कानोसा वर्षाचा (भाग १) २५/१२/१७
कानोसा वर्षाचा (भाग १) २५/१२/१७
एखाद्या वेगवान चक्रासारखी आयुष्याची चाके फिरत असतात. त्यात उमेदीच्या काळात ही जीवनरथाची चाके जरा जास्तच वेग पकडत असतात असर म्हणतात. खरेच आहे म्हणा.. शिक्षण, नोकरी , विवाह आणि अजून बऱ्याच सोपस्कारात अर्धे आयुष्य पसार होते आणि स्वत:कडे वळून पाहताना अचानक रितेपणा समोर उभा ठाकतो. हे झाले स्वत:शी बोलले तर. जर आपण आपल्या सभोवताली वावर असणाऱ्या लोकांना निरखले, अभ्यासले तर स्वत: अनेक मैल अडखळत आहोत असे भासवेल. आजकाल कमी प्रयत्न आणि मोजके यश आले तरी समाधान नावाचा प्रकार गणला जातोय असे आढळते.
एक तर विधात्याने तोलून मोजून मापून जीवनाच्या घटका दिलेल्या आहेत. जाणारा क्षण जतन करावा की त्याचा आनंद लुटावा हेच कोडे पडते कधी कधी. हातातून रेती अलगद व्हावी पसार असे मोकळे होते आयुष्य आणि उभा ठाकतो दुसरा दिवस. त्या मोजत बसू तर आनंद कधी घेणार आम्ही? आनंद हा तर इतका व्यक्तिगत विषय आहे की कोण कशाला आनंद मानेल हे अनाकलनीय आहे. परंतु एक काम पूर्ण झाले आणि आपल्या सोबत अजून काही चेहरे नकळत खुलेल असे यत्न व्हावेत असे अपेक्षित तर नाही?
असाच नेहमीप्रमाणे कानोसा घेतांना गेल्या वर्षात माझ्यातला बदल मी पाहिला. त्या बदलातील बदल बरच काही बदलून गेले. बदल कधीही सहजासहजी स्वीकारला जात नाही कारण नेहमीच्या झालेल्या सवयी आणि जुळलेल्या तारा गुंता करून ठेवतात. मानवी मन अनेक तज्ञ लोकांनी अभ्यासले आहे. अजूनही खूप सारे काम चालू असे त्यांचे. मानवी मनाला आपण ठेवू तसे ते राहील का? आपण सांगू तसे ते मार्गक्रमण करेल का? ते पठडीतील जगणे सोडून नवा अध्याय स्वीकारेल का?अश्या आणि अनेक अगणित प्रश्न सोडवलेत या वर्षाच्या प्रवासाने.
फार काही तीर मारावे रोजच्या रोज असे ही नाही परंतु नववर्ष उगवतीला हे आपले हुंकार बनावेत.
वर्षात २० पुस्तकं रगडावीत आणि ती पुस्तके, संदर्भ मुखात येत ज्ञानधारा बनावेत. अभ्यास हा ध्यास बनावा रोजनिशी.
वर्ष सरता सरता ४ नवीन जिवाभावाची माणसे जोडावीत जी किमान सरण रचल्यावर दोन अश्रू ढालतील.
चुका होतातच हो पण झाल्या तरी मोठ्या मनाने त्या स्वीकारत सुधार व्हावा आणि वर्धिष्णू व्हावे.
शरीर थकते रोजच्या रोज परंतु तजेलदार मन टवटवीत राहील यासाठी त्याला नाविन्य आणि स्थिरता द्यावी.
तुटतील वा ढिले होतील काही बंध परी ते पुन्हा सावरत नव्या उंचीवर न्यावेत त्या गरुडाच्या घरट्या समान.
असो, बरेच काही आहे कानोसा घेतांना. खूप काही सांगतय हे वर्ष विदा घेतांना. कान आतुर आहेत ऐकायला आणि हात ते शब्दबध्द करायला.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment