बाबा, बुवा आणि लोटांगण .... २७/८/१७

बाबा, बुवा आणि लोटांगण .... २७/८/१७
पुन्हा एकदा हरयाणा आणि अजून एक तगडा, मोठा, श्रीमत, चार पाच करोड भक्त असलेला आणि कुबेरालाही लाजवेल असा थाट असणारा एक इसम संपूर्ण व्यवस्था हलवतो हे चित्र निराश करणारे होते. न्यायालयात जातांना असला रुबाब कशाने आला? २ करोड ची गाडी आणि शे पाचशे गाड्याचा ताफा कशाला हवा? कोणता दिग्विजय केलात आपण? कोणता राजसूय पार पडलात? कुठला सन्मानजनक उपक्रम राबवला की शांतीचे नोबेल पटकावले ? अथवा जगाच्या पाठीवर एखादा विक्रम केलात?
अरे कमाल आहे ना आपल्या देशाचीबलात्काराच्या आरोपीला अटक करा अटक करा म्हणत आम्ही मेणबत्त्या जाळत, आरडा ओरडा करत मोर्चे काढतो आणि तेच आम्ही बलात्काराच्या आरोपीला शिक्षा मिळाली की सैरभैर होत एखाद्या श्वापदासमान सार्वजनिक मालमत्ता जाळतो, आक्रोश करतो आणि लोटांगण घालतो. कसली मानसिकता आहे ही? एखाद्या आरोपीला शिक्षा देण्यापूर्वी पोलीस, राज्य राखीव दल आणि शेवटी मिलिटरी पाचारण करावी लागते हे कुठले राष्ट्र? कसा काय एवढा रुबाब वाढतो कुणाचा की तो कायद्यापेक्षा मोठा होऊन बसतो?
ज्या देशात असे उठसूठ बाबा देशाला, राज्याला वेठीस धरतात. सगळी व्यवस्था हतबल होते हे कसे काय? हा विषय आहे राजकीय इच्छाशक्तीचा. जे नेते या अशा बाबा, बुवा, माता, पिता,आजोबा आणि देव जाणो काय काय लोकांच्या पायाशी लोटांगण घेत मतांचा जोगवा मागतात ते कोणत्याच जन्मात हिम्मत करू शकणार नाही कडक कारवाई करण्याची. मनोहर खट्टर इथेच गुलाम झाले, कांढे झाले एका बुवा पुढे. ते विसरले की त्यांचे आद्य कर्तव्य काय आहे ते? आस्था आणि धर्म वेगळा आहे. राजधर्म वेगळा आहे.
याच बाबतीत चिंता व्यक्त होती ती या सर्व अनुयायी लोकांची. कोण कुठले हे लोक? किती संख्यने जमा झाले पण एकानेही हातात मिठाई, लाडू किंवा अभिनंदनाचे बोर्ड वा फ्लेक्स नव्हते आणले. कोणीही बाबा निर्दोष सुटेल असे म्हणत नव्हते. सगळे उलट काठ्या, पेट्रोल बॉम्ब आणि डोळ्यात आग घेऊन आले होते. किती विश्वास असेल ना करतुतीवर. कशासाठी आम्ही आमची भावना एखाद्याच्या चरणाशी ठेवायची? ते ही अश्या ठिकाणी जिथे चारित्र्य, वर्तन आणि वित्त यांना काहीच महत्त्व नाही. इतके आंधळे कसे काय बनतो कोणी की मग सत्य आणि असत्य यातला फरकच कळत नाही?
कार्ल मार्क्स सांगून गेलेत की धर्म ही अफूची गोळी आहे आणि अश्या घटना पहिल्यात की मार्क्स यांचे विचार पटू लागतात. अर्थात धर्मो धारयति प्रजा, धारयति इति धर्मसांगणारी आमची संस्कृती कधीच अशा बोगस आणि असत्य गोष्टीना थारा देत नाही. आता गरज वाटते ती प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची. ज्या कोणत्या प्रवाहात वाहत आहोत तो सुद्धा एखादा रामपाल, रामरहीम, बापू अथवा मां तर नाही हे तपासण्याची वेळ आहे.
असो, या बुवाबाजीत स्वत:चे कल्याण शोधणारे सर्व परावलंबी आणि लुळे पांगळे लोक कधीच या देशाचे भविष्य बदलू शकत नाहीत. कधीच या देशाला पुढे नेऊ शकणार नाहीत. उभ्या डोळ्यांनी पाहिलेली जाळपोळ मालामत्तेची नसून ती बौद्धिक गुलामगिरी आणि दिवाळखोरी होती. वेदना एवढ्यासाठीच की सहज हाताळण्याजोगा प्रश्न ३० जीवांच्या मृत्यूचे कारण बनतो कारण राजकीय आणि धार्मिक स्वार्थ दडलेला होता. पुन्हा एकदा हे पटवण्यात आम्ही फेल झालो की या देशात न्याय सर्वात मोठा आहे.
--- सचिन गाडेकर

Comments