मराठी राजभाषा दिवस २७/२/१९
मराठी राजभाषा दिवस २७/२/१९
आज मराठी राजभाषा दिवस आहे. माय मराठीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. सर्वत्र शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संकुलात किमानपक्षी ही जागरूकता आणण्याचा प्रयत्न दिसतो. मराठी ती भाषा जी आपण सर्वांनी आपल्या मायकडून शिकलो. मायेची बोली ती मायबोली. मायेचे रुपडे असलेली मायबोली. मायेने कवटाळणारी मायबोली. मायेच्या अमर्याद प्रेमाची झालर मायबोली. मन मोकळं करून बोलावं अशी मायबोली. मायबोलीत एक साधा शब्द देखील किमया करून जातो.
मराठी माध्यमातून शिकवा हा एक आग्रह आहे.अनेक पालक जाणीवपूर्वक काही बदल स्वीकारताना दिसत आहेत. अर्थात एवढ्या मोठ्या संख्येला सामावून घेणारी समर्थ व्यवस्था आपल्याकडे नाही. स्वत: मराठी शिक्षक आपली मुले इंग्रजी माध्यमात पाठवताना दिसतात. त्यांची मजबुरी व्यवस्था आहे की शिक्षणाचा घसरलेला दर्जा हा चिकित्सेचा विषय आहे. याला सरकारी लकवा धोरण देखील जबाबदार आहे असे म्हटले पाहिजे. इंग्रजी शाळांचे सगळ्या पालकांच्या भूत कोणी मानगुटीवर कोणी बसवले हे सांगायला नकोच. असो, हा वेगळा विषय आहे असे म्हणू.
आपल्या सगळ्यांना मराठी ही भाषा जास्तीत जास्त बोलता येईल असे करावे लागेल. लहान मुल असो वा विद्यार्थी जास्त चांगला मातृभाषेतच व्यक्त होईल हे नक्की. कुठल्याही विषयाचे अभ्यासक असू पण भावना, विचार, अंतर्मन व्यक्त करण्यासाठी फक्त मराठी आठवते. जे मनात आहे ते थेट कागदावर येते आणि भावना जशाच्या तश्या अवतरतात. हे सारे श्रेय मायबोलीला. आपल्या बालपणापासून इतके मराठी कानावर पडले आहे की त्याने भाषा नकळत समृद्ध होत गेली. वेगवेगळया प्रांतात, जिल्ह्यात तर अजून वेगवेगळे शब्द ऐकू येतात.
प्रत्येकजण जन्म झाला आणि जगात आला तर पहिला शब्द ऐकतो तो मातेच्या मुखातून. तिच्या आर्त स्वरातून मायबोली कानावर पडते आणि ती आपलीसी होते. आई, बाबा, कुटुंब सगळे त्या मायबोलीतूनच आपल्याशी बोलतात. ती भाषा म्हणून आपली नाळ धरून आहे आपण मात्र भरकटत आहोत असे चित्र आहे. आपला पहिला तुटका, फुटका ,बोबडा शब्द सुद्धा मातृभाषेतच होता ना. आज जिकडेतिकडे इतर भाषांचे ढोल कामकाजात भलेही बडवले जावोत पण भावनांना, मनाला साद घालत सुरमयी नीरव बासरी फक्त मातृभाषाच देऊ शकते. तो काळजाचा कप्पा परिपूर्ण करण्याचे काम माय आणि मायबोली करते.
आजच्या बहुभाषिक वातावरणात मराठी काहीशी मागे पडत चालली आहे. स्वत: मराठी माणूस कामकाजाचे तास इंग्रजी वापरतो. त्यानंतर देखील तो का हिंदी अथवा इंग्रजी वापरतो हे आकलन होणे अवघड आहे. मराठी जोपासणे हे केवळ चित्रपट निर्मिती करत आणि त्यांना सिनेमागृहे मिळावीत एवढ्यावर सीमित राहू नये. दुकानावर मराठी पाटी असणे योग्यच पण तो इसम स्वत: मराठीत न बोलता इतर भाषांची कुबडी वापरतांना दिसतो. केवळ मराठी गाणी ऐकणे अथवा मराठी चित्रपट पाहणे एवढेच मर्यादित नसावे. यात शुद्ध मराठी बोलावी अशी अपेक्षा मुळीच नाही. जी भाषा जशी घडली आहे तशी बोलावी. त्यात शुद्ध अशुद्ध वाद नसावाच. जिथे किमान भाषा बोलली जात नाही तिथे इतरांच्या भाषेतील उणीवा शोधण्यात काय सार्थक मानावे?
आज कुसुमाग्रज यांना वंदन करत अधिकाधिक प्रयत्न करत मातृभाषेचे संवर्धन व्हावे यासाठी कटिबद्ध होऊयात. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवूयात. मराठी साहित्य वाचूयात. ग्रंथसंपदा सांभाळूयात. मराठी बोलत बोलत, मराठी समृद्ध करूयात.
पुन्हा एकदा *मराठी राजभाषा दिवसाच्या* हार्दिक शुभेच्छा.
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment