किल्ले घनगड
किल्ले घनगड रायरेश्वर पठार , लोहगड, सिंहगड अश्या किल्ल्यांची भ्रमंती करून आमचा आत्मविश्वास बळावला आणि पुढच्या वेळी घनगडावर जायचं पक्क झालं. यावेळी मागचे vlog आणि अनुभव ऐकून सगळे एकदम तयार होते. म्हणता म्हणता पाच चे पंधरा जण झाले. एक ठिकाण, वेळ आणि जबाबदाऱ्या निश्चित करून सकाळी निघायचं ठरलं. या वेळेस सगळे वेळेवर पोहोचले आणि ताम्हिणी मार्गे पिंपरी गाव आणि पुढे भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव अश्या मार्गे जायचं ठरलं. मग काय, सकाळी वेळेत निघालो. पिरंगुटला मस्त पेटपूजा आणि चहापान घेऊन पुढे निघालो. ताम्हिणी घाट मार्गे जसे पिंपरीकडे निघालो तसे सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. अगदी शंभर दोनशे फूट अंतरावरील गाड्या अन रस्ते धूसर झाले होते. मग गाडी सेफ जागी थांबवून निवांत त्या धुक्यात हरवून गेलो. निसर्ग क्षणात काय सुख देऊन जाईल सांगता येत नाही. बराच वेळ थांबलो, काही झकास फोटो घेतले, काही सिनेमा स्टाईल स्वप्न रंगवलं आणि पुढे निघालो. अनेकदा मोह आवरून, मनाला समजावून ठरलेल्याच ठिकाणी जावं लागतं आणि मग लोक म्हणतात की जीवन एक रेडियो आहे जे वाजेल ते गाणे ऐकावे लागेल. जीवन काय spotify ची लिस्ट आहे क