श्रध्दा आणि अंधश्रध्दा १३/७/१८

श्रध्दा आणि अंधश्रध्दा १३/७/१८

सदरची पोस्ट लिहिण्यापूर्वी हे सांगावेसे वाटते या पोस्टमधून कुणाचेही मन दुखावणे किंवा भावना आहत करणे असा कोणताही मानस नाही. कुणाच्या श्रध्देवर बोट ठेवता येणार नाही हे माहित आहेच. फक्त दु:ख होते ते काही अश्या बातम्या आणि पोस्ट येतात की अमुक चमत्कार झाला आणि तमुक साक्षात्कार झाला आणि मन हलकेच प्रतिक्रिया देऊ लागते. त्यात स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे आघाडीला होते.

अरे, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातला फरक जर कळत नसेल तर लहान मुलांना मारत नरबळी देत चेटूक मानणारे आपण यात फरक तो काय? चमत्कार जर व्हायचा असेल तर मग भारत स्वच्छ व्हावा एक घटकेत किंवा काश्मीर प्रश्न सुटावा किंवा सगळे खटले जे न्यायालात अडकले आहे ते तरी सुटावेत. त्या ईश्वराला एवढे संकुचित करत आपण त्याचेच अवमूल्यन करत आहोत याचा देखील विसर पडला आहे. जो ठायी ठायी आहे तो एका ठिकाणी असा कसा प्रकटेल? त्याचे सर्वांवर प्रेम आहे ना? 

असो, सर्वात पहिली गोष्ट की चमत्कार असेल तरच नमस्कार होणार असेल तर समस्या आणखी भयंकर आहे. एखाद्या आराध्य दैवत किंवा देवता यांच्या वरती पराकोटीची भावना असेल तर ती बुद्धीच्या कसोटीवर घासलेली आणि भावनेच्या परिपक्वतेवर उभी असावी एवढीच जुजबी अपेक्षा. जर मनापासून विश्वास आणि श्रद्धा आहे तर कोणतेही बाह्य अवडंबर हवेच कशाला? आपल्या श्रद्धेला ह्या अश्या कुबड्या का लागतात? का बरे अघोरी पर्याय आणि मार्ग फोफोवनार नाही बरे? का कोणी अश्या दुबळ्या विश्वासाला अजून पणाला लावेल? पि.के. आणि ओह माय गॉड यांचा विसर पडला असेल तर नवल नको.

मागे एकदा एका वस्तीवर कुठल्यातरी जागरण गोंधळ सारख्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे अंगात देव येतात हा प्रकार पाहायला मिळाला. इंदोरीकर म्हणतात तसे अंगात देव येतच असतील भगतसिंग यांचे विचार देत किंवाअब्दुल कलाम यांची तळमळ  येऊ देत ना? त्यात एक इसम विचित्र आरडाओरड करत अमुक एक देव आला हे सांगत होता आणि बाकी बसलेला समाज त्याला मूक संमती आणि जयजयकार करत होते. त्यात ट्विस्ट असा आला की त्याने एक काठी घेत ती पाठीवर प्रहार करणे असा भाग होता बहुतेक. दुर्दैवाने वरती एक केबल होती म्हणून शेजारीच इसम म्हटला,’देवा, तुला अधिकार नाही इथे कारण वर केबल आहे.’ लगेच देव शांत झाले. मी फक्त सुन्न होऊन पाहत होतो आणि दोष देत होतो स्वत:ला की कुठे आहोत अजूनही आपण?

एक तर असे चमत्कार करण्याची कुणाचीही शक्यता नाही कारण चमत्कार आणि भास यात परत फरक आहे. मूर्त रुपात, देह रुपात जेंव्हा कोणी असेल आणि सिद्धी प्राप्त असेल तरी ते महानुभाव सृष्टी आणि नियतीच्या पुढे जात नाहीत आणि ते नियम मोडत नाहीत. देह नश्वरता प्राप्र्त झाली तर मग फक्त कर्ममार्गे जाणारा जीव असतो. त्यात स्थान माहात्म्य उरते आणि तिथेच माणूस अडकतो. चमत्कार रोज होईल जे साधू पुरुष यांनी दिलेले विचार आपण समजून घेत जीवन जगू. अजूनही अंगारे-धुपारे आणि झाडू फुक करत कोणी माझे कल्याण करू इच्छित असेल तर काय म्हणावे? महान लोकांचे विचार, पवित्र जीवन आणि त्याग कुणालाच अवलंबायचा नाहीय आजकाल.

थोडे कटू वाटेल पण विचार करायला हवा ज्याने त्यांने की चूक काय आणि बरोबर काय? कसे काय आम्ही वाहत जाऊ शकतो एखाद्या अश्या गोष्टीत? कसे काय अध्यात्म जे बुद्धीच्या आणि भावनेच्या समतोलावर उभे आहे ते एकदम कसे डळमळते आणि एकांगी झुकते?विषन्न झालय हे मन मित्रानो, हे अपेक्षित नाहीच . विज्ञान आणि अध्यात्म इतकं सुरेख रसायन आहे त्यात हे असे प्रकार कुठेच बसत नाही. विचार करावा सर्वांनी.

-- सचिन गाडेकर

Comments