इकोले व्हॅली ट्रेक / Infinity Pool Trek
इकोले व्हॅली ट्रेक / Infinity pool trek
मागच्या आठवड्यात सुधागड मुक्कामी जायचं ठरलं होतं. पण, तो बेत रद्द झाला आणि आता आठवडा रिकामाच राहतो कि काय अशी रुखरुख लागली होती. शनिवारी संध्याकाळी एकदम प्रशांतभाई आणि मी एकदा भेटलो आणि नवा बेत आखला. एक दिवसीय आणि छोटा ट्रेक करण्याचे ठरले. मी एकोले सुचवले आणि तीर सही निशानेपर लगा. लगेच गडकरी समूहाला पाचारण केले गेले. काही जण तयार झाले आणि सकाळी सहाला निघायचं ठरलं. आता सगळे मिळून पाच जण तयार झाले होते.सकाळी तीन मोठे आणि माझ्या सोबत चक्क स्वरूपा तयार झाली. तिने झोपण्यापूर्वी इकोले सर्च करून सगळी तयारी करून ठेवली.
सकाळी सहाला निघालो आणि वाट धरली ताम्हिणी घाटाची. रविवार असल्याने तुरळक गर्दी रस्त्यावर होती. नेहमीचा शिवसागरचा थांबा घेऊन भरपेट नाश्ता करून मार्गस्थ झालो. अंधारबनचा रस्ता नेहमीच भुरळ पाडतो. या वर्षात किमान दहा वेळा याच ठिकाणी निवांत वेळ घालवला आणि पावसाळा कसा व्यतीत झाला हे शब्दांत सांगणं कठीणच आहे. इकोलेच्या जवळील घनगड ट्रेक तर कडक झाला होता. ट्रेक भर पावसात पूर्ण केला होता आणि ट्रेक नंतर एका वाहत्या ओढ्यातील प्रवाहात केलेलं स्नान खरा आनंद होता. भांबर्डे गावाचा रस्ता तसा निवांत आणि निसर्गाने संपन्न असा रस्ता आहे. हाच रस्ता इकडून लोणावळा कडे जातो. इकोले गावाकडे जाण्यासाठी ताम्हिणी किंवा लोणावळा मार्गे जाता येते. ७० ते ८० किलोमीटर अंतर कधी संपते हे कळत नाही.
इकोले गावाजवळील पार्किंगला वाहन पार्क करून निघालो. स्वरूपा अत्यंत उत्साहानं सोबत आली होती. आम्ही काही ट्रेक सोबत केले आहेत पण ते सरळ किंवा सोप्या श्रेणीतले होते.इकोले व्हॅली ट्रेक तसा सोपा ट्रेक नाही. किमान पाऊण ते एक तास पूर्ण व्हॅली उतरून जावे लागते. आम्ही लगेच निघालो. सकाळचे ९ वाजले होते. रविवार असल्याने किमान २५० लोक आज तिथं असतील या भाबड्या भावनेने आम्ही गेलो होतो. आणि पार्किंगजवळ उभ्या गाड्या पाहून मनात धस्स झाले. अर्थात आता इतक्या दूर येऊन दुसरे ठिकाण शोधणे अवघड होते. काळजावर दगड ठेवून आम्ही ट्रेकला सुरुवात केली.
स्वरूपा इतकी उत्साहात होती कि ती सगळ्यात पुढे चालत होती. इकोलेचा तो नैसर्गिक कुंड कधी येतो आणि कधी त्यात उडी मारते असं तिला झाले होते. अर्थात प्रशांतभाई आणि दिगंबरभाई पुढे चालत तिला सोबत घेऊन चालले होते. टेकडीच्या कपारीच्या बारीक वाटेने तोल सांभाळत चालाव लागत होते. अश्या ट्रेकला पूर्ण लक्ष देऊन सांभाळून चालावे लागते. एक चूक आणि थेट किमान १०० फुट खोल दरीतच पुढचा मुक्काम होईल असे वाटत राहते. सूर्यनारायण कडक तळपत होते पण व्हॅली ट्रेक असल्याने थंड हवा आणि सावली असल्याने दम लागत नव्हता. हळूहळू काळजीपूर्वक चालत आम्ही अर्धा ट्रेक पूर्ण केला. थोडेसे पाणी पीत, गप्पा मारत आणि विशाल सह्याद्रीला न्याहाळत पुढे निघालो.
ट्रेक संपत आला आहे हे तिथं होत असलेल्या मोठ्या आवाजाने लक्षात येत होते. किमान ३० ते ५० फुटावरून उडी मारत पाण्यात झेपावणारे तरुण मंडळी तर काय सांगावे? जसजसे कुंड जवळ येत होते उत्साह आणि जोश वाढत होता. या ठिकाणी यायचं आहे हे किमान एक वर्षं आम्ही ठरवत होतो आणि आज तो दिवस उगवला होता. तिथं शेवटचा भाग तर एकदम खतरनाक आहे. एक जुनी दोरी घट्ट पकडून खाली उतरायचे होते. स्वरूपाने कुठलीही भीती न बाळगता झरझर ती खाली गेली. तिथं असलेल्या मंडळीपैकी स्वरूपा एकटीच वय वर्षे दहा असणारी मुलगी होती. सगळेच तिला पाहून एकतर चकित होत होते किंवा तीच खूप कौतुक करत होते. सगळे तिला शाब्बासकी देत होते. या अश्या कौतूकाने ती अजूनच खुश झाली होती.
इकोले कुंडात मनसोक्त आनंद घेऊन आम्ही परत निघालो तेंव्हा किमान एक वाजला असावा आणि अजून अनेक ग्रुप कुंडाकडे जात होते. जाणारे येणारे स्वरूपाचे fan झाले होते. आता बाबा मला प्रत्येक ट्रेकला घेऊन जा असा गोड आग्रह ती देखील करू लागली. पुढे अर्ध्यावर आल्यावर एक सर्पराज देखील पहायला मिळाले. एक कडक बच्चू मस्त शिकारीला निघाला असावा किंवा रुटीन काम सुरु असावे. एक झलक मिळाली. फोटो घेतला आणि त्याला तिथंच सोडून पुढे निघालो. एका निवांत सावलीत बसून मस्त खानपान पूर्ण केले. स्वरूपाचा पहिला ट्रेक असल्याने तिला maggi मिळाली. आम्ही चहा घेतला. आणि समाधानाने परत निघालो.
सह्याद्रीत फिरण्याची आवड असणाऱ्या सगळ्यांनी एकदा तरी हा ट्रेक करावा असे वाटून जाते. कुंडाच्या टोकावरून दिसणारी व्हॅली म्हणजे स्वर्गच. कितीदा आणि कितीवेळ न्याहाळत बसलो तरी मन भरत नाही हे ही खरेच. सह्याद्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्यांना समाधान मिळते. या प्रेमाचा स्पर्श झालेल्यांना या प्रेमाची चटक लागते. आणि नवख्यांना उभे राहते अमाप आकर्षण जे त्यांना ओढून आणते इथपर्यंत. असो. इकोलेचा हा ट्रेक ट्रेक आणि कुंड असा बोनस स्पॉट आहे. रिस्क है तो इश्क है वाला ट्रेक है ये !
– प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment