर्शून जाणारा तो अनुभव… हे सगळं बाप्पांच्या देखाव्यात पुन्हा एकदा अनुभवावं असं वाटलं. यंदा बाप्पांसोबत केदारनाथ मंदिर साकारायचं! कल्पना मनात आली आणि कामाला सुरुवात केली.
सुरुवात
झाली पुठ्ठे कापून मोजमापं केली, कागदावर आकार काढले आणि एकेक भाग कापायला सुरुवात केली. मंदिराचा आकार, त्याची उंची, रुंदी, दरवाजे, भिंती, कळस… प्रत्येक गोष्ट मोजून आणि पुन्हा तपासून करावी
लागत होती. तुकड्यांना एकत्र जोडताना हळूहळू केदारनाथ मंदिराचा आकार
दिसू लागला. सुरुवातीला तयार झालेलं मंदिर छोटं होतं. पण ते समोर
उभं राहिल्यावर एक वेगळीच कल्पना मनात आली “हे अजून मोठं करता येईल!” तृप्तीने एक रात्र जागून मंदिर बनवलं आणि ते खूपच
छोटं वाटू लागल्याने यापेक्षा थोडं मोठ मंदिर करते असं ठरवून ती परत कामाला लागली.
आमचं यातलं योगदान म्हणजे पुठ्ठे कापणे, रंग देणे आणि कोतूक करत उत्साह वाढवणे
एवढं असेल पण जे होतंय ते खास असणार आहे दिसत होतं.
मग पुन्हा
मोजमापं केली. तिन पुन्हा पुठ्ठा घेऊन कापकाम करत पुन्हा नव्याने सुरुवात झाली. पहिल्या
छोट्या मंदिराने जणू मोठ्या मंदिराची दिशा दाखवली. त्यापेक्षा मोठं, अधिक उठावदार आणि अधिक बारकावे असलेलं केदारनाथ
मंदिर साकारण्याचा प्रयत्न सुरू झाला. हळूहळू मंदिर आकार घेत गेलं. समोरचा भाग, प्रवेशद्वार, भिंती, छत आणि मंदिराची ओळख ठरवणारे छोटे-छोटे तपशील जोडत मंदिर साकारलं. तिलाच काय
आम्हाला सगळ्यांना काम करताना जाणवत होतं की, देखावा तयार करण्यापेक्षा त्या प्रक्रियेत रमण्यातच खरी
मजा आहे.
तीन चार
दिवस दिवस कधी गेले कळलंच नाही. बाप्पांसाठी केलेली मूर्ती आणि बाप्पांसाठी स्वतःच्या
हाताने उभं केलेलं केदारनाथ मंदिर या दोन्हींकडे पाहताना मनात एकच भावना होती की आपल्या
हातांनी तयार केलेल्या या छोट्याशा विश्वात बाप्पांना विराजमान करायचं आहे. केदारनाथच्या यात्रेत अनुभवलेली
ती भव्यता, त्या मंदिराची पवित्रता
आणि तिथे मनात निर्माण झालेली श्रद्धा… यंदा बाप्पांच्या सान्निध्यात पुन्हा अनुभवण्याचा
हा एक छोटासा प्रयत्न आहे. लहान मुलांचे टेडीतले फोम वापरून हिमालय तयार झाला.
वरती विजांनी कडाडणारे आकाश साकारले. रोषणाई केली आणि बाप्पाच्या बाजूला केदारनाथ...वाह!
दररोजची
आरती, प्रसाद, नैवेद्य, मोदक आणि बाप्पांच्या चरणी घालवलेले काही निवांत क्षण…
दिवस कसे जात होते कळतच नव्हतं. कधी सकाळची आरती, कधी संध्याकाळची आरती… कधी घरच्यांसोबत, कधी मित्रमंडळींसोबत… आरतीच्या
वेळी एकत्र येणं, प्रसाद वाटणं
आणि बाप्पांसमोर काही क्षण शांत उभं राहणं—या सगळ्यातच दिवसाचा आनंद सामावला होता. आणि अर्थातच मोदक! बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणून मोदकांची लगबगही होतीच.
तुप्तीला अन्नपूर्णेचे वरदान असल्याने रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पाला आणि पर्यायाने
प्रसाद म्हणून आम्हांस मिळाले. तो प्रसाद अनेकांना देता आल्याचे समाधान आणी आनंद वेगळाच
आहे.
खर सांगावं
तर गणेशोत्सवाची मजाच काही वेगळी. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस म्हणजे आरती करता करता, प्रसाद वाटता वाटता, बाप्पांसोबत वेळ घालवता घालवता बारा दिवस अक्षरशः झरझर
निघून गेले.. गणेशोत्सवाचा काळ कितीही मोठा वाटला, तरी बाप्पा घरी आले की वेळ मात्र नेहमीच कमी पडतो.
या बारा दिवसांत घरात आरत्या झाल्या, मोदक झाले, प्रसाद झाला, हास्य झालं, गप्पा झाल्या. यंदा केदारनाथी बंधू चेतन कोठावदे यांनी
शिवचरणी आणि बाप्पा चरणी बासरीवादन सेवा दिली. गेल्या अनेक वर्षातला हा आगळा आणि दिव्य
अनुभव. बासरीचे सूर थेट शिव कैलास पर्यंत घेऊन गेले. बाबा भोले अत्यंत आनंदाने ती सेवा
स्वीकारत असतील आणि शेजारी बाप्पा त्यांच्या पप्पांचे पूजन पाहून सुखावले असतील.
या सगळ्या धामधुमीत महत्त्वाचं म्हणजे बाप्पांसोबत असण्याचा आनंद मिळाला. बाप्पांच्या येण्याची तयारी करताना जेवढा आनंद होता, तेवढाच त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या सहवासात होता. आता फक्त मनात एकच भावना होती कि बाप्पा, यंदा खूप काही दिलंत आठवणी दिल्यात, आनंद दिलात आणि तुमच्यासोबत घालवायला सुंदर बारा दिवस दिलेत. ज्यांची आतुरतेने वाट पाहिली, ज्यांच्यासाठी पंधरा दिवस तयारी केली, ज्यांना मातीपासून घडवलं, ज्यांच्यासाठी केदारनाथचा देखावा उभा केला ते बाप्पा आता निरोप घेण्याच्या दिवसापर्यंत येऊन पोहोचले काही भूलचूक झाली असेल किंवा काही त्रुटी राहिल्या असतील माफ करा. पुढच्या वर्षी अजून विशेष सेवा देऊ आणि उत्सव साजरा करू.
गणपती बाप्पा
मोरया!
पुढच्या
वर्षी लवकर या!
-- प्रा. डॉ सचिन शंकर गाडेकर

.jpeg)








Comments
Post a Comment