गृहिणी घर अन अवतीभवती बरच काही

गृहिणी घर अन अवतीभवती बरच काही ..... २८/९/१६

रोजच्या दिनचर्येत थोडासा बदल झाला अन काही गोष्टी प्रत्ययास आल्या. मागे एकदा एक निबंध वाचण्यात, आला होता.. सूर्य सुट्टीवर गेला तर , आई सुट्टीवर गेली तर..गृहिणी सुट्टीवर गेली तर....
सूर्य उगवला अन पहिले लक्षात आले ते अंगण. झालेल्या थोड्या सरींमुळे अंगणात वाहून आलेले छोटे मोठे खडे स्वतः चे अस्तित्व भासवत होते. अंगणातील प्राजक्त वाहिलेल्या मंद वाऱ्याने अन हवेने मनसोक्त ओघळून पडला होता. काही जीर्ण पाने त्यांची सोबत करत होतीच म्हणा. एखादे गळून पडलेले कच्चे सीताफळ, काही मृतप्राय पडलेल्या गोगलगायी ही स्पष्ट दिसत होत्या. यांची दखल घेत अंगण साफ करणे हे पहिले कर्तव्य. घरासमोरून होणारी चहलपहल सुद्धा महत्वाची असते. झालेला पाउस अंगण मस्त गार करून गेला होता. अंगणात टाकलेला मुरूम तर स्वत: छिन्न-विच्छिन्न होऊन भू मातेशी जणू एकरूप झाला होता. या सगळ्यांकडे पाहायला वेळ नसेलही पण त्यांची पुसटशी दखल घेत झाडू आपले काम सुरु करतो.

अंगण साफ झाले की लक्षात येते ती चूल. अजूनही हिटर,गिझर चा स्वीकार न करता पारंपरिक पद्धतीने पाणी तापवले जाते. कालच्या सरीं मुळे निश्चित गार पडलेली चूल काही सांगू इच्छित असेल. तिच्यात पडलेली ओली लाकडे तर भाग्यवान कारण आज ते जळणार नाही. ओलेचिंब होणे त्यांच्या नशिबी आले अन अजून काही श्वास घेण्याचं वरदान ही. त्या चुलींना फक्त आधार वाटतो त्या शेणाच्या गोवऱ्या अन केरोसीनचा. त्या चुलीला परत जिवंत करत पाणी तापवावे लागते अन मग अजून एक काम पूर्ण होते. ती पुन्हा पेटून स्वतःला जाळत नित्याचे कर्म करू लागते.

नंतर वेळ असते ती लगबग अन धावपळ सकाळचा डबा तयार करून देण्याची.. जितक्या व्यक्ती तितक्या आवडीनिवडी. यात कसरत असते ती सुवर्णमध्य साधत सगळे कसे  खूष राहतील ही कसरत तारेवरच्या कसरती पेक्षा कमी नाही. बाजारात मिळणाऱ्या भाज्या अन आवडीनिवडी यांचा ताळमेळ कधीच लागत नाही म्हणा. झालेल्या उशिरात एक स्मितहास्य देत तर कधी नाराजीचा भाव झेलत कर्मयोग मात्र चालूच असतो.

यानंतर वेळ येते ती चहा पाणी. एव्हाना सगळे घरटे पूर्णपणे जागे होऊन आपल्या आपल्या डिमांड ठेवत जणू दडपण टाकत असते. त्यात जर कुणाची साखर कमी जास्त असेल तर आणखी अवघड. कमी दुध, थोडे आले, सुंठ, गवती चहा असे अनेक प्रकार असतात   त्या सगळ्यात बनवणारा स्वत: बऱ्याचदा अनपेक्षित अतिथी आला तर स्वत: बनवलेला चहा प्यायला मुकतो अन त्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते असा पायंडा आहे म्हणे. आता चहा अन लगेच पुढील कामास गती येते. बऱ्याच कुटुंबात सकाळी न्याहारीची पद्धत टिकून आहे. पण काही ठिकाणी या गृहिणी कामाला एवढं जास्त झुकते माप देतात की रोजचा दिवस हा अर्धा उपवास घडतो न पर्यायाने शारीरिक व्याधी बळावत जातात. कपडे धुणे अथवा स्वयंपाक या गोष्टीत खूप जास्त शक्ती अन क्षमता लागते हे सर्वज्ञात आहेच. त्यात फरशी पुसणे अथवा जाळे-जळमटे किंवा कुठलेही आलेले काम थकवून टाकते हे नक्की.

या सगळ्यात सर्व गोष्टी जिथल्या तिथे असणे  अन सापडणे हे एक दिव्यच. त्यात कोणत्या कोपऱ्यात काय कधी ठेवले आहे हे घरातील लक्ष्मीच जाणो. कुणी विचारावे की हे अमुक कुठे आहे अन तिने सहज सांगावे की कुठे काय  सापडेल. यात टापटीपपणा पुरुष राखत असतील ते त्या लक्ष्मीचे नशीब अथवा घरोघरी मातीच्या चुली. मग ती महिला गृहिणी असो अथवा कुठे नोकरीला असो. सर्व या अव्यवस्थेने वैतागलेले दिसतात. यामध्ये कित्येक वर्ष जातात पण काही फरक पडेल असे चित्र नाही असा सर्वंकष अनुभव आहे.

असो आता सकाळ होऊन मध्यांन्न झालेला असतो. दुपार अन दुपारचे लोढणे पुढच्या भागात....

                                   --- सचिन गाडेकर

Comments