वनविभाग आणी नोटीस कारवाईची

वनविभाग आणी नोटीस कारवाईची (४/११/१७)

काल एक बातमी वाचली आणि डोक सुन्न झालं. म्हणे हेमलकसा इथे असलेले प्राणी, ते अनाथालय अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. ते तसे प्राणी ठेवणे कायद्यात बसत नाही आणि म्हणून ते सोडून द्या. आम्ही कारवाई करू अशी भाषा वापरली गेली म्हणे. या अश्या वन खात्याच्या भूमिकेमुळे डॉ. प्रकाश आमटे यांना दिल्लीपर्यंत जात मंत्री संत्री लोकांचे उंबरे झिजवावे लागत आहे. या सगळ्यातून डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यथित होऊन पद्मश्री परत करण्याचे सुतोवाच केले. या आयुष्यात डॉ. प्रकाश आमटे तसेच समस्त कुटुंब यांचे या पिढीवर जेवढे ऋण आहेत त्याची हि अशी कायदेशीर परतफेड म्हणजे किती कृतघ्नपणा आहे. अरे, एकरूप झालेत ते आणि प्राणी, अगदी लहान मुलांसारखे सांभाळत आलेत ते. या अधिकारी लोक आणि काही निर्बुद्ध प्राणीप्रेमी यांना कधी लाज नाही असे बोलतांना?

अरे, आयुष्यभर ज्यांनी जनसेवा केली, जे त्यांचे कर्तव्य नाहीच मुळी. आदिवासी भागात जाऊन असे काम करावे लागते हेच अपयश आहे सरकारचे आणि आडमुठ्या धोरणाचे. स्वत: डॉक्टर असून कुठे विदेशात अथवा शहरात राहून ऐसपैस आणि आरामशीर जीवन जगू शकत होते. परंतु वडिलांनी दिलेला वसा पुढे घेत आनंदवन ते हेमलकसा हा मैलाचा दगड गाठला. ज्या आदिवासींना सरकारने ठेंग दाखवत उघडेच ठेवले. अधिकारी त्यांच्या वस्तू आणि अनुदाने लाटत गब्बर झाले. जायला रस्ता नाही, कुठली सुविधा नाही, कुठलाच दवाखाना नाही अश्या वस्तीत काम करणे या भर्मिष्ट वन अधिकाऱ्यांना उभ्या जन्मात जमणार आहे का? एक कुत्रा घरी यांना पाळता येतो का? नेगलच्या मृत्यूने जे अश्रू आणि वेदना झाल्या त्या तुम्हा अधिकाऱ्यांना बाप मेला तरी होणार आहेत का? म्हणे कारवाई करू. 

आज म्हणताय की प्राणी सांभाळणे कायद्यात बसत नाही. मागच्या महिन्यात हिंस्त्र झालेली वाघीण या नालायक लोकांनी कशी मारली हे पाहिले आहे आम्ही. तिचा जीव घ्यायला म्हणे कोटी न कोटी खर्च झाले आणि ती अनधिकृत विजेचे कुंपण ओलांडताना ठार झाली. इथे का नाही दिसला वन खात्याला अधिकार उल्लंघन? तिथे कुठे होती माणुसकी आणि तथाकथित नियमावली? डोकं ठिकाणावर नसेल तर सांगा आम्हास. एक कानाखाली काढली कि कळेल की मानवधिकार उल्लंघन काय असत ते? असे करंटे अधिकारी या वयात डॉक्टरांना असा त्रास देताय हे दुर्दैवच या प्रदेशाचे. कुठला काही मलिदा बंद केलाय का डॉ. प्रकाश आमटे यांच्या कामाने? काही काळबेर करता येत नाहीय का? लोक सज्ञान होताय म्हणून का तुमची दुकानदारी बंद होतेय का? मग इतका थयथयाट कशामुळे? एवढे प्राणीप्रेम होते तर ते इथेच का? उभ्या नगरात मारले जाणारे भटके कुत्रे, जनावरे, हरीण, बिबटे हे मारले जातात तिथे नियम नाही का?

त्यात काही जास्त अक्कल झालेले लोकही या कारवाईचे समर्थन करताना दिसत आहेत. ज्यांना हेमलकसा कुठे आहे आणि या लोकांनी काय यातना सोसल्यात, काय कर्मयोग केलाय, कशा प्रकारे प्राणी सांभाळले आहे हे तसूभरही माहित नसेल हे नक्की. बरं, ज्याने कुत्रं देखील पाळलं नाही तो म्हणतोय की प्राणी अनाथच असतात आणि ते जंगलातच हवे. अरे, जंगल ठेवा आधी. आदिवासी लोकांसाठी काम करता करता वाचवलेले प्राणी जीवनाचा एक भाग बनले आणि पुरस्कार देतांना ज्या गोष्टीचा गौरव केलाय तेच आज अमान्य कसे होते? कायदा सर्वाना सारखा आहे म्हणत बौद्धिक दिवे लावू नयेत काही निर्बुद्ध लोकांनी. एकदा अवलोकन करावे की ते प्राणी कसे आले,कसे सांभाळले जातात. अरे, तुमचे प्राणी संग्रहालय म्हणजे काळे पाणी असेल असे ठेवता. त्यांना पाहून फक्त व्यथा होते पण डॉ. प्रकाश आमटे यांचे प्राणी आणि ते प्रेम पाहून काळीज द्रवीत होते. या लेकरांना त्या माउली पासून दूर करत कोणते नियम पाळणार आहोत आम्ही? आणि मग फक्त यांनाच का? कुठं घेऊन जातोय आम्ही हे सगळं?

डॉ. प्रकाश आमटे तुम्ही देऊन टाका तो पुरस्कार ही परत. पुरस्कार मोठा नाही तुमच्या त्यागापेक्षा. या लोकांची  लायकीच नाही तुमचे कर्तृत्ब आणि दातृत्व वाखाणण्याची आणि समजण्याची. प्राणी सोडले जाऊ नयेत ही माझी आग्रही भूमिका आणि या देशात नालायक नेत्यांना नियम बदलून विशेष दिला जातो तर तुमचे काम आणि कर्तृत्व नक्कीच मोठे आहे. तुम्ही वैभव आहात या देशाचे. काही कुचकट लोक तुमचा अंत पाहताय ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याचा फक्त निषेध नाही तर अश्या मूर्खाना दहा दिवस नेऊन सोडावं लागेल हेमलकसाच्या थोडेपुढे. कुणीही आमच्या संयमाचा अंत पाहू नये एवढंच.

-- सचिन गाडेकर

Comments