दिवेआगर आणि खूप काही 20/11/19

दिवेआगर आणि खूप काही 20/11/19

गेल्या आठवड्यात समुद्रकिनारी जाण्याचा योग आला अर्थातच दिवेआगार ला जाण्याचा योग आला. दिवेआगार एक  प्रसिद्धीस पावलेले बीच समुद्रकिनारा मोकळी जागा, ही सगळी खातरजमा केल्यावर आम्ही तिथे पोहोचलो अर्थात सर्वात महत्त्वाचं काम होतं ते निवांत होणे ज्याला आपण म्हणतो रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी कुटुंबासाठी वेळ दिला जातो आणि त्यासाठी सोबतीला अगदी समविचारी जर मित्रमंडळी असतील तर आणखीच मजा येते आणि तसेच झाले.

 समुद्रकिनारा म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात अर्थात हे सगळे ओघानेच आहे तिथे जाणे आपला वेळ व्यतीत करणे हे सर्व अगदी जुळून यायला हवं कारण शाकाहारी माणूस तिथे जाऊन काय बाबा मजा करणार अशी अनेकदा वल्गना केली जाते किंवा थोडासा विनोदही होतोच. बरोबर आहे कारण खाणे आणि पिणे याला प्राधान्य दिलं जातं आणि ते योग्यच आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते होतच राहते परंतु तिथे जायचं आहे बसायचं आहे वेळ व्यतीत करायचा आहे आणि तोच खरा आनंद आहे हे मांडणारे तसे कमीच नाही का?

 प्रवास सुरू झाला सुंदरसा रोड मुळशीचा रोड त्याने पुढे आलेला तो अजस्त्र असा ताम्हणी घाट अर्थात बऱ्याच वेळा असे वाटलेही की किती अजूनही आपण मुलभूत गोष्टींसाठी रखडतो?  घाटाचे रस्ते इतके जीवघेणे आहेत अनेक अपघात होतात परंतु हवी तशी डागडुजीची नव्हती. तसेही आपल्याकडे अर्ध्या गोष्टी फक्त रामभरोसे चालतात हे नक्की. अशी काळजी त्यांनी घेतली नाही यामुळे ही सरकारला थोडा दोष द्यावासा वाटला परंतु दोष कुणाला देणार ? आपलेच दात आपलेच ओठ नाही का ? 

सर्वात जास्त भावली ती गोष्ट म्हणजे खुलून आलेला निसर्ग, फुलून उभी राहिलेली दाट झाडी, उंच उंच डोंगर रांगा, मोठे मोठे पाषाण मोठे मोठे दगड त्याचबरोबर त्या शिळा, मध्ये मध्ये धावणारी दर्‍यांची रांग आणि बरंच काही.

 अर्थात थोडा उशीर झाल्यामुळे अंधारात खूप सारा घाट अस्पष्ट होता परंतु ते जाणवत होतं की आपण निसर्गाच्या कुशीमध्ये जात आहोत निसर्ग जवळून पाहणार आहोत ,अनुभवणार आहोत मग पुढे माणगाव आणि मग दिवेआगरला निवांतपणे पोहोचलो सर्वात महत्त्वाचं म्हणजे धकाधकीच्या आणि जनतेच्या जीवनात स्वतःला किती वेळ दिला जातो हे पाहायला हवं प्रत्येकाने शांत बसून निवांतपणे कुठलेही दडपण  नाही अशा वेळेसच माणूस अंतर्मुख होतो आणि हे नक्की आहे हे खरे आहे आणि म्हणून अंतर्मुख होण्यासाठी असे दूर गेलो तर आणखीच मजा येते. 

 बहुदा दीड दिवस जो काही व्यतीत करण्याचे ठरवले होते ते यासाठी की तिथे थांबून बसुन स्वतःला वेळ द्यावा. कुठलंही महत्वाच काम नाही, कुठली चिंता नाही. सर्वात महत्त्वाच आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे तिथे फार कमी मोबाईलला रेंज होती.  इंटरनेट अतिशय हळू चालत होते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या भौतिक जगाशी, आजच्या सोशल मीडियाशी तसु मात्र ही,तीळमात्रही संपर्क येत नव्हता आणि त्यामुळे सहजच माणूस त्या निसर्गाशी जोडला जात होता आणि हीच सर्वात मोठी बाब होती.

