इर्शाळगड ट्रेक कहाणी

 

इर्शाळगड ट्रेक कहाणी

या वर्षीच्या अनेक ट्रेकमधील आठवणीत राहणारा ट्रेक कुठला राहिला असेल तर तो इर्शाळगड ट्रेक. ट्रेक तर उत्तम झालाच पण काही वर्षांपूर्वी झालेली आपत्ती किती मोठी होती हे मनातून काही केल्या जात नव्हते. जिथं नैसर्गिक आपत्ती जणू मृत्यू बनून तांडव करून गेली तिथं काही सुचत नव्हतं. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि शेकडो जीव टांगणीला लागले. असो.

निसर्गवेधच्या निमित्ताने 2 वर्गांचा समूह घेऊन आम्ही ट्रेकला जायला निघालो. मुंबई पुणे महामार्गाने प्रवास करत पनवेल जवळील मोरबे धरणाजवळ जावे लागते. आम्ही नेहमीप्रमाणे वेळेत निघालो. गप्पा, गाणी, डान्स आणि मस्त आनंद घेत गडाच्या पायथ्याला पोहचलो. मार्गातच न्याहारी केल्याने आता फौज तयार होती ट्रेकसाठी. समोर उंचच्या उंच असं सुळका पाहून थोडा वेळ मनात धस्स झालं असावं अनेकांच्या. पण एकदा निर्धार केला कि माग हटायचं नाही हे ठरवूनच गेलो होतो आम्ही.

ट्रेक सुरु झाला. सोबत पुरेसे पाणी सोबत घेऊन मजल दर मजल करत सगळे पुढे निघाले. एक उभी चढण चढून गेले कि दुसरी चढण येत होती आणि दमछाक होत होती. थोडा थोडा विश्राम करत हळूहळू पुढे जात होतो. काही जण थोडेसे मागे पडल्याने आमचा वेग कमी होत होता. अर्थातच सोबत आल्याने सोबतच ट्रेक पूर्ण करण्याचे ठरवले असल्याने सर्वांना सोबत घेणे गरजेचे असते. कुठल्याही अनोळखी ठिकाणी ग्रुप छोटा असो वा मोठा सर्वांनी एकमेकांना सोबत घेऊनच पुढे गेले पाहिजे. अश्याने मनोधैर्य टिकून राहतेच पण हरवले जाणे किंवा थकणे टाळता येते.

एक अर्ध्याच्यावर अंतर कापल्यानंतर इर्शाळवाडी लागते. मुद्दाम जातांना वाडीकडे न जाता थेट वरती जायचं ठरले. एक छोटेखानी चढण पार करत डावीकडे पाहिलं तर मोरबे धरणाचा अथांग पसारा पहायला मिळतो. आजूबाजूला सर्वत्र पर्वतरांग आणि धरण यामुळे बहुतेक वातावरण थंड होते. उन्हाळा जास्त जाणवत नव्हता. अर्थात सतत चढण असल्याने सगळेच दमत होते आणि पर्यायाने ब्रेक घेत घेत चालत होते. गडाच्या उंच भागावर गेल्यावर डावीकडून नेढ्याकडे जाणारी वाट आहे. निमुळती पण सुरक्षीत अशी ती वाट आहे. थोडं सावध होऊन चालत रहावं लागतं. एका बाजूला पाण्याचं टाकं आहे. त्यातलं पाणी थंडगार तर आहेच पण स्वच्छ देखील आहे. आणि हे टाक्याचं पाणी प्रसंगी संजीवनी ठरू शकते भटक्यांसाठी. 

याच टाकायच्या पुढे एक खतरनाक वाट आहे. तुटक्या आणि कुजलेल्या लाकडांची एक शिडी लावली आहे. काहीसे बोल्ट मारून एक केबल जोडून ठेवलेली आहे. त्याला पकडून भीती झुगारून सगळे नेढ्याकडे पोहोचले. निसर्गाचा हा चमत्कार फार कमी ठिकाणी पहायला मिळतो. काही फोटोग्राफी केली आणि अजून पुढे वरती सुळक्याकडे न जाता परत खाली जाण्याचे ठरले. नेढ्यातून दूरवर दिसणारा प्रदेश पाहून हे भासत होते कि हा गड देखील निरीक्षणासाठीच असेल.

ठरल्याप्रमाणे हळूहळू खाली निघालो. वाडीच्या अगोदर एक मोठ्या झाडाखाली निवांत बसून भूक लागल्याने सोबत आणलेली maggi करायचं ठरलं. मुलांनी लगेच काड्या गोळा केल्या. आम्ही दगड लावून चूल तयार केली. काहीच वेळात किमान ३० जणांना पुरेल इतकी maggi दोन वेळा बनवली. लगेच चहा देखील तयार झाला. अश्या थकवणाऱ्या  ट्रेक नंतर हे सगळं म्हणजे स्वर्गसुखच नाही का? वेळ होता आणि पोटात भूक...मग काय, ताव मारला आणि पुढे निघालो.

थोड्याच अंतरावर वाडी आमची वाट पहात होती. सोबत आलेल्या ट्रेक लीड दादाने सगळी कहाणी कथन केली. त्या केवळ वर्णनाने अंगावर शहारे येत होते. शांत उभं राहून श्रद्धांजली वाहिली आणि जिथं हे घडलं तिथं जायचं ठरलं. भूस्खलन झाल्याने ओढवलेली आपत्ती किती भयंकर असू शकते ते माळीन गावाची घटना आणि इर्शाळ वाडी सांगून जाते. आता सगळे गाव सुरक्षित ठिकाणी पुनर्वसीत केले आहे पण गावकरी अजूनही इथं येऊन देवीला दिवा लावतात आणि प्रार्थना करतात. आजही गवताच्या गंज्या डोक्यावर घेऊन जाव्या लागतात इतक्या दुर्गम ठिकाणी हि वाडी होती.

तिथूनच परत जाताना जिथं मृत पावलेल्या व्यक्ती जिथं दफन केल्या त्या जागेहून पुढे जावे लागले. तिथं गेल्यावर काही क्षण सुचत नव्हते. कुणाचे संसार उन्मळून पडले असतील तर कुणाच्या स्वप्नांचा चुराडा झाला असेल. आपत्तीच्या त्या काळात बचाव कार्य किती अवघड होते हे ऐकून वाईट वाटत होते. काही घरं आणि काही देह अजूनही ढिगाऱ्याखाली असू शकतात हि शक्यता देखील वर्तवली.

आम्ही शांततेत तिथून खाली जायला निघालो. जातांनाचा उत्साह आता गंभीर झाला होता आणि मनात केवळ याला जबाबदार कोण हाच विचार येत होता. गड उतार झालो होतो पण उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. केवळ अतिवृष्टी झाली म्हणत निसर्गावर ढकलावं कि गावकरी का अश्या ठिकाणी निवास करत होते असं म्हणावं कि कितीक समित्या आल्या न गेल्या पण इथं गरीबाच्या जीवाची चिंता करतोय कोण म्हणत आपलं गप्प बसावं हेच कळेना..असो.

हा ट्रेक नेहमी लक्षात राहील. संपूर्ण ट्रेक उत्साहाने पार पडला यासाठी विद्यार्थी समूहाचे आभारच आणि इर्शाळवाडीची वारी परत होईल असं वाटत नाही. त्या संकटात जीव गमावलेल्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा असे घडू देऊ नको असाच नवस ते गावकरी देवीला करत असावे. आम्हीही त्यात सामील आहोत हे देविमाता.

-- प्रा.डॉ. सचिन शंकर गाडेकर

 

 

 

Comments