उत्सव- बेरीज अन वजाबाकी .

उत्सव- बेरीज अन वजाबाकी ..... १५/९/१६

सार्वजनिक अन वैयक्तिक स्तरावर साजरे होणारे उत्सव अन त्यामागचे बेरीज अन वजाबाकीचे गणित मांडले तर कळेल की काय विचार करायचा अन काय नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि जर तो सार्वजनिक उत्सव असेल तर त्याला नको तेवढ्या बाजू उभ्या राहतात.

या सगळ्या उत्सवात होणारी आर्थिक उलाढालच जास्त करून चर्चीली जाते. आता होणारी आर्थिक उलाढाल ही बेरीज की वजाबाकी? कितीही दुष्काळ असेल अथवा सगळं आलबेल असेल तरी किमान जनता घराबाहेर पडून उत्सवास लागणारे साहित्य खरेदी करतात. बाजारपेठ नकळत फुलत जाते. अगदी हातावर गुजराण करणाऱ्या कुटुंबाना येणारा प्रत्येक अवसर ही बेरीज नाही का? मोठ्या व्यापारीलोकांना किती फायदा होतो या पेक्षा या छोट्या घटकांना मिळणारा दिलासा मोठा नाही का? यामध्ये होणारी वाहतूक कोंडी किंवा गर्दी ही वजाबाकी आहे अन या पेक्षा कुणाच्या घरी जाणारे काही काही पैसे बेरीज नाही का?

उत्सवात होणारी धामधूम अन गोंगाट फार जास्त चर्चिला जातो. सन्माननिय कोर्टाने दिलेले कडक निर्देश सुध्दा आहेतच. परवा घरी परततांना एका मंडळात काही ओळखीची मंडळी मस्त नाचत होती. या गाणी अन नाच प्रकारावर खूप टीका होते. मान्य आहे की शिवराळ गाणी अन बीभत्स नाच नसावा. गणपतीची गाणी लावत त्या धुंदीत मस्त होणे जर वजाबाकी असेल तर त्या निमित्ताने स्ट्रेस विसरत, कामाचा ताण बाजूला ठेवत, हात वर करत धुंद होऊन जर आपण नाचत जयघोष करत असू तर ती बेरीज नाही का? सणवार आहेतच मुळी माणसात नवचैतन्य भरायला. रोजरोजच्या धकाधकीत काहीसे नवीन करत, रोजचे ओरडणे, कामाचे टेन्शन बाजूला ठेवत
उत्सवात सामील होणे बेरीज नाही का?

उत्सवात स्थापन होणारे मंडळ अन त्यांची कार्यशैलीवर बरीज टीका होते. मंडळे तर नेहमीच आक्रमक दिसतात. अर्थात थोडी सामजिक भूमिका घेणारे कायमच सामाजिक नसतात. रोज कामधाम करणारे किमान या कारणाने एकत्र येतात. एकत्र बसून थीम ठरते. उपक्रम ठरतात. या सगळ्याला राजकीय रंग चढतो ही वजाबाकी आहेच. लोकांकडे मागितली जाणारी वारेमाप वर्गणी तर संतापजनक असते. या सगळ्या वजाबाकीत लक्षात ठेवायला हवे की आपल्यातलेच हे काही प्रतिनिधी पुढे येत ये करतात ही बेरीज आहे. ते अधिक वेळ देत सजावट वगैरे करतात. थोडीशी शिस्त लागली तर सगळी चिंता मिटेल. या निमित्ताने काही अंतर्मुख लोक सामजिक उपक्रमात एकत्र येतात. एकमेकांना भेटतात. शहरात तर शेजारी कोण आहे हे अशा उत्सवातच कळते म्हणे. याला बेरीज म्हणावी लागेल.

आता वजाबाकीत खूप सारं आहे पण कुछ पाने के लिये म्हणे कुछ खोना पडता है |  आता जर विधायक भाग समोर ठेवला तर नकारात्मक टीका कमी होईल अन उत्सव अजून जास्त जाणीवपूर्वक साजरे होतील. आपण सुद्धा बेरीज करावी. वजाबाकी नेहमीच आनंद कमी करते. या वजाबाकीला नाकारून चालणार नाही पण बेरीज विसरून चालणार नाही. पेला अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला हे ज्याने त्याने ठरवावे. चला तर मग अजून बरीज मोठी यादी आहे बेरीज अन वजाबाकीची.

                                                  --- सचिन गाडेकर

Comments