लेखाजोखा वर्ष २०२० (भाग १ )

लेखाजोखा वर्ष २०२० (भाग १ )

या सरत्या वर्षाचा लेखाजोखा करावा की नाही इथून सुरुवात आहे. अशी एखादी नकारात्मक उपाधी नसेल जी आपण सर्वांनी या वर्षाला बहाल केली नसेल. घटना देखील अश्या काही घडत गेल्या आहेत की हे अख्खं वर्ष आयुष्यातून थेट वजा करून टाकावं की काय असे सूर ऐकू येतात. असो, दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देतांना लेखाजोखा मांडताना पुन्हा एकदा त्या वर्षात फेरफटका मारता येतो. एवढंच नाही तर त्यातून खूप काही शिकता येतं आणि पुढं चालता येतं. 

२०२० ची सुरुवात Jack Welch च्या Winning या पुस्तकानं झाली. कधीतरी लिहीन त्या पुस्तकाबाबत. असो, हा काळ होता सगळं काही नॉर्मल असल्याचा. कामकाज अगदी गतिमान होते. एकामागून एक सेमिनार, प्रोग्राम होत होते. कॉलेजमध्ये तर नुसता धमाका सुरु होता. जानेवारी म्हणजे सगळी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक आयोजने आलीच. या सगळ्यात कुणासही येणाऱ्या वादळाची कल्पना देखील नव्हती. सांगायचंच झालं तर याच महिन्यात अर्नाळा येथे मित्रसमूह दरवर्षी ठरल्याप्रमाणे एकत्र आला. न चुकता सगळे सहकुटुंब एकत्र आले. गप्पा आणि भेटीगाठी हाच काय तो मुख्य अजेंडा. हे असे एक स्नेहसंमेलन असते जिथे जाणे म्हणजे वर्षाची शिदोरी केल्यासारखेच आहे. थेट हृदयात जागा असणारे आणि हृदयाला भिडणारे जेंव्हा भेटतात तेंव्हा फक्त आनंद आणि आनंदच प्राप्त होतो. हा भेटीचा योग कधीही चुकवू नये असा असतो. 

याच वर्षात शैक्षणिक अंग पाहता एक मैलाचा दगड पार झाला. इंग्रजी विषयात पी.एच. डी. अर्थात विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. आपण नेहमी ऐकतो की प्रवास महत्त्वाचा असतो, गन्तव्य नाही...वगैरे वगैरे. परंतु या प्रवासात आनंद किती आणि धावपळ किती हे ज्यांनी अनुभवलं आहे त्यांनाच विचारावे. देव कृपेने माझ्या गाईड  आणि माझे रिसर्च सेंटर दोन्ही अनुकूल आणि मागे ठाम उभे असल्याने सावरत गेलो हे नक्की.  जवळपास  साडेतीन वर्ष चाललेला प्रवास हळूहळू पूर्ण झाला. एक एक कागद काय असतो, त्याची काय किमंत असते हे वेगळे सांगायला नको. थोडक्यात पी.एच. डी.चा viva झाला तो क्षण खास होता. हे नक्की नमूद करावे लागेल की या प्रवासात प्रत्येक विद्यार्थी अधिक प्रगल्भ, अधिक सजग  आणि संयमी होतो. मार्च महिन्यात ५ तारखेला हे सगळे झाले म्हणून वाचलो.  किमान १५ दिवस उशीर झाला असता तर हे शेपूट किती लांबल असतं देवच जाणे. या सबंध प्रवासात  प्रत्येक व्यक्ती ज्यांचा कळत किंवा नकळत हातभार लागला त्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि त्यांना मनापासून धन्यवाद. 

या सगळ्यात रुटीन आयुष्य वेगळ्याच गतीने धावत होते.  अगदी सांगायचे झाले तर होळीचा सण होता आणि तो नेहमीप्रमाणे  एकदम दणक्यात साजरा झाला. त्याच दिवशी सोसायटी ते सोसायटी एकमेकांना भेटी देत होतो. अख्खा दिवस  रंग लावत, एकत्र येत साजरा केला. संध्याकाळी विधिवत् होलिकादहन झाले आणि  होळी भोवती फेरे मारत दुर्गुण टाकण्याचा संकल्प देखील पार पडला. होळी आणि  पुरणाची पोळी हे समीकरण देखील चुकले नाही बऱ का. 

इथपर्यंत वर्ष सुरळीतच सुरु होते. रोजचा  कामकाजी भाग सुरु होता. अधूनमधून बातम्या आणि वृतपत्रे आणि सोशल मिडिया त्याचं काम करत होते आणि एकदम चर्चा सुरु झाली. स्टाफरूम असो, कॅन्टीन असो, रोजचा प्रवास असो किंवा सोसायटी असो, सगळीकडे एक अंधुकशी भीती मनात घर करत होती. आणि.....

क्रमश: 

--- डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments