सिग्नल, गर्दी आणि संवेदनशील ऍक्शन 19/7/18
सिग्नल, गर्दी आणि संवेदनशील ऍक्शन 19/7/18
आज सकाळी नेहमीची धावपळ आणि सोबतीला ट्राफिक होतीच. सेनापती बापट रोड आणि ते तीन सिग्नल फार जास्त काळ त्रास देत नाहीत पण सकाळी आणि संध्याकाळी प्राईम टाइममुळे फार गर्दी होते आणि ते जाणवते देखील.
आज सकाळी देखील सिग्नल कट टू कट होते. पोलीस मामा तसे निवांत भासत होते कारण प्रजा बऱ्या पैकी शिस्तीत चालली होती. जवळपास साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यानची वेळ असेल. सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या आणि एक ऍम्ब्युलन्सचा सायरन कुठून तरी कानावर पडला. मागे बऱ्याच गाड्यांमागे ती वाट शोधत होती. सायरन ऐकू येताच फटाफट लोक बाजूला सरकू लागले. कोपऱ्यातून फूटपाथचा सहारा घेत ऍम्ब्यूलन्स मार्ग काढत होती. कुणाचा तरी जीव धोक्यात असेल म्हणून ती लगबग दिसत होती. लोकांनी फटाफट मार्ग मोकळा करत जबाबदारी पार पाडली.
समोरून देखील सिग्नल ग्रीन असून देखील लोक थांबले आणि मार्ग मोकळा केला सायरन ऐकून. पहिल्यांदा ग्रीन असून लोक संयम ठेवत ऍम्ब्युलन्स मार्गस्थ करत होते.
खूप हायसे वाटले हे असे वर्तन पाहून. एरवी असे संवेदनशील वर्तन पहायला मिळत नाही, किमान सिग्नलवर तरी. माझे पाच मिनिट भले ही वाया जातील पण एखाद्याचा आयुष्याचा प्रश्न नक्कीच मोठा आहे. माझी पाच मिनिटं भरून निघतीलही पण दुसऱ्या व्यक्तीसाठी ती पाच मिनिटं जर जीवन मरण निश्चित करणार असतील तर किती संवेदनशील असायला हवे याचे आज उदाहरण पहायला मिळाले. टू व्हीलर असणारे टाळी वाजवत एकमेकांचे अभिनंदन करत होते. खूप मस्त सीन होता तो. ही अशी संवेदनशीलता अशीच टिकून रहावी असे मनोमन वाटले आणि परत गाडी पळवत इप्सित ठिकाणी पोहोचलो.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment