कानोसा वर्षाचा ...भाग २
कानोसा वर्षाचा ...भाग २
या गत वर्षाने बरंच काही आदानप्रदान केलं आपण सर्वांनी एका बाजूने. एका बाजूने यासाठी म्हणायचं कारण स्वत:ची बाजू कितीही पडकी असेल तरी ती आपली आहे हे महत्त्वाचं. काळाने त्याचे काम मात्र चोख केले. कुठलीही कसूर सोडली नाही. थोडा जास्त विचार केला तर कळते की माणूस किती अधीन आहे मर्यादेच्या. किती किती बंधने आहेत आणि किती किती अवरोध. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणत सत्य सांगणारे कविवर्य वास्तवदर्शी बनतात.
मर्यादा सुध्दा माणसाला मोठ्या करतात आणि व्यापक करतात याचा पुरेपूर अनुभव, प्रचीती या गतवर्षात झाला असेलही. यावेळी आलेली वा लादलेली बंधने आपसूक माणसाला एका दोरीत आणत प्रगल्भतेकडे घेऊन जातात. काहीसे असेच झाले आणि लक्षात आले हा सगळा प्रपंच आपणास जीवनाचा अजून एक पाठ शिकवायचा आहे यासाठी. तसेही आजीवन विद्यार्थी असण्याचे शाळेतील सुविचार कधी कामी येणार?
खळखळ वाहणारे पाणी जसे चैतन्य देते तसेच अडवून, साठवून ठेवलेले धरणाचे पाणी देखील चैतन्यच आहे. त्याला रोखले जाणे म्हणजे त्याचे वैभव आहे. बहुधा नदीतून वाहत जात सागरला मिळत चिरशांती घेण्यापेक्षा छोट्याश्या कालव्यातून मर्यादित प्रवास करत ते लाखो जणांना जगण्याची उमेद देण्यात धन्यता मानते. हे असे अवरोध येतील पण त्यांना कसे पहायचे हे आपणच ठरवूया. काय गमावले याचा हिशेब ठेवत काय काय कमावले याचे जास्त कौतुक हवे.
“भले ही न आगे बढ सका ,पर न पीछे हटा दो गज भी ये विश्वास मेरा | “
या वर्षाकाठी आपल्या मी चा काही विस्तार झालाय का? काही वाढ झालीय का हे देखील तपासून पाहावे. शारीरिक वजन आणि आर्थिक गणिते या पलीकडे विस्तार होतोय का? फेसबुक, इन्स्टा सांभाळता सांभाळता गेल्या वर्षापेक्षा स्वत:ला आपण जास्त सहजतेने आणि विश्वासाने सांभाळले का याचा विचार व्हावा. आपली वृध्दी नाही झाली तरी ठीक पण अधोगती तर झाली नाही ना? मार्गक्रमण जसे व्हावे तसे पण फक्त पुढे पुढे या ध्यास. मागेही यावे लागले कधी तर ते फक्त झेप घेण्यासाठी.
असो, बरच काही पाणी वाहून जातं पुलाखालून. गरज आहे ती सिंहावलोकन करत आणि पुन्हा आसमंताला आव्हान देत झेप घेण्याची त्या फिनिक्स पक्ष्यासारखी. आव्हान पेलण्याचे वेड लागेल असे एकामागून एक आव्हाने यावीत आणि सराव जय पराजयचा नित्त्याचा बनावा. लढावे आणि लढतच रहावे असे होईल का? संपूर्ण वर्षभर केलेले संघर्ष अनुभूती द्यावेत योग्य मार्गीचालण्याचे.
चला, अजून तीन दिवस आहेत. सरतंय वर्ष हळूहळू ...
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment