अर्थस्य पुरुषो दास: |

अर्थस्य पुरुषो दास: | १८/७/१९

प्रत्येक मानवाचा मुलभूत अधिकार शिक्षण आहे. त्याला शिक्षण मिळावे म्हणून अनेक यत्न झालेले दिसतात. प्राथमिक शिक्षण तर मोफतच आहे हे नक्की. त्यात घुसलेला इतर निमशासकीय आणि स्वयंअर्थसहाय्यीत यंत्रणा तर उच्छाद मांडत आहेत प्राथमिक अवस्थेत देखील. काही वर्षापूर्वी शिक्षण देण्यात सरकारी यंत्रणा अग्रेसर होत्या. गेल्या काही दशकांपासून सरकारी यंत्रणेने बगले वर केली आणि वारे वाहू लागले खाजगी शिक्षणसंस्थाचे. यातही हेतू अतिशय शुद्ध आणि लोककल्याण असाच होता. अर्थात पुलाखालून असे काही पाणी वाहून गेले कि पावसानंतर छत्र्या उगवाव्यात तश्या संस्था उभ्या राहिल्या.

आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे कळत देखील नाही  की किती गोष्टी फटाफट बदलत आहे. यात केन्द्स्थानी आला तो वित्त्ताचा, पैश्याचा आणि व्यवहाराचा भाग. वेतन शासन दरबारी नसून ते आलेल्या फी किंवा देणगीतून अदा करणे क्रमप्राप्त झाले आणि सारा घोळ सुरु झाला. पालक मागेल तेवढे पैसे मोजत संस्थेला, व्यवस्थेला गृहीत धरू लागला आणि कळले देखील नाही की तो अर्धा मालक असल्यासारखा वागू देखील लागला. पालक शिक्षक सभा तर कानउघाडणी दिवस असतो (शाळा, कॉलेज आणि शिक्षकगण यांचा?) पालक भरलेले पैसे आणि त्यात मिळालेला मोबदला याचा ठोकताळा मांडत असतो आणि तो त्याच्या ठिकाणी बरोबर देखील आहे. आयुष्याची पुंजी लावून त्याने खेळलेला अर्धा जुगार तो तरी कसा जाऊ देईल?
अर्थस्य पुरुषो दास: असे म्हणतात हे आजच्या काळाला लागू पडते. शिक्षणासाठी ओतलेला पैसा हा दबाव निर्माण करू लागला. कॉलेजात येणारी मुले जणू आपली गुंतवणूक आहे अशी चर्चा शिक्षक मंडळी देखील करू लागली. वर्गातील मुलं सपशेल हवं तसं बसू लागली, हवं तेव्हा उठून जाऊ लागली, असभ्य बनत कुरकुरेची पाकीट खाऊ लागली आणि कर्णपिशाच्चात मान घुसवून बसू लागली. ज्यात ज्याच्या डोक्यावर ज्ञानाचा भार आणि आचार्याचा ठप्पा आहे तो फक्त मूग गिळून शांतपणे पाहत बसतो. वाह! अरे, किमान गुरु म्हणून आदर नकोच आहे पण किमान लाज तरी बाळगावी ना. ज्याच्या कडून चार अक्षर शिकतो तो देखील आचार्यच आहे हा प्रेमळ भावनेला केव्हाच कर्करोग झालाय.

हा सलग बदल फक्त आणि फक्त पैश्यामुळे. अर्थ आणि सत्ता जेव्हा जेव्हा शिक्षणव्यवस्थेत केंद्रस्थानी असेल हे होणारच. फक्त १५ ते २० वर्षात एवढा बदल? आदर, सन्मान असा भावच खल्लास होतोच कसा?  पैसे भरलेत म्हणून कुणाचाहि अनादर करण्याचे अधिकार नाहीत प्राप्त झालेत कुणाला. अनेकदा असे वाटून जाते की जर हि अर्थकेंद्रित व्यवस्था नसती तर गचांडी पकडून बाहेर फेकले असते एकेकाला. अशी कशी कोण स्वत:शी प्रतारणा करू शकतो? प्रश्नच आहे की हि अशी जनावरे खुशाल पदव्या घेत समाजात फिरणार आहेत आणि समाजाचा भाग बनणार आहेत. भीती वाटते येणाऱ्या काळाची की हि अशी पिढी घडते आहे आणी आम्ही फक्त धृतराष्ट्र बनत काही नाही सगळं ठीक आहे असं म्हणत बसायचं. अजून काय? आम्ही सुधारलोय, प्रगत झालोय, आम्ही सहिष्णू झालोय.

अर्थस्य पुरुषो दास: |

--- सचिन गाडेकर

Comments