वाढदिवस विशेष तृप्ती
वाढदिवस विशेष तृप्ती
प्रिय तृप्ती
तुझ्या जन्मदिनी काय काय लिहावं असं होऊन जातं . ईश्वरानं बांधलेली खूणगाठ अशी काही चपखल बसली की आयुष्य अगदी झकास होऊन गेलं. केवळ औपचारिकता नाही पण थेट हृदयातील भाव आज प्रकट होताहेत बरं का ..
आयुष्याचा जोडीदार म्हणजेच अनुकूल पत्नी असणं किती महत्त्वाच आहे हे वेगळ सांगायला नको. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात तू खंबीर साथ दिलीस आणि अशीच देत रहा. या संसार रथाची दोन चाके असतात. लोकांना फक्त एकच चाक प्रकर्षाने दिसते. पण आपल्या जोडीदाराच्या सोबत, मागे, पुढे आणि सगळीकडे भक्कमपणे तू उभी राहिलीस म्हणून मी असा अडीग आणि स्थिर आहे हे मी जाणतो .
असं म्हणतात की हृदयात जाण्याचा मार्ग हा पोटातून जातो. अर्थात तू एक उत्तम अन्नपूर्णा आहेस हे सगळे जाणतात. तुझ्या हाताला ईश्वरी देणगी आहे आणि चव तर काय बोलावे? माझ्या मनात ते तुझ्या मनात असे अनेकदा होते आणि पदार्थ बनत जातात. मला अजून हे कोडे कळले नाही की तुला इतराना खाऊ घालणे आणि खूप काही करत बसणे याचा कंटाळा कसा येत नाही? किंबहुना हाच तुझा गुण मला फार आनंदित करून जातो. माझी चहाची हौस यांचे ज्वलंत उदाहरण.
केवळ खाणे पिणे नाहीतर तू अत्यंत काळजीने सर्व काही करत असते. खास करून मुलींची देखभाल असेल वा माझ्या काही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्यांची यादी असो. घर असे काही उत्तम सांभाळले आहेस की मला काहीच पहावे लागत नाही. अगदी सुरवातीचे अल्लड नवदाम्पत्य ते प्रगल्भ जोडी असा आपला प्रवास केवळ तुझ्यामुळे शक्य झालाय.
मागच्या काही वर्षात तुझ्याकडून मी कधीच काही भौतिक गोष्टीसाठी कधीच कटकट ऐकली नाही. अर्थात देवाने कधी काही कमी पडू दिले नाहीच पण आलेल्या काही अर्थ संकटात तू कंबर कसून उभी राहिलीस. एकदाही मला असं वाटू दिलं नाही की हे कमी आहे किंवा ते का नाही. पुण्यात पुन्हा परत आलो तर ते एक वर्ष तू कमाल केलीस. मुली, अर्थचक्र आणि भावनिक विश्व अगदी जबाबदारीने सांभाळलेस. जेंव्हा आपला साथीदार एक पाय भक्कम रोवून असतो तेव्हा धाडस आणि काही रिस्क घेता येते. तुझ्या त्या संयमाला आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला खरच नमस्कार आहे.
या वर्षी तर देवाच्या कृपेने हक्कांच घर झालं आणि एक स्वप्न पूर्ण झालं. तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद अजूनही तसाच डोळ्यासमोर तरळतो. तुला फार वाट पाहायला लावली हे ही मी जाणतो. परंतु ईश्वरी संकेत जेंव्हा होईल तेव्हांच काय ते होते, नाही का? आणि आता या घराला नंदनवन करायची जबाबदारी तू समर्थपणे पेलशील यात मला शंका नाही.
तुझ्या समजून घेण्याच्या स्वभावाचा मला हेवा वाटतो. संसारात एकाने कोणीतरी एक पाऊल मागे टाकावे असे म्हणतात. तू माझी सावली न बनता माझ्यापुढे राहून मला सावली देतेस याच कौतुक करावं तेवढं कमीच. तुझ्या जन्मदिनी काय संकल्प देऊ तुला? आपल्याला दादांच खूप काम करायचं आहे, मुली संतान बनतील असं त्यांना घडवायचं आहे. आपल्या क्षमता वाढवून देवाचं काम करायचं आहे. तो प्रसाद देतच आहे. अशीच भक्कम साथ देत, हसतमुख राहत आनंदी रहा. तुझा खूप खूप अभिमान आहे मला. औक्षवंत हो, खुश रहा, आनंदी रहा, जशी आहे तशीच रहा.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ....
Comments
Post a Comment