लेखाजोखा २०२० (भाग २)

लेखाजोखा २०२० (भाग २)

गेल्या वर्षाचा लेखाजोखा मांडताना टाळेबंदी हा शब्द आणि ते भयाण चित्र आजही डोळ्यासमोर उभे राहते. किमान एका अख्ख्या पिढीला कधीही कल्पना न केलेल्या अश्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. एका विषाणूने चीनच्या वूहान शहरातून शिरकाव करत अख्ख्या जगाला आपल्या कवेत घेत हैदोस घातला आणि अजूनही चित्र फार स्पष्ट आहे असे काही नाही. आता सगळे या विषाणूचा उतारा म्हणून लसीकरण व्हावे या एकाच गोष्टीची वाट पाहत असावेत. 

मला तर अगदी स्पष्ट आठवतेय की पुण्यातील पहिले कुटुंब जे कोरोनाचे  पेशंट बनले आणि एकच दहशत पसरली. स्टाफरूम असो  वा सोसायटी,  बातम्या अथवा पेपर सगळे एकच भाषा बोलू लागले. होणारा संसर्ग किती नुकसान पोहचवेल याचा अंदाज बांधता बांधता टाळेबंदी देखील जाहीर झाली. जिथल्या तिथे जो तो अडकला गेला. त्या सबंध पहिल्या दोन आठवड्यात जे काही सुरु होते ते न बोललेलेच बरे.  आता लोक अर्थव्यवस्था आणि मंदी वगैरे बोलत आहे पण तेव्हा फक्त सुरक्षा आणि संसर्ग कसा होऊ नये याचाच विचार होता. आपला मिडिया किती अपरिपक्व हे यावर काही बोलण्यापेक्षा त्यावेळचे काही बाईट्स पाहिले तर सगळा साक्षात्कार होईलच त्यामुळे त्यावर कशाला काही लिहावे?

या कोरोनामुळे आणि टाळेबंदीमुळे काही कटू बाबी समोर आल्या. आपण आणि आपल्या पीढीने कधीही न अनुभवलेली  सामाजिक आणि आर्थिक दरी उघड्या डोळ्यांनी पाहिली. एकीकडे प्रगती आणि शहरीकरण वगैरेच्या चर्चा होत असतांना लाखो लोक असे आहेत ज्यांना  दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते एवढ्या मोठ्या संख्येने आहेत हे एकतर माहित नसावे किंवा माहित असूनही त्यांचे असे असणे व्यवस्थेने हे विचारातच घेतले नसावे. रोज कमवले तर संध्याकाळी दोन घास पोटात जातील अशी लाखो लोकांची दशा आहे हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच सगळे झाकलेले पितळ उघडे पडले. मला स्वत:ला येणाऱ्या अनेक पिढ्यांना जर टाळेबंदीबद्दल सांगावेसे झाले तर फक्त रोजंदारी करणाऱ्या त्या लाखो मजुरांची  पायपीटच डोळ्यासमोर येते. राज्यकर्ते आणि व्यवस्था फक्त हाताची घडी घालून उभी होती हे देखील अनाकलनीयच होते. 

या सगळ्यात, टाळेबंदीच्या काळात किमान स्वत: चार भिंतीमध्ये राहू शकलो, लहान मुली आणि कुटुंबजण सुरक्षित राहू शकतील एवढी व्यवस्था तरी होती यासाठी आईवडील आणि ईश्वर यांचे आभार व्यक्त करत होतो. ही अशी पायपीट फक्त जगण्यासाठी आणि आपल्या स्वत:च्या घरी जाण्यासाठी करावी लागावी ही अशी वेळ कोणावरही येऊ नये. ज्याच्याकडे अर्धे आयुष्य राब राब राबलो तो मालक दोन दिवसही सहकार्य करू शकला नाही. या संवेदनशील काळात तो थोडी सुद्धा झळ सोसायला तयार नाही . मला हे सतत वाटत गेले की आपण सतत जे आहे त्याबद्दल देखील तक्रार करत असतो. सर्वांना हे नाहीतर तर ते हवे असते. या सरत्या वर्षाने जे हे त्याचा आदर करा आणि आभार माना हे ही शिकवले. अर्थात  प्रगती व्हावीच पण जे आहे त्याचे  समाधान तरी असावे ही शिकवण मिळाली. 

या काळात काही चांगले किंवा विधायक घडले ते असे नोंद करता येईल. सतत कामानिमित्त व्यस्त असणारे असो वा घरकाम, जबाबदारी यात सतत गुरफटून गेलेल्या सगळ्यांना एकमेकांसाठी मिळालेला वेळ ही या काळाची सर्वात मोठी जमेची बाजू होती. किमान या काळात चिमुकल्यांना दमलेल्या बाबांची कथा सांगायची वेळ आली नसेल कुणावरच. मला तर पूर्णवेळ घरात बसून काम करतांना पाहून माझ्या दोन्ही सोनुल्या जाम खुश होत्या. सकाळी घाईघाईने कामावर जात संध्याकाळी लिमिटेड वेळ असणारा बाबा असा पूर्णवेळ घरात आहे म्हटल्यावर काय सांगावे...मला स्वत:ला सुद्धा या काळात खूप काही करता आहे, खूप काही जुळून आले. जे आवडते ते करायला मिळाले. ते सर्व पुढच्या सदरात सांगतो.

क्रमश: 

--डॉ. सचिन शंकर गाडेकर

Comments