 तिथे  गेल्यावर अनेक अशा गोष्टी ओघानेच येतात.  एक खूप छान अनुभव आला तो म्हणजे निसर्गाचा. समुद्र आणि समुद्र सपाटी, त्याची खोली, त्याचं ते अगडबंब रूप पाहून प्रत्येक क्षणी स्वतःचा मानवाचा, माझा खुजेपणा मला जाणवत होता, खुणावत होता. जेव्हा जेव्हा मनामध्ये अहंकारी मनामध्ये हा विचारेल की मी कोणीतरी आहे, मी काहीतरी आहे मी दुसऱ्या कोणापेक्षा तरी मोठा आहे , असे यत्किंचितही कुठल्या क्षणात मनात आलं तर थेट समुद्राजवळ जावे. त्याच्या पाण्यात पाय बुडवून त्याचे विशालरूप, त त्याची महत्ता, त्याचे औदार्य पाहून मनोमन समजून घ्यावे की मी कोण आहे.  त्याच्यासमोर मी  काय आहे? स्वतःचा खुजेपणा, लहानपण स्वतःची किंमत  अगदीच स्वतःची जागा, स्वतःची लायकी असे शब्द वापरले तरी चालतील. कारण ते विशाल पूर्ण समुद्राकडे पाहून फक्त आणि फक्त नतमस्तक व्हायला होतं कारण कारण ती ऊर्जा  तो भाव ती ताकद,ते आक्रमण त्याची भरती-ओहोटी सगळं काही अगदी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जाणवतं मी माझ्या मर्यादा कशा राखल्या पाहिजे. तशा प्रकारची भरती ओटी माझ्या जीवनाचा भाग असली पाहिजे कशाप्रकारे मी रोजच जीवन जगतो त्यामध्ये कशाप्रकारचे भाव असले पाहिजे. 
 
समुद्राची विस्तीर्ण विस्तीर्ण बाजू पाहताना क्षणोक्षणी पदोपदी हे जाणवत होतं की मी  कुठे पासंगाला सुद्धा पुरणार नाही त्याच्या... सागराची विशालता मला घेता येईल ?घेता येईल का? रत्नांची खाण असलेला तो सागर. तिथे भरती-ओहोटी नंतर आलेले शिंपले पाहून मन अक्षरशः वेड झालं होतं अनेकानेक म्हणजे मोठी पिशवी भरून ते शिंपले गोळा करून घरी आणले तर समुद्राची एक खाण म्हणून त्याची आठवण म्हणून काहीतरी घरांमध्ये तो समुद्र प्रतीक रूपं राहील अशीच भावना आमच्या मनामध्ये होती. ते कुठून आले रत्न त्याच्याकडे आणि तो देऊन टाकतो खुशाल. हे देऊन टाकतो हे पाहताना डोळे पाणावत होते आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी कशा आणि का सहजपणे आपण काढून नाही  देत?  आपण छोटीशी गोष्ट देण्यासाठी आपला हात अडखळतो, अवघडतो आणि तिथे हा रत्नाकर सगळं काही देऊन बसतो.

अशा एकदम एकदम वेगळ्या भावना मनात होत्या.  पूर्ण संध्याकाळ झाली आणि  आमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यात  होते  पाणी.
 निसर्गाडे जाण्याचा यासाठी यत्न होतो की जेव्हा केव्हा मी माझ्या स्वतःच्या विश्वामध्ये माझ्या स्वतःच्या छोट्या डबक्यामध्ये स्वतःलाच मी मोठा म्हणू लागेल तेव्हा या विशाल निसर्गाकडे त्या डोंगर दऱ्या खोऱ्या मध्ये समुद्राकडे जावं, नदीकडे जावं आणि स्वतःची जागा ओळखावी. 

--- सचिन गाडेकर

Comments