जागतिक पुस्तक दिवस आणि शेक्सपियर दिवस

जागतिक पुस्तक दिवस आणि शेक्सपियर दिवस
 
आज नकळत हात कीबोर्ड आणि संगणककडे सरसावले. कारणही तसे विशेष म्हणावे लागेल कारण पुस्तक दिवस आणि इंग्रजी साहित्याचे दैवत शेक्सपियर यांचा जन्मदिवस असे एकत्र म्हणजे सुवर्णयोगच. इंग्रजी विषय म्हटलं की नकळत समोर उभा राहतो एक साहित्यिक वटवृक्ष आणि तो म्हणजे शेक्सपियर. इंग्रजी विषय अभ्यासणारेच नाही ते इतरही वाचक येथे नतमस्तक होतात. शेक्सपियर यांनी रेखाटलेली पात्रे अजरामर झाली आहेत. त्या साहित्य सागरात एकदा डुबकी मारली की अनंत काल तसच डुंबत रहावं इतका तो खोल आणि मनोहर आहे.

 शेक्सपियर यांनी रेखाटलेल्या शोकांतिका इतक्या जबरदस्त आहेत की त्या सुन्न करून टाकतात. मग तो Othello असो, Macbeth असो, King Lear असो अथवा अप्रतीम Hamlet असो.  नायक जेंव्हा दुर्भाग्याचा शिकारी बनतो, जेंव्हा एक विशाल कर्तृत्ववान नायकाचा करुण शेवट होतो आणि त्या अपूर्ण सत्याला शेक्सपियर इतके चपखल मांडतो की मनावर राज्य करून जातो तो नायक. 

आम्ही एम.ए. ला असतांना वाचलेला आणि समजलेला नायक आणि खलनायक Othello आजही तसाच आहे. आयुष्यात कधीही न विसरावा असा पाठ पक्का झाला. त्या नायकाची कधी चीढ यावी तर कधी त्याबद्दल सहानुभूती उभी रहावी इतके अद्भूत आहे ते. शेवटी  जीवन ही असेच आहे कि काय सुरू आहे आणि काय नाही असा प्रश्न आ वासून अनेकदा उभा राहतो. त्याचा नायक प्रेमाच्या शिखरावर, मनाच्या उच्च तीरावर गेला तरी कधी नशीब त्याला  फरफटत खेचून मातीत घेऊन येईल माहीत नाही आणि हे कटुसत्य शेक्सपियर अधोरेखीत करतो. Othello तर ते सर्व मिळवून स्वत:च्याच प्रेमाचा गळा घोटतो तेंव्हा तर विश्वास बसत नाही की हे काय घडते आहे. मनात खदखदनारी ईर्ष्या आणि द्वेष कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे हा नायक. आपणच ठरवलेल्या गुन्हेगाराला साधी एक संधी देखील न देता संपवणे किती क्रूरता आहे, किती अमानुष आहे. प्रेम, करुणा वगैरे जाऊ द्या किमान माणुसकी देखील न दाखवता केवळ ईर्ष्या माणसाला इतकी गुलाम करू शकते हे पाहवत नाही. अवतीभवती असणाऱ्या गोड गोड गोष्टींना मानवी स्वभावाचा कठोर आणि अमानवी चेहरा देखील पहावयास मिळतो. 

आज पुस्तक दिवस देखील आहे. आजच्या डिजिटल युगात देखील पुस्तक पाहिले की ते हातात घेऊन,फटाफट वाचून मोकळं व्हावं असे वाटणाऱ्या अनेक जणांना आजच्या शुभेच्छा. महिनाभराचे आर्थिक गणित आणि बजेट कितीही कोलमडो ठराविक वेळ आणि पैसे पुस्तकांसाठीच खर्च होतात आणि ते असेच खर्च होत राहोत. वाचन संस्कृती वाढावी आणि वाचन एक संस्कार व्हावा यासाठी सतत यत्न हवेत. गेली काही वर्षे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जन्मदिनी वाचन प्रेरणा घेत वंदन करत आहोतच. अनेकवेळा वेळेची सबब ऐकावयास मिळते आणि ती मान्य देखील होते. अर्थात जे वेळ काढून वाचन करत आहेत ते किती व्यस्त आहेत हे सांगायला नको. त्यांना भेटून थोडी प्रेरणा मिळते हे नक्की. ही प्रेरणा घेऊ आणि वाचन संस्कृती जपूया. 

 --- डॉ. सचिन शंकर गाडेकर


Comments