टॉयलेट: एक प्रेम कथा; अप्रतिम

टॉयलेट: एक प्रेम कथा; अप्रतिम १४/८/१७

सिनेमागृहात टॉयलेट: एक प्रेम कथा कधी लागतोय अशी वाटच पाहून होतो मी. पोष्टर पाहिले आणि परवा वेळ होता मग एकटाच गेलो. (आता एकटाच जाण्याचे कारण असे की विषय तसा आहे.) सोशल मिडीयावर अगोदरच असे जोक्स सुळसुळले आहेत. त्यात भर नको. काही ठिकाणी एकटेच जावे आणि त्यापैकी एक म्हणजे टॉयलेट...

तसे या चित्रपटात सर्वात प्रथम कौतुक अक्षय कुमारचे. अशा वेगळ्या चित्रपट घेणे आणि यशस्वी करणे त्यालाच जमावे. यात एक गंभीर आणि संवेदनशील समस्या आणि तथाकथित सभ्यता यांचा सुगम मेळ पाहायला मिळाला. जर कोणी सरप्राईज असेल तर भूमी पेडणेकर. अक्षय कुमार समोर तिचे अस्तित्व तिळमात्र कमी होत नाही. तिचा अभिनय तर कमालच. अप्रतिम संवादफेक आणि मस्त लूक. असं म्हटले तर अतिशयोक्ती न व्हावी की रेस में नया घोडा आया है | तिच्या संवाद आणि अभिनयाचा कस लागलेला दिसतोय. प्रेम आणि हक्क यात झालेली घुसमट तीने अप्रतिम साकारली आहे. कसा आणि किती कोम्प्रोमायीज करायचा याचा ताळमेळ जमताना दिसतोय.

या चित्रपटात एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मांगलिक असणे, कुंडली दोष, दोष निवारण, शास्त्राचे चुकीचे निरुपण,पुरुष प्रधान मानसिकता, घुंघट प्रथा, सरकारी कार्यप्रणाली, भ्रष्टाचार आणि बरच काही. इतके सगळे विषय स्पर्श करत हा चित्रपट तपुढे सरकतो. आता यातून कोण  किती आकलन करतो हा यक्षप्रश्न आहेच.

थोडेसे वास्तवाकडे गेलो तर दिसतेच कि आमच्या शेकडो खेड्यात आणि अनेक शहरवस्ती  अजूनही या विळख्यात आहे. हागणदारी मुक्तच्या पाट्या फक्त  शोपीस बनून राहतात. झोपडपट्टी, शेतीनजीक असणाऱ्या वस्त्या तर अजूनही सकाळी रपेट करताना दिसतात. यात हे सांगणे महत्त्वाचे कि या सगळ्या लोकांची पर्यायी व्यवस्था सुलभ अथवा सार्वजनिक शौचालय तयार आहेत. फक्त बदलत नाही तर ती जुनाट मानसिकता. भूमीच्या तोंडी दिलेले संवाद जर कोणी फेमिनीस्ट विचार अभ्यासले असतील तर संवाद लेखन आवडून जाईल. अप्रतिम लेखन आहे. स्त्री आणि तिचे हक्क गुंडाळून त्याचे हवे तसे मर्दन करणारा आमचा पुरुषप्रधान समाज जागा होईल तर नवलच. चित्रपटात बाप आणि मुलगा असा संघर्ष नसून तो रूढीगत सभ्यता आणि बदलती विचारसरणी यांचा लढा दिसतो.

थोडेसे वाटले म्हणून एका डॉक्टर मित्राला सहजच विचारले तर तो म्हणाला की दिवसभर शौच पोटात राहिल्याने अनेक स्त्रिया पोटाच्या आजाराला बळी पडतात. यात नायिका म्हणून घेतलेली टोकाची भूमिका हा आग्रह दाखवते की लढा म्हटलं की मग आर या पार असावा हा त्याचा उदेश्य. शौचालय बांधणीतील आर्थिक बाबी चिंताजनक आहेतच. सगळेच होणारा खर्च पेलवतील का हा प्रश्न अनेकजण करतात परंतु ही गोष्ट आपल्या स्वास्थ्य आणि सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे म्हटल्यावर तिचे मूल्य दुय्यमच. असो, अनेक गोष्टी भावल्या आणि करमणूक सोबतच प्रबोधन आणि आवाहन ही करतो हा चित्रपट. सर्वांनी वेळ काढून पाहावा असा चित्रपट आणि आपल्या आसपास ही असे विषय चर्चेला घेत तडीस न्यावे हाच एक संदेश असावा.


--सचिन गाडेकर 

Comments