वाढदिवस विशेष खैरे सर २०/७/१९
वाढदिवस विशेष खैरे सर २०/७/१९
वाढदिवस हा केवळ एक सोपस्कार नसून आपल्या जवळच्या माणसांबद्दल व्यक्त होण्याचा दिवस असतो. कालच आमचे लाडके व्यक्तिमत्व श्री. निरंजन खैरे सर यांचा वाढदिवस होता. काल त्यांना तश्या डिजिटल आणि वैयक्तिक शुभेच्छा दिल्या आहेतच. परंतु चार शब्द लिहावेत ही भावना मनात कालपासून घोंगावत होती म्हणून हा यत्न.
निरंजन खैरे सर म्हणजे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व. मला माझ्या पुणे परतीच्या प्रवासात ज्या काही महत्त्वाच्या व्यक्तीनी मोलाचा वाटा उचलला त्यात अग्रेसर निरंजन खैरे सर आहेत. कुणाची काय विशेषता कोठे लावता येईल यात त्यांचा हातखंड आहे. जर त्यांच्याशी काही मिनिटे बोलाल तर मन सुखावते आणि प्रसन्न होते. मला एम. आय, टी. च्या मुख्य प्रवाहात आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे आणि ते नमूद करावेच लागेल.
निरंजन खैरे सर म्हटलं की समोर येतो त्यांचा मनमिळाऊ स्वभाव. अगदी दिलखुलास माणूस. अगदी मनमोकळा स्वभाव. स्वत: ते तंत्रशिक्षणाकडून मानव्यविद्या (technical to humanities) असा झालेला यशस्वी प्रवासाचे एक उत्तम उदाहरण आहेत. अनेक वर्षे इंजिनियरिंगचे अध्यापन करत स्वत:चा पिंड जपला. स्वत:ची मानव्यविद्या रेषा पुसट होऊ दिली नाही. त्यात असलेला रस जशी संधी मिळेल तसा संवर्धित केला. आज योगा या विषयाचे आयोजन आणि सर्व जबाबदारी एक हाती पार पाडतात यात नवल वाटायला नको. आवड असेल तर सर्व सवड मिळते आणि काम चोख पार पडते याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
खैरे सर यांचे मानव संसाधन (human resource) अतिशय उत्तम आहे. माणसे कशी जोडावी, सांभाळावी आणि आपली करावीत हे त्यांच्या कडून शिकावे. ते नेहमी म्हणतात मला योग्य ठिकाणी माणसे जोडून द्यायला आवडतात. यात एक वेगळाच आनंद आहे असे ते नेहमी म्हणतात. अगदी पटण्यासारखे आहे योजक: तत्र दुर्लभ: असे म्हणतात हे उगाच नाही. सगळं आपोआप होत नाही म्हणून कुणाला तरी पुढे येत योजक बनावे लागते. सर, तुम्ही एक उत्तम योजक आहात हे नक्की.
या सगळ्या धामधुमीत ईश्वराने दिलेल्या गोड गळ्याला देखील आपण जपले आहे. जे त्यांना जवळून ओळखतात त्यांना माहित आहे की किती गोड आणि मधुर आवाज लाभला आहे सरांना. निवांत चहाचा कप आणि फर्माइश एखाद्या गाण्याची आणि मग अजून काय हवे? एखाद्या छोट्या गेट - टुगेदरला हा असा तोफखाना सोबत असेल तर बाकी कशाशीच गरज नाही. मी भाग्यवान आहे की अनेकवेळा हे अनुभवले आहे आणि अनुभवत राहणार आहे.
हा झाला रोजचा भाग. यात एक अजून आपल्याकडून शिकायला मिळाले ते म्हणजे सतत शिकत राहणे. गेल्या वर्षात मानसशास्त्रातील समुपदेशन या विषयात पदविका पूर्ण केली. व्य्स्तात व्यस्त असा नोकरीचा भाग सांभाळत मानसशास्त्रात एम.ए. देखील पूर्ण होईल. जे आवडते ते करायला घ्यावे आणि तडीस न्यावे हे शिकावे लागेल आपल्याकडून. यात आपल्याला मिळालेली सौभाग्यपूर्ण विद्याताईंची साथ नमस्कारार्ह आहे. अनुकूल जोडीदार असेल तर काहीच अशक्य नाही हे आपण दोघांनी दाखवून दिले आहे.
असो, खूप काही लिहायचे आहे पण आता थांबतो.
तुमच्या दीर्घायू आणि निरामय स्वास्थ्यासाठी प्रार्थना आणि अजून उंच झेपावण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. |
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment